कोल्हापूरकरांनी निवडणुकीत उबाठाला कायमचे फेकून दिले* *उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खरमरीत टीका* *लाडकी बहिण योजना बंद होणार नसल्याचा केला पुनरुच्चार*

Spread the news

 

­

 


  •  

*कोल्हापूरकरांनी निवडणुकीत उबाठाला कायमचे फेकून दिले*

*उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खरमरीत टीका*

*लाडकी बहिण योजना बंद होणार नसल्याचा केला पुनरुच्चार*

राधानगरी (कोल्हापूर), ता. ५ एप्रिल २०२५

सत्तेसाठी इमान विकणाऱ्या, बाळासाहेबांच्या विचारांशी तडजोड करणाऱ्या उबाठाला कोल्हापूरकरांनी विधानसभा निवडणुकीत कायमचे फेकून दिले, अशी खरमरीत टीका शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज उबाठावर केली. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात आयोजित आभार सभेत ते बोलत होते. यावेळी मंचावर मंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धैर्यशील माने आणि शिवसेनेचे कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले की, कोल्हापुरात महायुतीच्या १० पैकी १० जागा निवडून आल्या. कोल्हापूरकरांना १०० टक्के मार्क मिळाले. कोल्हापूर जिल्हा ऐतिहासिक आहे. इथला कोणी नाद करायचा नाय आणि त्यांनी निवडणुकीत दाखवून दिले. पहिल्यांदाच राधानगरी भुदरगडला मंत्री मिळाला, पालकमंत्री मिळाला आणि आरोग्य खाते सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडीत असल्याने आरोग्य आणि शिक्षण खाते शिवसेनेकडे मागून घेतल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. मुख्यमंत्री असताना अडीच वर्षात मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ४५० कोटींची गरजू रुग्णांना मदत केली तर महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्याने अडीज वर्षात केवळ अडीच कोटी दिले होते. शासन आपल्या दारी उपक्रमातून पाच कोटी लोकांना लाभ मिळाला. मागील अडीच वर्ष केलेल्या अमर्याद कामाने जनतेने भरभरुन आशीर्वाद दिला. महाराष्ट्र नंबर एकवर नेऊन ठेवला आहे. या राज्यात विकासाच्या प्रचंड संधी आहेत, असे ते म्हणाले. अडीच वर्षात सरकारने शेतकऱ्यांना ४५००० कोटींची मदत केली. १५० सिंचन योजनांना मंजुरी दिली.

ते पुढे म्हणाले की, वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावर काय भूमिका घ्यायची यावर त्यांचा गोंधळ उडाला. काही लोकांचा चेहरा भोळा असतो पण भानगडी सोळा असतात, अशांना कोल्हापूरकरांनी निवडणुकीत तडीपार केले, असा टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठाला लगावला. काहींनी मला हलक्यात घेतले. मी शांत आहे, शांततेत काम करु द्या, पण मला कोणी छेडले तर मी सोडत नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला. दाढीवर कितीही टीका केली तर याच दाढीने तुमची मग्रुरी जिरवली. दाढीने महाभकास आघाडीची गाडी खड्ड्यात घातली, हे विसरु नका, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. जनतेच्या न्यायालयात जाऊ म्हणणाऱ्यांच्या १०० पैकी २० जागा निवडून आल्या, आम्ही ८० जागा लढून ६० आमदार निवडून आले. आम्ही उठाव करुन शिवसेना आणि धनुष्यबाण वाचवला त्यावर जनतेने शिक्कामोर्तब केले असे ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत फेक नरेटिव्हमधून मतदारांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला होता, मात्र मतदारांनी विधानसभा निवडणुकीत हा डाव हाणून पाडला. महायुतीला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. विरोधकांनी कितीही खोटनाटे पसरवले तरी राज्यात लाडकी बहिण योजना बंद होणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.ते पुढे म्हणाले की, सदगुरु संत बाळुमामा यांच्या तीर्थ क्षेत्रासाठी ६५० कोटींचा विकास आराखडा तयार होत आहे. कोल्हापूर संतांची, वारकऱ्यांची, धारकऱ्यांची भूमी आहे. इथल्या तीर्थक्षेत्रांचा, मंदिरांचा, गडकोट किल्ल्यांच्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. हे प्रगत राज्य आहे. देशातील सर्वाधिक पायाभूत सेवा प्रकल्प आकारास येत आहेत. महायुतीचा स्ट्राईक रेट इतका जबरदस्त होता की विरोधी पक्षांना तोंड दाखवायला जागा ठेवली नाही. हा महाराष्ट्रातील जनतेने इतिहास घडवला आहे, असे ते म्हणाले.
—————


Spread the news

You may also like

error: Content is protected !!