जंगलवाटातून शाहू छत्रपती धनगरवाड्यावर ! नागरिक सुखावले !!

Spread the news

जंगलवाटातून शाहू छत्रपती धनगरवाड्यावर ! नागरिक सुखावले !!

 

शाहू महाराजांच्या विजयाच्या घोषणा, परिसराचा बदलला नूर

 

कोल्हापूर : चहूबाजूंनी घनदाट जंगल, सारा प्रदेश डोंगरझाडीचा, पक्क्या रस्त्यांचा अभाव, जवळपास दहा किलोमीटर अंतरावर मुख्य रस्ता, एखादी वस्तू आणायची म्हटले की दोन अडीच मैल अंतराची पायपीट ठरलेली… जंगली जनावरांच्या भीतीने सायंकाळी पाच नंतर घराचे दरवाजे बंद… हे चित्र आहे, बांद्राई धनगर वाडा येथील. चंदगड तालुक्यात हा भाग. या जंगलवाटेतून शाहू महाराज येथील नागरिकांना भेटण्यासाठी दाखल झाले आणि साऱ्या परिसराचा नूरच बदलून गेला. शाहू छत्रपतींना समोर पाहून सर्वसामान्य नागरिकांच्या आनंदाला पारावर उरला नाही. साहजिकच साऱ्यांच्या मुखातून “शाहू छत्रपती की जय”अशा घोषणा उमटल्या.

 

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती हे 28 व 29 मार्च रोजी चंदगड तालुका दौऱ्यावर आहेत. या दोऱ्यात विविध भागात भेटी दिल्या. नागरिकाशी संवाद साधला. शुक्रवारी 29 मार्च रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास शाहू छत्रपती हे बांद्राई धनगरवाडा येथे पोहोचले. यावेळी चंदगड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संभाजीराव देसाई, टीम सतेजचे पदाधिकारी सोबत होते.

बांद्राई धनगरवाडा हा परिसर विकासाच्या मुख्य प्रवाहापासून कोसो दूर लांब. चार वर्षांपूर्वी या गावात लाईट आली. गावात एकूण 22 कुटुंबे, अडीशेच्या आसपास लोक वस्ती. चंदगडपासून साधारणपणे 30 किलोमीटर अंतरावर हा वाडा.जंगलाच्या मध्यभागी वसलेला.आसपास चारी बाजूने गच्च झाडी. धनगर वाड्यापासून मुख्य रस्ता दहा किलोमीटर अंतरावर. मुख्य रस्त्यापासून धनगरवाडापर्यंत पोहोचण्यासाठी कच्चा रस्ता. घरे कौलारूची, काही विटांनी बांधलेली. काही घरांच्या भिंतीभोवती प्लास्टिकचे आवरण.

“रोजगारासाठी मैल दोन मैल अंतर चालत जायचे. आतापर्यंत धनगर वाड्याला कुठल्याच लोकप्रतिनिधींनी भेट दिली नाही. शाहू छत्रपती धनगरवाड्यावर आले, आमच्याशी बोलले. हा आमच्या दृष्टीने खूप आनंदाचा क्षण आहे.”अशा प्रतिक्रिया या भागातील धोंडीबा डोईफोडे भागूबाई लांबोरे यांनी व्यक्त केल्या‌.

दरम्यान, शाहू छत्रपती धनगर वाडा येथे येणार आहेत हे समजताच येथी नागरिकांच्या आनंदाला भरती आले होते. नागरिकांनी साऱ्या परिसराची साफसफाई केली होती .घरासमोरील अंगण सारवले. छानशी रांगोळी काढली. शाहू छत्रपतींचे आगमन होताच साऱ्यांनीच त्यांचा जयघोष केला‌. सारा धनगरवाडा एका घरात एकवटला. महिलांनी शाहू छत्रपतींचे औक्षण केले. शाहू छत्रपतींनी प्रत्येकाशी संवाद साधला. लहान मुलांच्या सोबत फोटो घेतले. अर्धा पाऊण तासाच्या भेटीने या परिसराचा माहौलच बदलून गेला. हाताला रोजगार, पक्का रस्ता यासंबंधीची मागणी येथील नागरिकांनी केल्या. शाहू छत्रपती, “जरूर तुमच्या प्रश्नांची सोडवणूक करू” अशी ग्वाही दिली. शाहू महाराज धनगरवाडा येथून परतताना पुन्हा एकदा साऱ्यांनी, ” शाहू छत्रपती की जय”अशा घोषणा दिल्या. शाहू छत्रपतींच्या भेटीने धनगरवाडावासियांची स्थिती आकाश झाल्यासारखे झाली होती


Spread the news

You may also like

error: Content is protected !!