*ऊस शेतीत सहज हाताळता येणारी छोटी यंत्रे विकसित होणे आवश्यक*
*समरजितसिंह घाटगे*
*व्हीएसआयच्या पंचवार्षिक पुनरावलोकन समितीची ‘शाहू’स भेट*
कागल,प्रतिनिधी.
खात्रीशीर उत्पादनाची हमी असलेल्या ऊस शेतीतील मजूर टंचाईवर मात करण्यासाठी सहज हाताळता येणारी छोटी यंत्रे विकसित होणे आवश्यक आहे.असे स्पष्ट मत शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी व्यक्त केले.
सहकारी साखर कारखान्यांची शिखर संस्था असलेल्या पुणे येथील व्हीएसआयच्या पंचवार्षिक पुनरावलोकन समितीने कागलच्या शाहू साखर कारखान्यास भेट दिली.यावेळी घाटगे बोलत होते.
समितीमध्ये राहुरी,अकोला व दापोली कृषी विद्यापीठाचे निवृत्त कुलगुरू अनुक्रमे डॉ.एस.एन.पुरी,डॉ.व्ही.एम. मायंडे,डॉ.के.ई.लवंडे,शास्त्रज्ञ डॉ.ए.डी. कडलग यांचा समावेश होता.
घाटगे पुढे म्हणाले,ऊस शेतीत फवारणीसाठीचे ड्रोन,एआय तंत्रज्ञान व ऊस वाहतुकीच्या वाहनांना सीएनजी वापरास शासनाकडून सवलतीसह प्रोत्साहन मिळणे आवश्यक आहे.रासायनिक,जैविक व विद्राव्य खते वाजवी किंमतीत सहज उपल्बध झाली पाहिजेत.ऊसाच्या थेट रसापासून इथेनॉल निर्मितीसह साखर निर्यातीचे धोरण कारखानदार व पर्यायाने शेतकऱ्यांसाठी फायद्याचे आहे.मात्र इथेनॉलबाबतचे सरकारचे धोरण ठोस असावे.साखर विक्री दरात वाढ होणे गरजेचे आहे.
यावेळी समितीने ऊसाशिवाय शुगर बीटसारख्या पिकाच्या पर्यायातून कारखान्यांचा हंगाम किमान एक महिना वाढल्यास शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळेल तर कारखान्यांचा उत्पादन खर्च कमी होईल.यावेळी थेट ऊसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीच्या शासनाच्या धोरणाचा विविध घटकांवर होणाऱ्या परिणामांची तसेच ऊस पिकातील आंतरपिके,खत,रोग-कीड व्यवस्थापन या विषयावर चर्चा झाली. त्यांनी उपउत्पादनांसह कृतीशील ऊस विभाग राबविणा-या शाहू कारखान्याचे इतर कारखान्यांनी अनुकरण करावे.असे गौरवोद्गार काढले.सध्या शेतकरी व कारखानदारांसमोर असलेल्या अडचणी व यावर व्हीएसआयकडून अपेक्षित उपाययोजनांबाबतही सविस्तर चर्चा केली.
समितीने कारखाना प्रक्षेत्रावर लागवड केलेल्या विविध ऊस जातींची पाहणी केली.यावेळी उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे,संचालक युवराज पाटील,शेती अधिकारी दिलीप जाधव यांच्यासह कृषी अधिकारी उपस्थित होते.
कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांनी स्वागत व प्रास्तविक केले.शेती अधिकारी दिलीप जाधव यांनी आभार मानले.
छायाचित्र-कोल्हापूर येथे व्हीएसआयच्या पंचवार्षिक पुनरावलोकन समिती सदस्यांच्या स्वागतवेळी समरजितसिंह घाटगे, सुहासिनीदेवी घाटगे व इतर
चौकट
महापुरासह जादा पाऊस होणाऱ्या क्षेत्रात तग धरणारी ऊस जात संशोधित करा-श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे
अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे म्हणाल्या,शेतकऱ्यांना उपलब्ध क्षेत्रामध्ये खर्च कमी करून उत्पादन वाढीचे आधुनिक तंत्रज्ञान द्यावे.तर महापुरासह जादा पाऊस होणाऱ्या क्षेत्रात तग धरणारी ऊस जात संशोधित करावी.८६०३२ या सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या जातीला पर्यायी जात देणे आवश्यक आहे.