*जनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरुन संघर्ष करण्याची तयारी ठेवा*
*काँग्रेसचे कोल्हापूर निरीक्षक संजय बालगुडे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन..*
*कोल्हापूर:* काँग्रेस पक्षाच्या बळकटीसाठी प्रयत्नशील. बुथ समित्या मजबूत करण्यावर भर देण्यात येणार..
जनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरुन संघर्ष करण्याची तयारी कार्यकर्त्यांनी ठेवावी. असे आवाहन काँग्रेसचे कोल्हापूर निरीक्षक संजय बालगुडे यांनी केले. जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा कोल्हापूरचे निरीक्षक संजय बालगुडे, दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. आज बुधवारी त्यांनी जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात कोल्हापूर उत्तर आणि कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांची या बैठकीला प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना निरीक्षक संजय बालगुडे यांनी विधानसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नसले तरी या अपयशाने कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये. लोकशाहीमध्ये सत्ता येते आणि जाते. मात्र कार्यकर्त्यानी केवळ सत्तेचा विचार न करता पक्ष वाढीसाठी काम केले पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका केव्हा लागतील याची निश्चितता नाही. त्यामुळे पुढील पाच वर्ष, विरोधकांच्या भूमिकेत असताना जनतेचे प्रश्न समजून घ्या. जनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरुन संघर्ष करण्याची तयारी ठेवा. असे आवाहनही त्यांनी केले.
आम. सतेज पाटील यांनी काँग्रेसचा विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आंदोलनातून कार्यकर्त्यांनी सक्रिय राहीले पाहिजे. येत्या काळात संघटनात्मक ताकद दाखवण्यासाठी शिस्तबद्ध आणि नियोजनातून जनसंपर्काचे काम वाढवणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीची मतदानाची आकडेवारी पाहता जिल्ह्यात साडे दहा लाख मते महाविकास आघाडीला मिळाली आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यानी नाराज होऊ नये. अपयशाने कार्यकर्त्यांनी गोंधळून जाऊ नये. असे आवाहन आम. सतेज पाटील यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची साक्ष देणारा प्रतापगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते करण्यात आले. रायगडावरील मेघ डंबरीतील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काँग्रेसच्या काळात बसवला गेला. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जपण्याचं काम सातत्याने काँग्रेसने केले. 18 ते 25 वयो गटातील तरूण मुलांना काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणे पटवून द्या. असे आवाहनही त्यांनी केले. पक्षा पेक्षा मोठे समजू नका पक्षासाठी काम करा. काँग्रेस पक्ष म्हणजे आपले घर मानून काम करा..सोशल मीडियावर ॲक्टिव्ह रहा. मी म्हणजे पक्ष नाही पक्ष निरंतन चालत राहील. ही भावना मनात ठेऊन काम करा. असेही आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.
दरम्यान यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, माजी नगरसेवक तौफिक मुल्लाणी, माजी नगरसेविका भारती पोवार, संपत चव्हाण, एन. एन. पाटील, सरलाताई पाटील, राणी खंडागळे, संजय पटकारे, प्रवीण पाटील, उदय पोवार आदी कार्यकर्त्यानी बैठकीत विविध सूचना केल्या. महिलांचे व्हाट्सॲप ग्रुप तयार करुन त्यांचे संघटन करणे. विशिष्ट समाजासाठी काँग्रेस पक्ष कामे करतो असा गैर समज पसरवण्यात येत आहे. मात्र काँगेस पक्ष संविधाना प्रमाणे कामे करतो. काँग्रेसच्या काळात खऱ्या अर्थाने देशाची प्रगती साधली गेली. हे आताच्या पिढीला पटवून देऊया. काँग्रेसची ध्येय धोरणे पक्षाचे विचार तरुणांच्या पर्यंत पोहचवण्याची गरज असुन त्यासाठी पक्षाने वरिष्ठ पातळीवर कार्यक्रम निश्चित करावा. अशी मागणीही कार्यकर्त्यांनी या बैठकीत केली.
या बैठकीला माजी उपमहापौर विक्रम जरग, माजी नगरसेवक मधुकर रामाणे, माजी नगरसेवक राहूल माने, शहराध्यक्षा संध्या घोटणे, दुर्वास कदम, राजू साबळे, रियाज सुभेदार, जय पटकारे, दुर्वास कदम, यांच्यासह काँग्रेसचे विविध सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.