हातात नोकरीची ऑर्डर …मोबाईलवर वडिलांच्या मृत्यूचा मेसेज
कोल्हापूर
अनेक वर्षे तो त्या ऑर्डरची वाट बघत होता, अखेर तो दिवस उगवला, तो क्षण आला, हातात शिक्षक झाल्याची ऑर्डर मिळाली, आनंद गगनात मावेना, पण त्या क्षणी मोबाईलवर मेसेज आला..
वडिलांनी या जगाचा निरोप घेतल्याचा.. ऑर्डर घेण्यासाठी अनेक किलोमीटर लांब आलेल्या त्या शिक्षकाला काय करावं हेच कळेना? त्याचं सगळं अवसान गळाल. अशा वेळी मदतीला धावले ते जिल्हा परिषदेचे अधिकारी. मुलाला वडिलांच्या अंत्यसंस्काराला जाता यावं म्हणून त्याला स्वतःची गाडी देणारा हा अधिकारी आहे… कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन. अजूनही माणुसकी आणि संवेदनशीलता जिवंत असल्याचा हा पुरावा.
घडलेली घटना अशी: पवित्र पोर्टलच्या द्वारे जुन्नर येथील एका युवकाची शिक्षक म्हणून नियुक्ती झाली. अनेक वर्षे त्याची तो प्रतीक्षा करत होता. वडिलांचे एक स्वप्न होतं, मुलगा शिक्षक व्हावा, आपण आयुष्यभर जे काबाडकष्ट केले ते त्याच्या वाटेला येऊ नये. म्हणून तेही प्रतीक्षा करत होते, त्यांची प्रतीक्षा संपली. मुलाची शिक्षक म्हणून निवड झाली. त्यांनाही आनंद झाला.
शिक्षक नियुक्तीची ऑर्डर घेण्यासाठी मुलगा हरिभाऊ विरनक कोल्हापुरात आला. सरकारी विश्रामधाम मध्ये समुपदेशन प्रक्रियेने शाळा देण्याची मोहीम सुरू होती. त्याच्या हातात नोकरीची ऑर्डर आली. त्याचा आनंद गगनात मावेना. चेहऱ्यावर स्वप्नपूर्तीचा आनंद तर होताच शिवाय वडिलांच्या स्वप्नपूर्तीचाही. पण त्या क्षणी मोबाईलवर मेसेज आला, वडिलांनी या जगाचा निरोप घेतल्याचा.
मोबाईलवरचा मेसेज बघताच या युवकाचे अवसानच गळाले. काय करावे काहीच कळेना. एका क्षणात आनंदाचे रूपांतर दुःखात झालं. आता गावी अंत्यसंस्काराला तातडीने जायचं कसं? हा प्रश्न पडला. तो रडू लागला. अश्रू आवरेनात.
त्या क्षणी तेथे असलेल्या जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांना ही गोष्ट समजली. त्यांनी त्याला धीर दिला. अधिकाऱ्याच्या खांद्यावर मान टाकून त्याने दुःखाला वाट मोकळी करून दिली. अधिकाऱ्यानेही त्याला स्वतःची गाडी दिली आणि वडिलांच्या अंत्यसंस्काराला जाण्याची व्यवस्था केली. अजूनही माणुसकी नक्की जिवंत आहे याचाच प्रत्यय या माध्यमातून आला.