*संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या जयंती निमित्ताने
कोल्हापूरकरांना सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी*
——————————————————————————–
कोल्हापूर, दि. ८ ऑगस्ट : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या जयंती निमित्ताने संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या जीवन कार्यावर आधारीत दिनांक ९ ऑगस्ट ते १० ऑगस्ट, २०२४ या कालावधीत संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह, कोल्हापूर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्य संचालक श्री. विभिषण चवरे यांनी दिली.
या सांस्कृतिक कार्यक्रमाची संकल्पना मा. मंत्री सांस्कृतिक कार्य श्री. सुधीर मुनगंटीवार यांची असून या कार्यक्रमास सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. विकास खारगे यांनी मार्गदर्शन केले आहे.
संगीतसूर्य केशवराव भोसले हे मराठी नाट्यसृष्टीतील श्रेष्ठ गायक व अभिनेते होते. संगीत शारदा या नाटकात शारदेची (१९०२) भूमिका करण्याची संधी त्यांना मिळाली. शारदेची भूमिका इतकी उत्कृष्ट वठवली की एका रात्रीत त्यांचे नाव सर्वतोमुखी झाले. पुढे संगीत शारदा, संगीत सौभद्र, संगीत राक्षसी महत्त्वाकांक्षा ही त्यांची नाटके रंगभूमीवर आली. हाच मुलाचा बाप, संन्याशाचा संसार, शहाशिवाजी इ. नाटकांतील त्यांच्या नायकाच्या भूमिका अतिशय गाजल्या होत्या. १९२१ साली टिळक स्वराज्य फंडाच्या मदतीसाठी गंधर्व आणि ललीतकलादर्श या नाटय संस्थांनी मानापमान या नाटकाचा संयुक्त प्रयोग सादर केला. या नाटकात केशवराव आणि बालगंधर्व आशा मात्तब्बर कलाकारांच्या अभियानामुळे या नाटकाचा प्रयोग प्रचंड गाजला.
दिनांक ९ ऑगस्ट, २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या जीवनावरील छायाचित्र प्रदर्शनाचा उद्घाटनाने या महोत्सवाचा शुभारंभ होईल. याच दिवशी सायंकाळी ६.३० वाजता
संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या जीवनावरील नाट्यमय आठवणी आणि त्यांच्या गानशैलीवर आधारीत “वेध एका संगीतसुर्याचा” या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण होईल. हा कार्यक्रम प्रतिबालगंधर्व श्री. विक्रांत आजगांवकर सादर करणार असून, त्यांना प्रदीप शिलकर व तुलसीदास नावेरकर हे साथसंगत करणार आहेत. दिनांक १० ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजता “मी केशवराव” हे नाटक सादर करण्यात येणार आहे. या नाटकाची संकल्पना, लेखन व दिग्दर्शन किरणसिंह चव्हाण यांचे असून, सादरीकरण परिवर्तन कला फौंडेशन यांच्यामार्फत करण्यात येणार आहे.
संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या जयंती निमित्ताने आयोजित करण्यात आलेले सर्व कार्यक्रम प्रेक्षकांना विनामूल्य पाहता येणार आहेत. सर्व रसिक प्रेक्षकांनी या सर्व कार्यक्रमांना भरभरुन आस्वाद घेण्याचे आवाहन श्री. विभीषण चवरे, संचालक, सांस्कृतिक कार्य यांनी केले आहे.
∞∞∞