जिल्हा बँक देणार लाडक्या बहिणींना कर्ज
10 हजार कोटींचा ठेवीचा टप्पा ओलांडला
कोल्हापूर
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने लाडक्या बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतात आणि ज्यांचे खाते बँकेत आहे, त्यांना विनातारण दहा टक्के दराने कर्ज देण्याची घोषणा बँकेचे अध्यक्ष आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. 30000 पर्यंत हे कर्ज देण्यात येणार आहे. दरम्यान, जिल्हा बँकेने दहा हजार कोटींचा ठेवींचा टप्पा ओलांडल्याचेही त्यांनी सांगितले.
मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक लाख 38 हजार 158 महिलांचे खाते जिल्हा बँकेत आहे. या महिलांना बँकेच्या वतीने तीस हजार रुपये कर्ज देण्यात येणार आहे. मासिक 968 रुपये त्याचा हप्ता असेल. याशिवाय मुख्यमंत्री रोजगार निर्मिती अंतर्गत महिलांना 50 हजार रुपये कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
जिल्हा बँकेने यंदा दहा हजार कोटींच्या ठेवींचा टप्पा पोलांडला असून तब्बल 250 कोटींचा नफा झाल्याची माहितीही त्यांनी दिली. ए आय तंत्रज्ञानाद्वारे शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन उसाचे उत्पादन वाढवण्यासाठी बँक विशेष प्रयत्न करणार असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले. बँकेला अधिक नफा झाल्यामुळे 28 कोटीचा आयकर भरला असल्याचे सांगून पुढील वर्षी 12000 कोटींच्या ठेवी जमा करण्यात येणार असल्याचेही सांगितले. तर नफा 300 कोटी पेक्षा अधिक करण्यासाठी बँक प्रयत्न करणार आहे.
यावेळी आमदार सतेज पाटील, माजी खासदार निवेदिता माने, बँकेचे उपाध्यक्ष राजू आवळे, संचालक भैया माने, संजय घाटगे, बाबासाहेब पाटील आसुरलेकर, रणवीर सिंह गायकवाड, विजयसिंह माने, रणजीत पाटील, श्रुतिका काटकर, स्मिता गवळी बँकेचे कार्यकारी संचालक जी.एम. शिंदे, गजानन देसाई यांच्यासह अनेक संचालक उपस्थित होते.