*कोल्हापूरचा पाणीपुरवठा आणि मल नि:सारण व्यवस्था सुरळीत होण्यासाठी संयुक्त बैठक संपन्न*
को. दि. १८ : कोल्हापूर शहरातील पाणीपुरवठा आणि मल नि:सारण व्यवस्थेतील नागरिकांच्या समस्या दूर करण्याच्या दृष्टीने आज नागरिक आणि पाणीपुरवठा आणि मल निस्सारण विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक पार पडली. जला अभियंत्यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे शहरातील या दोन्ही व्यवस्था लवकरच सुधारतील असा विश्वास यावेळी नागरिकांनी व्यक्त केला.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या गेल्या साडेतीन वर्षांच्या प्रशासकीय कारकिर्दी मध्ये शहरातील नागरी सुविधांची अक्षरश: दुर्दशा झालेली आहे. रस्ते,पाणीपुरवठा, मलनिस्सारण, घनकचरा व्यवस्थापन अशा सर्वच विषयांमध्ये महापालिकेची यंत्रणा निष्काळजीपणे आणि बेजबाबदार पणे वागत असल्यामुळे नागरिकांना प्रचंड अडीअडचणींना तोंड द्यावे लागत आहे. या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी गेल्या महिन्यात नागरिकांनी प्रथमतः लक्षणीक उपोषण आणि त्यानंतर निदर्शने केली होती व सर्व खात्यांच्या स्वतंत्र बैठका आयोजित कराव्या अशी मागणी केली होती. त्यानंतर अतिरिक्त आयुक्तांनी सर्व खातेप्रमुखांना पत्र देऊन अशा स्वरूपाच्या बैठका आयोजित करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जल अभियंता हर्षजीत घाडगे यांनी पाणीपुरवठा आणि मलनि:सारण विभागाची बैठक आज आयोजित केली होती.
सकाळी ठीक बारा वाजता सुरू झालेल्या बैठकीची सुरुवात करताना अजित ठाणेकर यांनी अशी बैठक घेणारा पहिलाच विभाग ठरल्याबद्दल जल अभियंत्यांचे अभिनंदन करून आभार मानले आणि आंदोलनाची पार्श्वभूमी व बैठकीचा उद्देश विषद केला. सकारात्मक चर्चा होण्याच्या दृष्टीने नागरिकांनी आपले विषय थोडक्यात आणि मुद्देसूद मांडावेत तसेच विनाकारण आक्रमकपणा दाखवू नये असे आवाहन त्यांनी केले.
महानगरपालिकेमध्ये पाणी वितरण नलिका आणि मल निस्सारण नलिका यांचे नकाशे नसल्यामुळे कामात अडचणी आणि जनतेच्या निधीचा अपव्य होत असल्याची तक्रार चंद्रकांत घाडगे यांनी मांडली आणि तातडीने नकाशे करून घेण्याबाबत सुचवले. शहरात ठिकठिकाणी असलेल्या मोठ्या आणि जुनाट गळत्या काढणे, नवीन कनेक्शन घेण्यासाठी आकारण्यात येणारे शुल्क रद्द करून नागरिकांनाच त्यांच्या कामाच्या ठिकाणी पुनर्पृष्ठीकरण करून घेण्याबाबतचे धोरण ठरवणे, अमृत योजनेअंतर्गत टाकलेल्या आणि वितरण नलिका आणि मलनि:सारण नलिका या प्रवाहित करणे अशा विषयावर आपले मत मांडले. प्रदीप उलपे यांनी ज्या भागात मल नि:सारण व्यवस्था नाही अशा भागाचा सांडपाणी अधिभार रद्द करावा अशी मागणी केली. रूपाराणी निकम यांनी शहरात एक समान पाणीपुरवठा असावा असे निवेदन केले, तसेच थेट पाईपलाईन योजना चालू झाल्यानंतरही शहरातील अन्य उपसा केंद्र बंद करू नये असे आग्रही प्रतिपादन केले. चंद्रकांत चव्हाण यांनी उपनलिकेद्वारे ठिकठिकाणी होणाऱ्या पुरवठ्यातील पाण्याच्या गैरवापरावर निर्बंध यावेत आणि विनामीटर पाणी चोरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी अशी आग्रही मागणी केली. विजय देसाई यांनी फुलेवाडी रिंग रोड परिसरातील अनेक समस्या अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. रश्मी साळोखे यांनी अधिकाऱ्यांची अरेरावी कमी न झाल्यास आणि त्यांच्याकडून पाणी वाटपातील अन्याय दूर न झाल्यास नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत होईल असा इशारा दिला. याचबरोबर तानाजी जाधव आणि अनिल पोवार यांनी माजी लोकप्रतिनिधींच्या अनधिकृत जोडण्यांचा अत्यंत गंभीर विषय अधिकाऱ्यांसमोर मांडला. याशिवाय सुनील पाटील, ओंकार गोसावी, गौरव सातपुते, विनय खोपडे, साहिल हवालदार, डॉ.अश्विनी माळकर, प्रा.नीलिमा व्हटकर, यशवंत माने, प्रकाश सरनाईक आदींनी नागरिकांच्या वेगवेगळ्या समस्या बैठकीत उपस्थित केल्या.
या सर्व चर्चेला उत्तर देताना जल अभियंत्यांनी शहरात सुरू असलेल्या विविध कामांचा आढावा सांगितला. थेट पाईपलाईन योजनेचे पाणी शहरात एकसारखे वितरित व्हावे यासाठी शाखा अभियंतांना आपापल्या भागाची वेळापत्रके निश्चित करण्यासंबंधी सूचना दिल्याचे सांगितले. तसेच ज्या भागात अमृत ची नवीन पाईपलाईन टाकलेली आहे तिथे नागरिकांनी त्या लाईनवर आपल्या जोडण्या जोडून घ्याव्यात असे आवाहन करणार असल्याबाबत सांगितले. शहराच्या मध्यवर्ती पाणीपुरवठा बाबत आयआयटी मुंबईच्या एका पेटंट धारक प्रक्रियेनुसार काम सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. थेट पाईपलाईन योजना पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतरही शहरातील इतर उपसा केंद्रे पूर्ण बंद होणार नाहीत, गरज पडल्यास त्यांचा पुरेपूर वापर करता येईल अशा पद्धतीने ती दुरुस्त ठेवली जातील असेही त्यांनी सांगितले. शहरातील पाणी चोरी बाबत प्रशासन गंभीर असून त्यावर लवकरच कठोर कारवाई सुरू होईल याची त्यांनी ग्वाही दिली. त्याचबरोबर नागरिकांच्या अन्य प्रश्नांनाही त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली.
सुमारे अडीच तास चाललेल्या या बैठकीत किरण नकाते, रवींद्र ताम्हणकर, शिवाजी शेटे नरेंद्र राऊत,मंगेश डाकवे, गणेश चव्हाण, राकेश कांबळे, सुनील थारकर, बिपिन मोरे, दयानंद जयकर, दिलीप भोसले, प्रवीणचंद्र शिंदे, गणपत गायकवाड, जयदीप नलवडे, सुभाष माने आदिंसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.