*महायुती सरकारच्या निषेधार्थ कोल्हापूरमध्ये कडकडीत बंद*
-आमदार सतेज पाटील यांची माहिती
-इंडिया आघाडी-महाविकास आघाडीची बैठक
कोल्हापूर
राज्यात सातत्याने लैंगिक अत्याचाराच्या घटना घडत असून त्याला प्रतिबंध घालण्यास महायुती सरकार अपयशी ठरले आहे. या महायुती सरकारला जागे करण्यासाठी आणि निषेध करण्यासाठी उद्या शनिवारी कोल्हापूरसह राज्यात कडकडीत बंद पाळला जाईल, अशी माहिती कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी दिली. कोल्हापूर शहरातून काढल्या जाणाऱ्या निषेध रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी सकाळी साडेनऊ वाजता बिंदू चौक येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आमदार पाटील यांनी केले. यावेळी इंडिया आघाडीतील विविध नेत्यांनी महायुती शासनाचा निषेध केला.
बदलापूर येथे २ लहान मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटनेचा सर्व थरातून निषेध होत आहे. राज्यात वारंवार घडणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांच्या आणि कायदा सुव्यवस्था बिघडल्याच्या निषेधार्थ महायुती शासनाला जागे करण्यासाठी राज्यातील इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीच्यावतीने उद्या शनिवारी राज्यात बंद पुकारण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर बंदची हाक देण्यासाठी काँग्रेस कमिटीमध्ये आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीची संयुक्त बैठक झाली. शिये येथे १० वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याची घटना गुरुवारी उघडकीला आलीय. यावेळी त्या मृत मुलीला श्रद्धांजली वाहण्यात आली
यावेळी आमदार सतेज पाटील म्हणाले, बदलापूर येथे दोन लहान मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेची तक्रार घेण्यासाठी विलंब करण्यात आला. संबंधित शिक्षण संस्था ही भाजपाच्या पदाधिकाऱ्यांशी संबंधित असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी महिला पत्रकारांचा अवमान केला होता. त्यामुळे या महायुती सरकारची विकृत मानसिकता उघड झाली आहे. यातील संशयित आरोपीला वाचण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे सरकारला उच्च न्यायालयाने जाब विचारला. महायुती सरकारकडून दबावाचे राजकारण सुरू आहे. मात्र जनतेचा आवाज दाबला जाणार नाही.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुती सरकारला कोल्हापूरचा हिसका दाखवला आहे. कोल्हापुरात प्रेमाची आणि बंधूभावाची भाषा चालते, दादागिरीची भाषा खपवून घेतली जात नाही. नेमकं काय बोलतो आणि काय करतो याचे भान मुख्यमंत्र्यांना राहिलेले नाही. कोल्हापूर अशांत करून राजर्षि छत्रपती शाहूं महाराजांची भूमी बदनाम करण्याचा प्रयत्न काही लोकांकडून सुरु आहे .या प्रकारामुळेच कोल्हापुरात उद्योग येत नाहीत.
बदलापूरसह राज्यात लैंगिक अत्याचाराच्या घटना वारवार घडत आहे, त्यामुळे कायदा सुव्यवस्था धोक्यात आली आहे. या घटना रोखण्यात अपयशी ठरलेल्या महायुती शासनाचा निषेध करण्यासाठी राज्याबरोबरच कोल्हापुरात उद्या शनिवारी कडकडीत बंद पाळला जाणार आहे. या बंदमध्ये कोल्हापुरातील महिला, नागरिक, उद्योजक, व्यावसायिक यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा. शनिवारी बिंदू चौक इथून स्टेशन रोडसह ,शहरातील प्रमुख मार्गावरून ही निषेध रॅली काढली जाणार आहे. त्यासाठी सकाळी साडेनऊ वाजता बिंदू चौक येथे सर्वांनी एकत्र येऊन निषेध रॅलीमध्ये सहभागी व्हा अस आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले.
