- खून करून आईचे काळीज खाणाऱ्या मुलाची फाशी कायम
उच्च न्यायालयाचा निर्णय
कोल्हापूर
दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने आईचा खून करून तिचे काळीज भाजून खाणाऱ्या मुलाची फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली. सुनील रामा कुचकुरवी याला जिल्हा न्यायालयाने तीन वर्षांपूर्वी फाशीची शिक्षा सुनावली होती. त्याला आव्हान देत आरोपीने शिक्षेत सवलत मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. पण न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळत फाशीची शिक्षा कायम ठेवली.
कोल्हापुरात २८ ऑगस्ट २०२१मध्ये ही घटना घडली होती. आईचा गळा आवळून खून केल्यानंतर त्याने तिचे तुकडे करून भाजून खाण्याचा किळसवाणा प्रकार केला होता. तीन वर्षापूर्वी जिल्हा न्यायालयात त्याला फाशीची शिक्षा झाली होती.
…………………
शिक्षकाने केला शिक्षिका पत्नीचा खून
घरगुती वादातून कागल तालुक्यातील मुरगुड येथे शिक्षकाने आपल्या शिक्षिका असलेल्या पत्नीचा डोक्यात वरवंटा घालून खून केला. याप्रकरणी पती परशराम पांडुरंग लोकरे यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
परशुराम लोकरे व शिक्षिका सविता लोकरे यांच्यात कौटुंबिक कारणातून वाद होत होता. सकाळी हा वाद वाढला. त्यातूनच परशराम याने तिच्या डोक्यात वरवंटा घातला. वर्मी घाव बसल्याने ती जागीच ठार झाली. मुलांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. पण, तिचा पतीने खून केला. चारच दिवसापूर्वी मुलगी सेट उत्तीर्ण झाल्याने या दांपत्याने स्नेहीजनांना स्नेहभोजन दिले होते. आज अचानक तिचा खून केल्याने खळबळ उडाली.