*केडीसीसी बँकेच्या नवीन इमारतीचे आज उद्घाटन*
*मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार उद्घाटन*
*उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती*
*बँकेचे अध्यक्ष पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती*
*कोल्हापूर, दि. ८:*
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नवीन पाच मजली केंद्र कार्यालय इमारतीचे आज बुधवार दि. ९ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. दुपारी चार वाजता बँकेच्या केंद्र कार्यालय परिसरात हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
बँकेने शाहूपुरीतील केंद्र कार्यालय परिसरात १५ कोटी रुपये खर्चून नवीन पाच मजली इमारत बांधली आहे. बँकेने तंत्रज्ञानात गरुडझेप घेतल्यामुळे बँकेच्या कामकाजाचा विस्तार वाढतच आहे. या नवीन इमारतीत मुख्य शाखा स्थलांतरित होणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ई- लॉबीमध्ये स्वयंचलित पासबुक प्रिंटर आणि तंत्रज्ञानावर आधारित सेवा सुविधा मिळणार आहेत. जिल्ह्यातील कोणत्याही गावातील नागरिक बँकेच्या केंद्र कार्यालयासह १९१ पैकी कोणत्याही शाखेत ऑटोमेटेड मशीनवर खाते उघडू शकणार आहे. चेक वठणावळीसाठीची सुविधाही अगदी सुट्टी दिवशीही दिवसरात्र सुरू राहणार आहे.
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे केंद्र कार्यालय असलेली सध्याची इमारत १९७४ बांधलेली आहे. या सात मजली इमारतीमधून बँकेचे कामकाज सुरू आहे. बँकेचा वाढता व्याप आणि ग्राहकांच्या सोयीसाठी बँकेने ही नवीन इमारत बांधली. या नवीन इमारतीत केंद्र कार्यालयातील मुख्य शाखेसह अकाउंट विभाग, एटीएम विभाग, क्लिअरिंग विभाग, गुंतवणूक विभाग, साखर कारखाना कर्जपुरवठा विभाग, व्यक्तीगत कर्ज पुरवठा विभाग, गुंतवणूक इत्यादी विभाग नव्या इमारतीत स्थलांतरित होणार आहेत.
……………..
*केडीसीसी बँकेने बांधलेल्या या नवीन पाच मजली इमारतीचे उद्घाटन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.*
==========