*बंदला गालबोट लागणार नाही दक्षता घ्या*
शनिवारी इंडिया आघाडी व महाविकास आघाडीच्यावतीने पुकारलेल्या बंदमध्ये कोल्हापूर जिल्ह्याबाहेरील लोक येऊन या बंदला गालबोट लावण्याची शक्यता नाकारत येत नाही. त्यामुळे सर्वांनी दक्षता घ्यावी असेआमदार सतेज पाटील यांनी केले.
काँग्रेसचे शहर प्रमुख सचिन चव्हाण यांनी महायुती सरकारच्या विरोधातील या बंदमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे यांनी कोल्हापूकरांनी ताकद दाखवावी असे आवाहन केले. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष आर . के . पोवार म्हणाले, जनतेला कोणताही त्रास न होता उद्याचा बंद शांततामय मार्गान करूया.
शिवसेनेचे उपनेते आणि जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले, राज्यात खून, मारामारी, लैंगिक अत्याचार अशा घटनांमध्ये वाढ होऊन कायदा सुव्यवस्थेचा वाटोळ झाले आहे. गृहखात पूर्णपणे अपयशी ठरले आहे.
समाजवादी पार्टीचे शिवाजीराव परुळेकर म्हणाले, मागील ३ दिवसांमध्ये राज्यातील ८ जिल्ह्यात १२ अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत .राज्यातील १ लाख महिला बेपत्ता झाल्या आहेत आणि महायुतीचं सरकार लाडकी बहीण योजनेचा टेंभा मिरवत फिरत आहे.
दुर्वास कदम म्हणाले, राज्यात अत्याचाराच्या घटना घडत असून , मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री स्वतःवर फुलं उधळून घेत आहेत, हे निषेधार्ह आहे.
राष्ट्रवादी शरचंद्र पवार गटाचे अनिल घाटगे म्हणाले, राज्यातील कायदा सुव्यवस्था ढासळली असून वारंवार लैंगिक अत्याचाराच्या घटना घडत आहेत . याला प्रतिबंध घालण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे कुचकामी ठरले आहे.
अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक म्हणाले, सरकारच्या पैशान सध्या महायुतीचा प्रचार सुरू आहे. राज्यात वारंवार घडणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमुळ या महायुती सरकारच्याविरोधात महिलांसह जनतेतून चीड निर्माण झाली आहे . , आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव संदीप देसाई म्हणाले, बदलापूर सारख्या दुर्दैवी घटनांमुळे सरकाररोधात महिला वर्गात प्रचंड असंतोष आहे. आता रस्त्यावर उतरून राग व्यक्त करण्याची वेळ आली आहे.
ठाकरे गट शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे म्हणाले, शिये येथे १० वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिचा खून झाल्याची घटना उघडकीला आली आहे. लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी आलेले मुख्यमंत्री विमानतळावर पोहोचल्यानंतर पोलिसांना या घटनेबाबत जाग आली. यात कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्यासह पोलीस दलाचा निष्क्रियपणा उघड झाला आहे. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक शासनाच्या ताटाखालची मांजरं झाल्याचा घणाघात त्यानी केला.
कॉम्रेड चंद्रकांत यादव म्हणाले, बदलापूर आणि कोल्हापूरच्या पोलिसांच वर्तन एकसारख्याच आहेत. अशा प्रवृत्तीला जन चळवळीच्या रेट्याद्वारेच विरोध केला पाहिजे. कॉम्रेड दिलीप पवार म्हणाले, राज्यात महिला आणि मुलांवर वारंवार घडणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमुळ राज्याच गृहखात निष्क्रिय झाल्याच स्पष्ट होते. यासाठी जनतेन हातात काठी घेऊन उभारल पाहिजे.
वेळी आमदार जयश्रीताई जाधव, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, भारती पोवार, गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगले मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे विवेकानंद गोडसे, मोहन सालपे, राजू लाटकर, रघुनाथ कांबळे, आम आदमी पार्टीचे उत्तम पाटील , युवराज गवळी, संजय पोवार – वाईकर, संभाजीराव जगदाळे, अवधूत पाटील यांच्यासह इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी तसच कार्यकर्ते मोठ्या संख्येन उपस्थित होते.