हातकणंलेतून संजय पाटील यड्रावकर मारणार लोकसभेचा धणुष्यबाण !
मयूर संघाचे संजय पाटीलही मैदानत उतरण्यासाठी प्रयत्नशील
कोल्हापूर / प्रतिनिधी
हातकणंगले लोकसभा मतदार संघावर शिवसेना शिंदे गटाने आपला दावा कायम ठेवला आहे. भाजपने काही उमेदवारांची नावे पुढे करत हा मतदार संघ आपल्याला मिळावा यासाठी प्रयत्न सुरू केले असतानाच शिवसेनेचे आमदार राजेंद्र पाटील- यड्रावकर यांचे बंधू संजय पाटील -यड्रावकर यांनी उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी यड्रावकर बंधूनी थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असून धणुष्यबाण चिन्हावर लढण्याची तयारी दाखविली आहे.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडी आणि महायुतीचा घोळ अजून संपलेला नाही. स्वतंत्र लढण्याची भाषा करणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आघाडीने पाठिंबा द्यावा यासाठी मातोश्रीवर दोन वेळा गेले. अजूनही आघाडीने त्यांच्या बाबतीत निर्णय घेतला नाही. दुसरीकडे महायुतीत देखील जागा आणि उमेदवारीचा वाद कायम आहे. हे चित्र असले तरी खासदार धैर्यशील माने यांनी राजकीय वादग्रस्त विधाने टाळत प्रचाराचा नारळ फोडला आहे.
खासदार माने यांच्याबाबत मतदार संघात प्रतिकुल परिस्थिती आहे, यामुळे उमेदवार बदला अथवा भाजपला जागा द्या अशी मागणी होत आहे. भाजपला जागा दिल्यास लढायला कोण कोण तयार आहे, त्यांची नावे चर्चेत आणली जात आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक, आमदार प्रकाश आवाडे, राहूल आवाडे, संजय एस. पाटील अशी नावे आहेत. सध्यस्थितीत शिंदे गट ही जागा सोडायला तयार नाही. माने यांना शब्द दिला आहे, त्यामुळे तेच लढतील असे या गटाच्यावतीने सांगितले जात आहे. तरीही मानेंना मोठा विरोध झाल्यास पर्याय म्हणून काही नावे पुढे केली जात आहेत. यामध्ये संजय यड्रावकर यांचे नाव आहे.
मुख्यमंत्री कोल्हापूर दौऱ्यावर असताना व मुंबईतही यड्रावकर बंधूंनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. सेनेच्यावतीने लढायला संधी द्या अशी मागणी त्यांनी केली. साखर कारखाना, शिक्षण संस्था, सूतगिरणी यासह मंत्री व आमदार म्हणून केलेल्या विकास कामाच्या जोरावर शेट्टी यांना टक्कर देण्यात आम्ही कमी पडणार नाही असे त्यांनी सांगितल्याचे कळते. विशेषता जैन समाजाच्या मतांची विभागणी होण्यासाठी यड्रावकरांची उमेदवारी कशी महत्त्वाची आहे, हेदेखील सांगितल्याचे समजते.
यड्रावकर सेनेसाठी प्रयत्न करत असताना मयूर संघाचे संजय एस. पाटील यांनीही फिल्डींग लावण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी त्यांनी लोकसभा निवडणूक लढविली होती. तेव्हा साधारणता चार लाखापर्यंत मते त्यांनी घेतली. मराठा कार्ड, शिरोळ सह मतदार संघात संपर्क यामुळे उमेदवारी फायदेशीर ठरेल असे त्यांच्या गटाच्या वतीने सांगण्यात येत आहे.