*कोल्हापूर शहर विकास आराखड्याच्या कामास गती द्या : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर सूचना*
*कोल्हापूर शहराच्या प्रलंबित विकास आराखड्याबाबत संबधित विभागांची बैठक*
कोल्हापूर, दि. १७ : कोल्हापूर शहराचा तिसरा विकास आराखडा २०२० सालात पूर्ण होवून त्याची अंमलबजावणी होणे अपेक्षित होते. पण २०२४ साल उजाडले तरीही विकास आराखड्याचे काम पूर्ण झालेले नाही. यामुळे शहराचा विकास खुंटला आहेच यासह नागरिकांची गैरसोय होवून त्याचा परिणाम कोल्हापूर महानगरपालिकेच्या उत्पन्नस्त्रोत्रावर होत आहे. त्यामुळे कोल्हापूर शहराच्या विकास आराखड्याच्या कामास गती द्या, अभ्यासपूर्वक हा आराखडा तयार करून या आराखड्याला मूर्त स्वरूप द्या, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या.
कोल्हापूर शहराच्या तिसरा विकास आराखड्याच्या कामात होत असलेल्या दिरंगाई बाबत संबधित प्रशासकीय अधिकारी, कंत्राटदार कंपनीचे प्रतिनिधी यांची संयुक्तिक बैठक आज शिवालय, शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय, शनिवार पेठ, येथे पार पडली. यावेळी श्री.क्षीरसागर यांनी या कामाबाबत खेद व्यक्त करत कामकाज गतिमान करण्याच्या सूचना दिल्या.
या बैठकीत सूचना देताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी, दुसऱ्या सुधारीत विकास आराखड्याअंतर्गत शहरात किती आरक्षणे टाकली होती त्यापैकी किती आरक्षणांचा वापर झाला, सद्यःस्थितीत त्या आरक्षणाचा किंवा इतर आरक्षणांची गरज आहे का, त्याबरोबरच पुढील २० वर्षांत शहराच्या आवश्यक गरजा लक्षात घेऊन त्यानुसार नव्याने लागणारी आरक्षणे टाकणे गरजेचे आहे. शहरात उपनगरे वाढली आहेत त्यामुळे लोकसंख्येनुसार शाळा, हॉस्पिटल, मैदाने, कचरा डेपो, पार्किंग, ट्रक टर्मिनस, स्मशानभूमीसह इतरसाठी आरक्षणे गरजेची आहेत. त्यामुळे तिसऱ्या विकास आराखड्याच्या कामास गती द्यावी. सर्व्हेक्षणासाठी नेमण्यात आलेल्या कंपनीने कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून वेळेत आपली जबाबदारी पूर्ण करावी. उपसंचालक तसेच अतिरिक्त आयुक्त महानगरपालिका यांनी या कामाची जबाबदारी घेवून या प्रक्रियेवर बारकाईने देखरेख करावी, अशा सूचना दिल्या. .
या बैठकीस विकास आराखडा युनिट उपसंचालक धनंजय खोत, विकास आराखडा युनिट उपसंचालक श्रीमती मुल्ला, अतिरिक्त आयुक्त कोल्हापूर महानगरपालिका श्री रोकडे, नगर भूमापन अधिकारी श्री शशिकांत पाटील, उपाधीक्षक भूमी अभिलेख करवीर श्री किरण माने, नगररचनाकार कोल्हापूर महानगरपालिका श्री मस्कर, नगर रचनाकार महानगरपालिका श्री एन एस पाटील आदी उपस्थित होते..