केआयटीच्या ‘इंक्यूबेशन सेंटरशी’ महाराष्ट्र राज्य शासनाचा सामंजस्य करार
खाजगी (स्वायत्त) शैक्षणिक संस्थांमध्ये फक्त केआयटीची निवड
कोल्हापूर
महाराष्ट्र सरकारच्या सहभागाने व पुढाकाराने राज्याच्या आर्थिक विकासात महत्त्वपूर्ण योगदान देण्यासाठी आणि समाजातील सर्व घटकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी स्टार्ट-अपना सक्षम करणे तसेच स्टार्ट-अप इकोसिस्टमच्या विकासाला चालना देण्यासाठी मजबूत पायाभूत सुविधा विकसित करणे या हेतूने‘महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी’ ची स्थापना झाली आहे.
केआयटीने गेल्या वर्षभरामध्ये जवळपास १० स्टार्टप्सना एकूण ५० लाखापर्यन्ताचा ‘इग्निशन फंड’ दिलेला आहे. तसेच १६ स्टार्टअप च्या कल्पना या कंपनीकडे नोंदणीकृत झालेल्या आहेत.केआयटीच्या वतीने ८ पेटंट फाईल झालेले असून जवळपास १५ हून अधिक विशेष कार्यशाळा या नवोद्योजकांसाठी व नवसंशोधकांसाठी केआयटीने आयोजित केलेल्या आहेत. याची दखल म्हणून या केआयटीला महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी (MSInS), महाराष्ट्र सरकारने इनक्यूबेटर सहकार्य निधी म्हणून रु. ५ कोटी मंजूर केले आहेत.
सीओईपी पुणे चे भाऊ इन्स्टिट्यूट, सह्याद्री फार्म्स ,नाशिक, जितो इंक्युबेशन अँड इनोव्हेशन फाउंडेशन, मुंबई या दर्जेदार संस्थाप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातील खाजगी (स्वायत्त) शैक्षणिक संस्थांमध्ये फक्त केआयटीची निवड केली आहे. सीओईपी बरोबर केआयटी ची निवड होणे हे केआयटीच्या दर्जात्मक कार्याचेच एक द्योतक आहे. महाराष्ट्र शासन व केआयटी मधील सामंजस्य कराराची प्रत महाराष्ट्र राज्याच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नवोपक्रम विकास मंत्रालयाचे मंत्री श्री.मंगल प्रभातजी लोढा यांच्या हस्ते ,कौशल्य विकास विभाग आयुक्त व ‘महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी’ च्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निधी चौधरी (भा.प्र.से.) व सचिव श्री.गणेश पाटील यांच्या उपस्थितीत केआयटीचे संचालक डॉ.मोहन वनरोट्टी व आय.आर.एफ.चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.सुधीर आरळी याच्याकडे सुपूर्द केली.
केआयटी चे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री साजिद हुदली, उपाध्यक्ष श्री. सचिन मेनन, सचिव श्री. दीपक चौगुले यांचे मोठे प्रोत्साहन व मार्गदर्शन या प्रक्रियेसाठी लाभले.केआयटी च्या या दर्जेदार कामगिरी बद्दल सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी संचालक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी,सहभागी नवउद्योजक,परिसरातील मार्गदर्शक उद्योजक यांचे अभिनंदन व आभार व्यक्त केले आहे.
..
फोटो :- केआयटी व महाराष्ट्र सरकार मधील सामंजस्य कराराची प्रत कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नवोपक्रम विकास मंत्रालयाचे मंत्री श्री.मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते केआयटी संचालक डॉ.मोहन वनरोट्टी व आय.आर.एफ. चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.सुधीर आरळी यांना प्रदान.