तर कोल्हापूरचा इतिहासच वेगळा दिसला असता
खासदार शाहू महाराज यांचे प्रतिपादन
छत्रपती राजाराम महाराज (दुसरे) पुस्तकाचे प्रकाशन
कोल्हापूर
परदेशात नेमकं काय चांगलं आहे, याची माहिती जाणून घेण्यासाठी तत्कालीन परिस्थितीत सोयी नसताना राजाराम महाराज दुसरे इंग्लंडला गेले. भरपूर माहिती घेतली आणि त्या माहितीचा उपयोग प्रजेला व्हावा म्हणून रोजीनिशी लिहिली. पण, परत येताना त्यांचे निधन झाले. ही दुःखद घटना घडली नसती तर कोल्हापूरचा इतिहासच बदलला असता’ असे प्रतिपादन खासदार शाहू महाराज यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाच्यावतीने डॉ. इस्माईल पठाण लिखित छत्रपती राजाराम महाराज करवीर (दुसरे) आणि यात्रा युरोपची छत्रपती राजाराम महाराज दुसरे यांची रोजनिशी 1870 या प्रा. रघुनाथ कडाकणे अनुवादित दोन ग्रंथांचे प्रकाशन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते झाले. यावेळी खासदार शाहू महाराज बोलत होते. या कार्यक्रमास ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार, नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंत थोरात, विक्रमसिंह पाटणकर, बाळ पाटणकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.मेन राजाराम हायस्कूलमधील दरबार हॉलमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला.
ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. पवार म्हणाले, राजाराम महाराजांची दृष्टी नवीन युगाचे अग्रदूत्व आधुनिक युगातील शुक्रताऱ्याप्रमाणे होती ते चौकस बुद्धीचे राजे होते म्हणून तर ते कोल्हापूरच्या प्रजेच्या प्रगतीसाठी काय करता येईल हे अभ्यासण्यासाठी परदेशात गेले. त्यांनी तेथे अनेक गोष्टींचा अभ्यासही केला. महाराष्ट्रातील हा
पहिला राजा होता ज्यांनी अभ्यासासाठी युरोप दौरा केला. हा राजा म्हणजे आधुनिक युगाचा अग्रदूत होता. संभाजी महाराजांच्यानंतर स्वराज्य पूर्णपणे अडचणीत आलेले असताना पाटणकर घराणे एकनिष्ठेने राहिले. त्यांच्याच घराण्यातील दत्तक आलेले राजाराम हे परदेशातून परत आले असते तर कोल्हापूरचा इतिहास निश्चितपणे बदलला असता.
नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉ. यशवंत थोरात म्हणाले, जे इंग्रज आपल्यावर राज्य करत आहेत. त्यांच्या देशातील परिस्थिती पाहून त्यानुसार आपल्या संस्थानामध्ये काही करता येईल का याची चाचपणी ते करत होते. तिथल्या दौऱ्यानंतर कोल्हापूरच्या विकासाच्या आकांक्षांची ब्ल्यू प्रिंट त्यांच्या मनामध्ये तयार झाली असावी. पण दुर्दैवाने येताना त्यांची निधन झाले आणि कोल्हापूरच्या विकासाचे त्यांच्या मनातील स्वप्न त्यांच्याकडून पूर्ण झाले नाही.
डॉ. इस्माईल पठाण म्हणाले, राजाराम महाराज हे प्रखर बुद्धिमत्तेचे होते अवघ्या दीड वर्षात ते अस्सल लिखित इंग्रजी शिकले विशेषता अनेक राजे परदेश दौऱ्यात मौजमजा करण्यासाठी जातात पण हा राजा मात्र कुठेही मौज मजा न करता काहीतरी नवीन शिकता येईल का? हे पाहत होता तेथील विद्यापीठात जाऊन व्याख्याने ऐकणारा नवीन काहीतरी शिकणारा हा राजा परत आला असता तर निश्चितच वेगळा इतिहास घडला असता.
डॉ. रघुनाथ कडाकणे म्हणाले, राजा असलेल्या एका लेखकाला उरावर घेवून अनुवाद करण्याचे हे काम आव्हानात्मक होते. पण हे आव्हान आपण स्वीकारले आणि एक चांगलं काम केल्याचा आनंद आहे. एक राजा विविध संदर्भासह रोजनिशी लिहितो तत्कालीन सामाजिक परिस्थिती सोबत राजकारभाराचे अनेक पदर दाखवतो त्या रोजनिशीचे अनुवाद निश्चितपणे दिशादर्शक ठरणार आहे.
कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के म्हणाले, १८७० च्या काळात ‘स्टडी टूर’ची संकल्पना राबविणारे राजाराम महाराज हे पहिले संस्थानिक होते. त्या काळात त्यांनी शिष्यवृत्ती सुरू केली हे काम अतिशय कौतुकास्पदच होते.
प्रारंभी बाळ पाटणकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचेही भाषण झाले. पंडित कंदले यांनी सूत्रसंचालन केले, या कार्यक्रमास लोकमत’चे संपादक वसंत भोसले, डॉ. माणिकराव साळुंखे, डॉ. सुनीलकुमार लवटे, सुरेश शिपूरकर, व्ही. बी. पाटील, बी. पी. साबळे, ऋतुराज इंगळे, डॉ रमेश जाधव, आनंद माने प्राचार्य जी.पी. माळी ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.