- 9*मी महायुतीचाच घटक आहे…..!*
*माजी खासदार प्रा. संजय मंडलिक यांची स्पष्टोक्ती*
*मी यांच्याबरोबर आहे, त्यांच्याबरोबर आहे असा वेगळा खुलासा करायची गरजच नाही*
*विधानसभा निवडणुकीत पालकमंत्री मुश्रीफांना सर्वजण साथ देऊया*
*बिद्री, दि. १७:*
मी यांच्याबरोबर आहे, त्यांच्याबरोबर आहे हे सांगायची आणि वेगळा खुलासा करायची गरजच नाही. मी महायुतीचाच घटक आहे, असे स्पष्ट प्रतिपादन माजी खासदार संजय सदाशिवराव मंडलिक यांनी केले. महायुतीचे शासन आणि पालकमंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांच्या माध्यमातून कागल तालुक्यात फार मोठे विकासकाम झाले आहे, हे विचारात घेऊन पुढच्या निवडणुकीत आपण सर्वजण त्यांना साथ देऊया. पुढच्या काळात कागल तालुका महाराष्ट्रात सर्वोत्कृष्ट तालुका करण्याचे ध्येय पालकमंत्री श्री. मुश्रीफसाहेब व आम्ही सगळ्यांनी घेतले आहे, त्याला साथ द्या. कागल तालुका पुन्हा नव्या उंचीवर नेऊया, असेही ते म्हणाले.
बिद्री ता. कागल येथे विकासकामांची उद्घाटने व लोकार्पण कार्यक्रमात प्रा. मंडलिक अध्यक्षस्थानावरून बोलत होते. मंत्री श्री. मुश्रीफ यांनी श्री. महादेव मंदिरासाठी पहिल्या टप्प्यात ५० लाख रुपये, श्री. भावेश्वरी मंदिरासमोर खुले सभागृह व पेविंग ब्लॉक आणि मराठा भवन ही कामे पूर्णत्वाला नेऊ, असेही सांगितले.
भाषणात प्रा. मंडलिक म्हणाले, गेली अनेक वर्षे स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिकसाहेब, पालकमंत्री हसनसाहेब मुश्रीफ व मला आशीर्वाद देणारे बिद्री हे गाव आहे. महायुतीचे शासन आणि मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या माध्यमातून कागल तालुक्यात प्रचंड विकासकाम झालेले आहे, हे विचारात घेऊन विधानसभा निवडणुकीत त्यांना साथ देऊया.
स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक, पालकमंत्री हसनसाहेब मुश्रीफ व तुमचा- आमचा सगळ्यांचाच दलित समाज व अल्पसंख्याक समाज हा जिव्हाळ्याचा विषय आहे. या समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळाला पाहिजे. जातीपातीच्या पलीकडे जाऊन विचार करणारा कागल तालुका आहे. सर्व समाज एकत्रित आहे, या विचाराला पुढच्या काळात मतदान करा.
पालकमंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ म्हणाले, माजी खासदार प्रा. संजय मंडलिक यांचे भाषण मी पूर्ण मन लावून ऐकले. सुरुवातीला मी त्यांचे अभिनंदन करेन. कारण; पराभव होऊनसुद्धा तो अतिशय संयमाने त्यांनी घेतला आहे. स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिकसाहेब यांनी आम्हाला हीच शिकवण दिली आहे. कोणत्याही परिस्थितीत जय झाला तरी हुरळून जायचं नाही आणि पराजय झाला तरी नाराज व्हायचं नाही. पुन्हा नव्या जिद्दीने उभं राहायचं. राजकारणात जनतेला गृहीत धरायचे नाही. जनतेला लाथा मारणे म्हणजे वाऱ्याला लाथा मारण्यासारखं आहे. या शिकवणीचं त्यांनी तंतोतंत पालन केले आहे. ते जनतेवर नाराज नाहीत. त्यांचा लोकसभेला जरी पराभव झाला असला तरी जनतेने चांगले मतदान दिलेले आहे. एवढे उच्चांकी मतदान म्हणजे स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिकसाहेब आणि आमच्यावर जनतेने व्यक्त केलेला विश्वास आहे. त्यांनी फिरायला सुरू करावे. जनतेचे काम हाती घ्यावे, त्यांना उज्वल भविष्य आहे.
*ती वेळ आता आलेली आहे…….*
श्री. मंडलिक म्हणाले, कागल तालुक्यात कोट्यावधींची विकासकामे झाली, याचा बाहेरच्या लोकांना हेवा वाटत असावा. मंत्री श्री. मुश्रीफसाहेब नेहमीच म्हणतात, गावागावांच्या विकासकामांची पुस्तिका बघून विरोधकांचे डोळे पांढरे होतील. खरं म्हणजे ती वेळ आता आलेली आहे. मीसुद्धा या पुस्तिकेची वाट बघत आहे. कदाचित; महाराष्ट्रात विक्रम झालाय की काय, ही उत्कंठा मला आहे.
*मंगळवारी कोल्हापुरात महायुतीचा मेळावा…..*
प्रा. मंडलिक म्हणाले, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत्या मंगळवारी दि. २० कोल्हापुरात राज्यातील प्रमुख नेते मंडळींच्या उपस्थितीत महायुतीचा मेळावा आहे. हा मेळावा प्रचंड शक्तीनिशी, ताकतीनिशी उपस्थित राहून यशस्वी करूया.
*बचेंगे तो और भी लढेंगे…..!*
प्रा. मंडलिक म्हणाले, लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी चुकीचे संदर्भ जनतेसमोर ठेवले. स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिकसाहेब यांनी आम्हाला शिकवलं आहे. मी कधीच जय- पराजय याचा विचार करीत नाही. माझ्या पाठीशी जनतेची एवढी मोठी ताकत असताना मला भीती वाटायची गरज नाही. बचेंगे तो और भी लढेंगे. आमचा, आमच्या विचारांचा पराभव करणारा अजून जन्माला यायचा आहे.
स्वागत शहाजी गायकवाड यांनी केले. प्रास्ताविक चंद्रकांत पाटील यांनी केले. अण्णा पवार यांनी आभार मानले.
व्यासपीठावर आनंदराव फराकटे, तानाजी पाटील, पांडूतात्या पाटील, सुनीलराज सूर्यवंशी, मसू पाटील, राजाराम चौगुले, शिवाजीराव पाटील, दिनकरराव कोतेकर, मनोजभाऊ फराकटे, सरपंच पांडुरंग चौगुले, विलासराव पाटील, बी. एम. पाटील, डी. एम. चौगुले, रावसाहेब खिलारे, नंदूभाऊ पाटील, तानाजी पाटील, विकास पाटील, नारायण पाटील, विठ्ठल पाटील, दिगंबर पाटील, बी. डी. पाटील, जयदीप पवार, आदी प्रमुख उपस्थित होते.
यावेळी पत्रकार चंद्रकांत पाटील, जिल्हा परिषद सदस्य मनोजभाऊ फराकटे, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा सौ. शितल फराकटे, नामदेव पाटील यांचीही मनोगते झाली.
…………………
बिद्री ता. कागल येथे आयोजित विकासकामांची उद्घाटने व लोकार्पण कार्यक्रमात बोलताना माजी खासदार प्रा. संजयदादा मंडलिक. व्यासपीठावर पालकमंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ, मनोजभाऊ फराकटे, नंदूभाऊ पाटील, आनंदराव फराकटे, मसु पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.
==========