खासदार शाहू छत्रपतींच्या प्रयत्नातून ६५ कोटींचा निधी मंजूर
कोल्हापूर : गडहिंग्लज – नागनवाडी रस्त्यावरील मोठ्या पूलाच्या बांधकामास ४० कोटी तर कोल्हापुरातील आयटीआय – पाचगांव- वडगांव- खेबवडे – बाचणी या रस्त्यासाठी २५ कोटी असा ६५ कोटींचा निधी वितरीत करण्याास रस्ते, वाहतुक व राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाने प्रशासकीय मंजूर दिली आहे. खासदार शाहू छत्रपती यांनी मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे या कामांसाठी निधीची मागणी करणारे पत्र दिले होते.
गारगोटी – गडहिंग्लज – नागनवाडी रस्त्यावरील भडगांवनजीक नवीन पूल उभारण्याची मागणी नागरिकांतून होत होती. तसेच आयटीआय – पाचगांव- वडगांव- खेबवडे – बाचणी हा ३० किलोमीटर लांबीचा रस्ता खराब झाल्यामुळे नवीन रस्त्याची मागणी होत होती. नागरिकांच्या गैरसोयीची दखल घेत खासदार शाहू छत्रपती यांनी रस्ते, वाहतुक, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली भेट घेऊन त्यांच्याकडे निधीची मागणी केली होती. त्यांनी निधी देण्याचे मान्य केले होते.
गडकरी यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे या दोन कामांसाठी केंद्र शासनाच्या रस्ते, वाहतूक, महामार्ग मंत्रालयाच्या केंद्रीय मार्ग निधीतून ६५ कोटी रुपये मंजूर केल्याने भडगाव जवळील पूलाचा तसेच कोल्हापूर ते बाचणी रस्त्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. लवकरच या कामांना सुरवात केली जाणार आहे.