मी कधीही चुकलो नाही आणि चुकणारही नाही : राजेश क्षीरसागर
– पापाची तिकटी येथील प्रचारसभेला महिलांचा प्रतिसाद
कोल्हापूर, दि. 15 :
गेल्या पंधरा वर्षात मी शहरात विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. त्यापूर्वी दहा वर्षे राज्यात विरोधकांची सत्ता होती. कोल्हापूर महानगरपालिका त्यांच्या ताब्यात होती. या काळात विरोधकांनी काय केले, असा सवाल राजेश क्षीरसागर यांनी केला.
पापाची तिकटी येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी शिवसेना उपनेत्या जयश्री जाधव, निरीक्षक उदय सावंत, सुजित चव्हाण, आदिल फरास, महेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना क्षीरसागर म्हणाले, आई अंबाबाईची शपथ घेऊन सांगतो मी आयुष्यात कधी चुकलो नाही आणि चुकणारही नाही. विरोधक अफवा पसरवत आहेत. लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत. माझ्या प्रचारसभाना मिळत असलेला प्रतिसाद पाहून त्यांना धडकी भरली असल्याचे ते म्हणाले. आगामी काळात शहरातील शंभर टक्के रस्ते सिमेंटचे करण्याचे नियोजन आहे. रस्ता कामाची वर्क ऑर्डर झाली नाही म्हणता तर समोरासमोर या मी वर्क ऑर्डर दाखवतो. ती नसेल तर मी सन्यास घेतो. वर्क ऑर्डर असेल तर तुम्ही सन्यास घ्या, असे आव्हान क्षीरसागर यांनी दिले.
आगामी काळात कोल्हापुरात उच्च न्यायालयाचे खंडपीठ, अंबाबाई तीर्थक्षेत्र, शहराची हद्दवाढ, आयटी पार्क, भव्य फुटबॉल संकुल ही माझ्यासमोर असलेली महत्त्वाची कामे आहेत. कोणत्याही परिस्थितीत ही कामे मार्गी लावली जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी बोलताना आदिल फरास यांनी, काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांच्या पालिकेतील कामाची कुंडली माझ्याकडे आहे. यामुळे कोल्हापूर महानगरपालिका आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी वाट्टेल ते करणाऱ्या नेत्यांनी क्षीरसागर यांच्यावर आरोप करण्यापूर्वी स्वतःचा चेहरा आरशात बघावा, असे आव्हान त्यांनी दिले.
स्वतःला सर्वसामान्य म्हणवणाऱ्या राजेश लाटकर यांनी पालिकेत केलेला कारभार जनतेला चांगलाच ठाऊक आहे. ते सर्वसामान्य आहेत तर मग त्यांच्या कुटुंबाची संपत्ती साडेतीन कोटी रुपये कशी, याचे उत्तर जनतेला द्यावे, असेही फरास म्हणाले.
यावेळी ऋतुराज क्षीरसागर, बाळासाहेब काळे, आनंदराव माजगावकर, विश्वनाथ सांगावकर, भरत काळे, शिवाजी गवळी, बबन गवळी, संदीप ढणाल, अभिजित गजगेश्वर, सचिन ढणाल, प्रकाश भालकर, अक्षय कुंभार, अरविंद दुर्गुळे, पप्पू रजपूत, आशिष पाडळकर, प्रकाश भोसले, निलेश हंकारे, अवधूत कलकुटकी, राहुल खुपेरकर, सचिन भोळे, नितीन ब्रम्हपुरे, सुमित ब्रम्हपुरे आदी उपस्थित होते.