कोल्हापूर
उच्च व तंत्र शिक्षण विभागातील प्रशासन लोकाभिमुख व गतिमान करण्यासाठी ” झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोजल ड्राईव्ह’ ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. शासन स्तरावर प्राप्त अहवालाच्या अनुषंगाने विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण, कोल्हापूर या कार्यालयास मा. मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण यांनी दि. १७.२.२०२५ रोजी अचानाक भेट देऊन पाहणी केली. विशेष मोहीमेंतर्गत प्रलंबित / निकाली निघालेल्या प्रकरणांचा आढावा घेतला. यात प्रामुख्याने शासन निर्देशानुसार ई. ऑफीस १००% क्षमतेने सुरु नसल्याची गंभीर बाब निदर्शनास आली. दैनंदिन टपाल दररोज ई-ऑफीस प्रणालीत स्वीकारून निपटारा करण्याचे निर्देश देण्यात आले.
सर्व कर्मचाऱ्यांचे वेतननिश्चिती, वैद्यकीय प्रतिपूर्ती, भविष्यनिर्वाह निधी, सेवानिवृत्ती प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी ई-ऑफीस प्रणाली पूर्णक्षमतेने सुरु करून, याचा साप्ताहिक आढावा संचालनालय स्तरावरील सहसंचालक यांनी घेणेबाबत त्यासाठी प्रत्यक्ष कोल्हापूर कार्यालयास भेट देऊन आढावा घेण्याबाबत निर्देश दिले. त्याचप्रमाणे महालेखापाल मुंबई यांचे कडून विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण, कोल्हापूर या कार्यालयाचे लेखापरीक्षण तातडीने करण्याबाबत सूचित केले.
या विभागीय कार्यालयाने शासन धोरणाशी विसंगत निर्णय घेऊन काही प्रकरणी लाभ दिल्याने न्यायालयीन प्रकरणे उद्भवली असून या नियमबाहय प्रकरणांची तपासणी करण्याच्या प्रकरणांची सूचना देखील देण्यात आल्या. तसेच, संचालनालयाद्वारे विभागातील प्राचार्य, अध्यापक, विद्यापीठ अधिकारी / कर्मचारी यांना पत्र निर्गत करून त्यांचेदवारे विभागीय कार्यालयाकडे सादर परंतु प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा तपाशील मागवून, सदरहू प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढणेबाबत संचालनालय स्तरावरील सहसंचालक यांनी व्यक्तिशः लक्ष देवून कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या कर्मचा-यांना बदलीची भिती वाटत नसल्याने विभागीय सहसंचालक स्तरावरील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या धोरणामध्ये आवश्यक बदल करण्याचे निर्देश मा. मंत्री महोदय यांनी दिले.
मुलींना मोफत शिक्षण योजनेचा आढावा घेतेवेळी शिष्यवृती योजनेतील अभिलेख पडताळणीचे टप्पे कमी करून गतिमानता आणण्याबाबत चर्चा झाली. तासिका तत्वावरील अध्यापकांना देय असणारे वेतन / मानधन हे संबंधीताना दरमहाचे १ तारखेला वितरीत होईल याकरीता नियोजन करण्याबाबत सूचित केले.
प्रशासकीय कामकाज पारदर्शक व गतिमान होण्यासाठी कठोर निर्णय घेण्याची भूमिका मा. मंत्री यांनी दर्शविली असून कोणत्याही परिस्थितीत कार्यालयाकडून संस्थाचालक, प्राचार्य, अध्यापक – अध्यापकेतर कर्मचाऱ्यांची अडवणूक होणार नाही, तसेच दप्तर दिरंगाई खपवून घेतली जाणार नसल्याबाबत मा. मंत्री यांनी यांनी निर्देश देऊन विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण, कोल्हापूर यांच्या प्रशासकीय कामकाजात सुधारणा करण्याचे निर्देश दिले.
सदरहू तपासणीवेळी ना. श्री. चंद्रकांतदादा पाटील, मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, डॉ. प्रकाश बच्छाव, सहसंचालक, उच्च शिक्षण संचालनालय, पुणे, डॉ. धनराज नाकाडे, विभागीय सहसंचालक, कोल्हापूर विभाग तसेच विभागीय सहसंचालक, कोल्हापूर कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी उपस्थित होते.