संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी शाहू महाराज संसदेत जाणे अत्यावश्यक  सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी यांची भूमिका

Spread the news

संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी शाहू महाराज संसदेत जाणे अत्यावश्यक
 सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी यांची भूमिका
कोल्हापूर
देशात लोकशाही संकटात आली आहे, संविधान बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे. देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे सुरू आहे. अशावेळी शाहू महाराज छत्रपती यांच्यासारखे खासदार दिल्लीत संसदेत असणे अत्यावश्यक आहे, असे मत महात्मा गांधी यांचे पणतू ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तुषार  गांधी यांनी व्यक्त केले.
तुषार गांधी यांनी गुरुवारी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांची भेट घेतली. संविधान वाचवण्यासाठी आणि लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी महाराज ज्या पद्धतीने मैदानात उतरले आहेत, हा त्यांचा धाडसी निर्णय असल्याने त्यांचा सर्व कोल्हापूरकरांना अभिमान वाटतो असे सांगून त्यांना पाठिंबा देत असल्याचे गांधी यांनी यावेळी स्पष्ट केले. आमदार पी. एन. पाटील, सदाशिव डोंगळे यांच्या समवेत गांधी यांनी महाराजांची भेट घेतली आणि लोकसभा निवडणुकीत महाराज  विजयी व्हावेत यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
गांधी म्हणाले, रा. शाहू महाराज यांच्या विषयी महात्मा गांधी यांच्या मनात अतिशय आदराची भावना होती . काही लेखांमध्ये त्यांनी त्याचा उल्लेख ही केला होता. सध्या देशात लोकशाही धोक्यात आहे. कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. देशभरात या घराण्याला मान आहे. शिवाजी महाराजांच्या पासून ते रा. शाहू महाराजांच्या पर्यंत सर्वांनीच अन्यायाविरोधात आवाज उठवला.  तेच काम आज शाहू महाराज हे करत आहेत. याचा सर्वांनाच अभिमान आहे.
शाहू महाराजांनी दिल्लीत संविधान वाचवण्यासाठी लढा उभारावा, त्याला आपला नेहमीच पाठिंबा असेल असे सांगून ते म्हणाले, समतावादी, विचारवंतांचा सध्या जो लढा सुरू आहे, त्याला महाराजांच्या उमेदवारीने ताकद मिळाली आहे. महाराजांसारखे लढाऊ व्यक्तिमत्व संसदेत गेल्यानंतर या लढ्याला मोठी ताकद मिळणार आहे. ही ताकद देण्याची जबाबदारी आता कोल्हापूरकरांची आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.

Spread the news

You may also like

error: Content is protected !!