कोल्हापुरात भरणार आगळ वेगळं प्रदर्शन
औषधी वनस्पती, कंदमुळं मिळणार पाहायला
कोल्हापूर :
कोल्हापुरात शनिवारपासून आगळे वेगळे प्रदर्शन पाहायला मिळणार आहे. रोज दिसणाऱ्या पण औषधी असणाऱ्या वनस्पती आणि जंगलात बरोबरच विविध ठिकाणी असलेल्या कंदमुळांची माहिती उपलब्ध होणार आहे. यासाठी ‘निसर्ग अंकुर’च्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर वुई केअर, एनजीओ कम्पॅशन २४ या संस्थेतर्फे या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या आगळ्यावेगळ्या प्रदर्शनाबाबत माहिती देताना वुई केअरचे मिलिंद धोंड यांनी सांगितले की,
श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्था, गार्डन्स क्लब, यूथ ऍनेक्स, वुई केअर हेल्पलाईन या संस्थांच्या सहकार्याने शनिवारी (ता. १८) व रविवारी (ता. १९) शहाजी कॉलेजच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत प्रदर्शन होणार आहे. १०० हून अधिक कंदमुळे, १५० हून अधिक औषधी वनस्पती, ५० पेक्षा अधिक फुलपाखरांना आकर्षित करणाऱ्या विशेष वनस्पतींचे प्रदर्शनात असतील.
निसर्ग अंकुर संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. अशोक वाली यांनी सांगितले की, या प्रदर्शनात सताप, गुगूळ, कुसर, कोष्ट कोलीजन, लक्ष्मी तरू, सागर गोटा,
बेडकी पाला, अक्कल कारा, दमवेल, काजरा या दुर्मीळ औषधी वनस्पती व कंदमुळांपासून विविध खाद्यपदार्थ कसे बनविले जातात. त्याच्या पाककृती या प्रदर्शनात पाहता येतील. रानभाज्या, वृक्ष आणि औषधी वनस्पतींची माहिती असणारी पुस्तके विक्रीसाठी असतील.
यावेळी निसर्ग अंकुर संस्थेचे अध्यक्ष डॉ. मधुकर बाचुळकर, मंजिरी कपडेकर, सुप्रिया भस्मे, अमृता वासुदेवन, सुशील रायगांधी, अभिजित पाटील, सुशांत टकळक्की आदी उपस्थित होते.