*केडीसीसी बँकेत पगारवाढीचा करार*
*व्यवस्थापन व दोन्ही युनियनमध्ये निर्णय*
* मंत्री मुश्रीफ यांना पाठबळ श्रीमंत मृगेंद्रसिंहराजे घाटगे यांचे……..!*
*कोल्हापूर, दि. १६:*
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्मचाऱ्यांना पगारवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व बँकेचे अध्यक्ष नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष बैठकीत बँक व्यवस्थापन आणि दोन्ही कर्मचारी युनियनमध्ये तसा करार झाला. यावेळी बँक पदाधिकाऱ्यांसह बँकेत कार्यरत असलेल्या कोल्हापूर डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन, बँक एम्प्लॉईज युनियन या दोन्हीही युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते. एक एप्रिल २०१७ पासून ही पगारवाढ लागू होणार आहे. त्यामुळे, मागील ८८ महिन्यांचा एकूण ३७ कोटी फरकही कर्मचाऱ्यांना दिला जाणार आहे. करारावर पदाधिकाऱ्यांच्या सह्या होताच बँकेच्या केंद्र कार्यालयाच्या प्रांगणात कर्मचाऱ्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून निर्णययाचे स्वागत केले.
पालकमंत्री व बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ म्हणाले, बँकेने अतिशय चांगली प्रगती केली आहे . बँक ज्या परिस्थितीतून गेली त्यावर मात करण्याची शक्ती शेतकऱ्यांनी दिली. पुणे, सांगली, सातारा या जिल्हा बँकांचा अभ्यास करून ही पगार वाढ लागू केली आहे. संचालकानीही मोठ्या मनाने पगारवाढीला संमती दिली आहे. कर्मचाऱ्यांनी बँकेच्या म्हणजेच पर्यायाने शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी अहोरात्र झटावे, असेही ते म्हणाले.
बँक एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष अतुल दिघे म्हणाले, केडीसीसी बँक हे जिल्ह्याचे शक्तिस्थान आहे. ही बँक शेतकऱ्यांची बँक आहे. बँकेच्या सेवा समाजापर्यंत नेण्यासाठी प्रयत्न करूया. बँकेचा कर्मचारी हा “साहेब” असता कामा नये, तो शेतकऱ्यांच्या जवळ जाणारा असावा. सर्वांनी संघटितपणे काम करूया.
कोल्हापूर डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव बँक एम्प्लॉईज युनियनचे जनरल सेक्रेटरी बळीराम पाटील म्हणाले, केडीसीसी बँक अडचणीतून बाहेर आल्याशिवाय पगारवाढीची मागणी करायची नाही अशा सूचना आमचे नेते कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांनी दिले होत्या. त्या सूचनांचे आम्ही तंतोतंत पालन केले. त्यांच्या अनुपस्थितीत प्रथमच हा करार होत आहे. बँकेचे अध्यक्ष व पालकमंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ, संचालक मंडळ व कर्मचारी यांच्या सामंजस्यातून तयार झालेला पगारवाढीचा हा करार स्वागतार्ह आहे.
*ठेव व व्यवसाय वाढीसाठी झोकून द्या……..*
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, व्यवस्थापन खर्च दोन टक्केपेक्षा कमी यावयाचा झाल्यास ठेवींमध्ये व व्यवसायात वाढ झाली पाहिजे. १९१ शाखांचे जाळे असलेली कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी आपली बँक आहे. बँक कर्मचाऱ्यांनी बँक ही आपली माता आहे, या भावनेने काम केले पाहिजे. कारण; या बँकेच्या जीवावरच आपले संसार आणि मुलाबाळांचे भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे ठेव व व्यवसाय वाढीसाठी झोकून देऊन काम करा, असेही ते म्हणाले.
यावेळी बँकेचे उपाध्यक्ष आमदार राजूबाबा आवळे, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, माजी खासदार डॉ. श्रीमती निवेदिता माने, प्रताप उर्फ भैय्या माने, बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, प्रा. अर्जुन आबिटकर, सुधीर देसाई, राजेश पाटील, सौ. श्रुतिका काटकर, सौ. स्मिता गवळी, कर्मचारी प्रतिनिधी आय. बी. मुन्शी, दिलीप लोखंडे आदी संचालक. तसेच; अतुल दिघे, नारायण मिरजकर, प्रकाश जाधव, भगवान पाटील, बळीराम पाटील, आनंदराव परुळेकर आदी युनियनचे पदाधिकारी व प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरख शिंदे, प्रशासन विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
……………………
*कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत बँक व्यवस्थापन व कर्मचारी कर्मचाऱ्यांमध्ये पगारवाढीचा करार झाला. यावेळी बँकेचे अध्यक्ष पालकमंत्री हसन मुश्रीफ, बँकेचे पदाधिकारी व युनियनचे पदाधिकारी.*
===========
: *पाठबळ श्रीमंत मृगेंद्रसिंहराजे घाटगे यांचे……..!*
*श्रीमंत मृगेंद्रसिंहराजे अजितसिंहराजे घाटगे -कागल जुनियर व श्रीमंत अखिलेशराजे मृगेंद्रसिंहराजे घाटगे यांची पालकमंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी कोल्हापूर येथील त्यांच्या निवासस्थानी सदीच्छा भेट घेतली. या भेटीत त्यांनी येत्या विधानसभा निवडणुकीत नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या पाठीशी आहोत, असे स्पष्ट केले. पालकमंत्री नामदार श्री. मुश्रीफसाहेब यांनी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी कागलचे माजी उपनगराध्यक्ष सौरभ पाटील उपस्थित होते.*
===========