कोल्हापूर दि.०८ : कोल्हापूरची कला, क्रीडा, कुस्ती आणि सांस्कृतिक ठेवा जपला जावा यासाठी मिरजकर तिकटी या ठिकाणी खासबाग सांस्कृतिक संकुल साकारले जाणार आहे. यासाठी दहा कोटी निधीची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
या पत्रकात पुढे म्हंटले आहे कि, कोल्हापूरला कला, क्रीडा, सांस्कृतिक कार्याची खूप मोठी परंपरा आहे. राजर्षी शाहू महाराजांनी कला, सांस्कृतिक उपक्रमांना राजाश्रय दिला. कोल्हापूर शहराच्या मध्यभागी मिरजकर तिकटी येथे खासबाग सांस्कृतिक संकुल साकारण्यासाठी महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक विभागामार्फत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव योजनेअंतर्गत र.रु.१० कोटी निधीची तरतूद करण्यात आली आहे. “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” साठीच्या एकछत्र योजनेंतर्गत कोल्हापूर येथे खासबाग सांस्कृतिक संकुल उभारण्यात येणार आहे.
खासबाग कुस्ती मैदानला साजेचे असे ऐतिहासिक स्वरूपाची ही वास्तू असेल. या वास्तूमध्ये कोल्हापूरच्या कुस्तीचा संपूर्ण इतिहास चित्र आणि शिल्पाच्या माध्यमातून उभारला जाईल. यासाठी विशेष दालन असेल. त्याचबरोबर कोल्हापूरची कलाक्षेत्रासाठी विशेष दालन असणार आहे. पर्यटनाच्या माध्यमासाठी ही खूप महत्त्वपूर्ण वास्तु असणार आहे. त्यामुळे खासबाग मैदानाला अधिक महत्त्व निर्माण होणार आहे. रंकाळ्याबरोबरच कोल्हापूरकरांसाठी खासबाग सांस्कृतिक संकुल हे महत्त्वाचं स्थान निर्माण करेल.
सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्याकडून “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” अंतर्गत होत असलेल्या खासबाग सांस्कृतिक संकुल च्या माध्यमातून कोल्हापूरची कुस्ती आणि सांस्कृतिक ठेवा जपला जाणार आहे. त्याचबरोबर येणाऱ्या पर्यटकांसाठी ही वास्तु आकर्षण ठरेल, असा विश्वासही आमदार राजेश क्षीरसागर यांनी यावेळी व्यक्त केला.