जनताच मुश्रीफांची सुरत लुटणार आणि तुतारी जिंकणार
समरजितसिंह घाटगे : म्हाकवेतील जाहीर सभेस उच्चांकी गर्दी
मुश्रीफांनी निष्ठा विकली…लाल दिव्याची गाडी मिळविली
समरजितसिंह घाटगे : म्हाकवेत जाहीर सभा;
म्हाकवे,ता.१५: दिवंगत लोकनेते सदाशिवराव मंडलिक व राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी हसन मुश्रीफ यांना अल्पसंख्याक असतानाही भरभरून दिले. या वडीलांसमान नेत्यांना ऐनवेळी दगा दिला. सर्व निष्ठा विकुन मुश्रीफांनी लाल दिव्याची गाडी मिळविली. अशा गद्दार भस्मासुराला गाडून स्व.मंडलिक साहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकवेळ संधी द्या. पालकमंत्री मुश्रीफ साहेबांना असे वाटते की, पैशाने सगळं विकत घेता येते. सर्वसामान्य माणसांच्या टॅक्स मधून आलेल्या पैशातूनच विकासकामे होतात. या विकासकामातील तुम्ही पैसे खाल्ले आहेत. त्यामुळे जनता तुमची सुरत लुटणार आणि तुतारी जिंकणार असे प्रतिपादन महाविकास आघाडीचे उमेदवार समरजितसिंह घाटगे यांनी केले.
म्हाकवे येथे आयोजित जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पी.डी. चौगुले होते.
समरजितसिंह घाटगे म्हणाले, ही निवडणूक पालकमंत्री मुश्रीफ आणि समरजीतसिंह घाटगे यांची राहिलीच नाही. स्वाभिमानी जनतेने गद्दाराला काढण्यासाठी निवडणूक हातात घेतले आहे.कागल गडहिंग्लज उत्तुर विधानसभा मतदारसंघात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान धोक्यात आले आहे. पालकमंत्र्यांना महिलांचा आदर करावा असे वाटत नाही. हसन मुश्रीफसाहेब दलित समाजाला आता तुमचे भावनिक भाषण नको आहे. तुमच्यामध्ये धाडस असेल तर पंचवीस वर्षात दलित समाजातील किती तरुणांना उद्योगधंदे उभारण्यासाठी सहकार्य केले ते जाहीरपणाने सांगावे.
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पंचवीस वर्षे काम केल्यानंतरही त्यांना पैसे देऊन, वेश बदलून खोटे वासुदेव का आणावे लागतात. खरोखरच तुम्ही पंचवीस वर्षे काम केले असता तर अशी परिस्थिती आली नसती.
स्वातीताई कोरी म्हणाल्या” गडहिंग्लज साखर कारखाना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी बंद पाडण्याचे पाप केले. गडहिंग्लज शहराला खाजगी मालमत्ता समजून त्यांनी विकायला काढले आहे. मी म्हणेल ती पूर्व दिशा,त्यांची हुकूमशाही व दडपशाही सुरु आहे.
या त्यांच्या प्रवृत्तीला मूठमाती देऊया.
दत्तोपंत वालावलकर म्हणाले,” गेली पंचवीस वर्षे आम्ही मुश्रीफांच्या विचारधारेला विरोध करत आलो आहे. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता या त्यांच्या धोरणाविरोधात आम्ही काम केले आहे. या निवडणुकीत संजयबाबा घाटगे यांनी विचार बदलला, मुश्रीफांना पाठिंबा देण्याचे जाहीर केले. म्हणून आम्ही बाबांसोबत गेलो नाही. मुश्रीफांनी आम्हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना दिलेला त्रास, तुम्ही विसरला असाल. पण आम्ही तीळभरही विसरलेलो नाही.”
यावेळी बोलताना ॲड .सुरेश कुराडे म्हणाले,” स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांची या गावाशी नाळ खूप घट्ट जुळलेली आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना गाढण्याचं स्व.मंडलिकांचे अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याचा निरोप घेऊनच मी आपल्याकडे आलो आहे.”
स्वागत रविंद्र पाटील यांनी तर प्रास्ताविक दत्तात्रय पाटील यांनी केले. यावेळी संभाजी भोकरे,
दत्तात्रय कांबळे, निकिता पाटील, राज कांबळे, सागर कोंडेकर, शिवाजी कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. सभेस सरपंच कविता पाटील उपसरपंच रणजीत लोहार, तंटामुक्त अध्यक्ष विलास पाटील, संदीप पाटील, अजित पाटील आनंदराव पाटील,अशालता कांबळे, भारत चौगुले, रघुनाथ पाटील आदी उपस्थित होते.आभार माजी उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य धनंजय पाटील यांनी मानले.
—
चौकट – मुश्रीफसाहेब ४० हजार लोकांना कायदेशीर शेअर्स देण्याचे अभिवचन द्या…
पालकमंत्री हसन मुश्रीफसाहेब तुम्ही हमीदवाडा कारखान्याची दोनदा निवडणूक लावली. हा कारखाना तुमच्या ताब्यात येत नाही म्हटल्यावर तुम्ही सर सेनापती संताजी घोरपडे हा खाजगी साखर कारखाना उभारण्याचा निर्णय घेतला. या कारखान्याचे शेअर्स घेण्यासाठी माझ्यासह अनेक कार्यकर्ते गावोगावी फिरले. सर्वसामान्यासह चाळीस हजार लोकांनी दहा हजार रुपये प्रमाणे तुमच्याकडे शेअर्स रक्कम जमा केली. पण मुश्रीफसाहेब तुम्ही या लोकांना कायदेशीर शेअर्स दिले नाहीत. तुम्ही 40 हजार लोकांना फसवले आहे. तुम्ही तुमची ही चूक मोठ्या मनाने मान्य करा. आणि या एक-दोन दिवसात जाहीरपणाने या चाळीस हजार लोकांना कायदेशीर शेअर्स देण्याचे अभिवचन द्या. असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कागल तालुकाध्यक्ष शिवानंद माळी यांनी केले.
—
फोटो ओळ – म्हाकवे :