Spread the news

केआयटीत ‘स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन’ चे सलग तिसऱ्या वर्षी आयोजन
राष्ट्रीय स्तरावरील तरुण अभियंत्यांच्या सृजनशीलतेचा साक्षात्कार -डॉ. मोहन वनरोट्टी

विद्यार्थ्यांच्या कल्पक व सृजनशील विचारशक्तीची कसोटी म्हणजेच ‘स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन’ ही देशपातळीवरील स्पर्धा! ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन, शिक्षण मंत्रालयाचा इनोव्हेशन सेल व शिक्षण मंत्रालय भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच रेल्वे मंत्रालय, पर्यावरण मंत्रालय यासारख्या अन्य काही महत्त्वाच्या मंत्रालयांच्या सहकार्याने स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन नावाची तरुणाईची तरुणाईच्या सृजनशील कल्पनेला व वैचारिक क्षमतेला आव्हान देणारी ही राष्ट्रीय स्पर्धा आहे.
सलग तिसऱ्या वर्षी ही स्पर्धा कोल्हापूर येथील केआयटी अभियांत्रिकी स्वायत्त महाविद्यालयात दि. ११ व १२ डिसेंबर २०२४ रोजी संपन्न होत आहे. या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये अंतिम फेरीसाठी १५ राज्यातून ३१ संघ, १९० विद्यार्थी व ३५ मार्गदर्शक प्राध्यापक, परीक्षक सहभागी होणार आहेत, अशी माहिती आज स्पर्धेचे निमंत्रक व केआयटी अभियांत्रिकी (स्वायत्त) महाविद्यालयाचे संचालक डॉ. मोहन वनरोट्टी यांनी दिली. या वर्षी ५ प्रॉब्लेम स्टेटमेंट प्रत्येक विभागात दिले आहेत. सॉफ्टवेअर विकसित करणे या विभागातील प्रोजेक्ट येथे सहभागी होणार आहेत. केआयटीमध्ये सलग ३६ तास हे विद्यार्थी काम करणार आहेत. प्रत्येक प्रॉब्लेम स्टेटमेंट साठी रुपये एक लाख ही विजेत्या संघाला शासनाकडून मिळणारी रक्कम असणार आहे. एकूण पाच लाख रुपयांची बक्षीसे विजेता संघांना प्रदान केली जाणार आहे.
बुधवार दि.११ डिसेंबर २०२४ रोजी स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन चे उद्घाटन श्री. रमेश घरमळकर, आर स्क्वेअर सॉफ्ट टेक्नॉलॉजिज, पुणे यांच्या हस्ते तर स्पर्धेचा समारोप गुरुवार दि. १२ डिसेंबर २०२४ रोजी श्री. उपेंद्र भाळवणीकर, मेटलसा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेच्या योग्य नियोजनासाठी ७५ प्राध्यापक व १५० विद्यार्थी स्वयंसेवक काम करत आहेत. या स्पर्धेसाठी नोडल सेंटर इन्चार्ज म्हणून प्रा.अरुण देसाई व नोडल सेंटर इन्चार्ज एस. पी. ओ. सी. म्हणून प्रा.अजय कापसे हे काम करत आहेत. महाविद्यालयाचे संचालक व नोडल सेंटर चे प्रमुख डॉ. मोहन वनरोट्टी यांनी स्मार्ट इंडिया हॅकॅथॉनच्या आयोजनाची संधी आम्हाला मिळणे हे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट असून देशभरातून येणाऱ्या स्पर्धक विद्यार्थ्यांसाठी आवश्यक त्या सोयी सुविधा महाविद्यालयाच्या वतीने उपलब्ध करून दिल्या जातील असे प्रतिपादन त्यांनी केले. आपल्या परिसरातील विद्यार्थ्यांना यातून नक्कीच विविध अनुभव मिळतील व तेही भविष्यात अशा दर्जेदार प्रकारच्या स्पर्धेच्या माध्यमातून विविध प्रश्नांना समर्पक उत्तरे शोधतील व भारताचे नाव उज्ज्वल करतील असा विश्वास केआयटीचे अध्यक्ष श्री साजिद हुदली यांनी व्यक्त केला. स्मार्ट इंडिया स्पर्धेच्या दर्जेदार नियोजनासाठी उपाध्यक्ष श्री. सचिन मेनन, सचिव श्री. दीपक चौगुले,अन्य विश्वस्त यांचे मोठे प्रोत्साहन मिळत आहे.परिसरातील उद्योग क्षेत्रालाही अशा स्पर्धेच्या हेतू बद्दल सकारात्मक भावना आहे.अशा प्रकारच्या स्पर्धा कोल्हापुरात आयोजित होणे ही कोल्हापूरसाठी अभिमानाची गोष्ट आहे अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!