गुंफण सद्भावना साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे
सातारा, दि. २७ (प्रतिनिधी) – सातारा जिल्ह्यातील गुंफण अकादमीच्या वतीने सीमा भागात आयोजित केल्या जात असलेल्या २० व्या गुंफण सद्भावना साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती अकादमीचे अध्यक्ष डॉ. बसवेश्वर चेणगे यांनी दिली.
मराठी भाषेच्या जतन व संवर्धनासाठी गुंफण अकादमी गेली दोन दशके महाराष्ट्र, गोवा तसेच कर्नाटकातील सीमा भागात साहित्य संमेलनांचे आयोजन करत आहे. सीमा भागातील मराठी भाषिकांमधील मायमराठीविषयीच्या जाज्वल्य अस्मितेचा दीप तेवत राहावा म्हणून अकादमीतर्फे सातत्याने त्या भागात संमेलनांचे आयोजन केले जात असते. २० वे गुंफण सद्भावना साहित्य संमेलन यावर्षी २२ डिसेंबर रोजी बेळगाव जिल्ह्यातील खानापूर येथे होत आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी रंगनाथ पठारे यांची निवड अकादमीने एकमताने केली आहे असे डॉ. चेणगे यांनी सांगितले.
अहिल्यानगर जिल्ह्यातील जवळे येथे १ जून १९५० रोजी जन्मलेले रंगनाथ पठारे महाराष्ट्राला प्रतिभावंत साहित्यिक म्हणून परिचित आहेत. कथा, कादंबऱ्या, समीक्षा, अनुवाद असे वैशिष्ट्यपूर्ण, सकस आणि चौफेर लेखन त्यांनी केले आहे. हिंदी, इंग्रजी, कन्नड, उर्दू, सिंधी आणि कोकणी यांसारख्या काही भारतीय भाषांमध्ये त्यांच्या साहित्यकृतींचे भाषांतर झाले आहे. ‘ताम्रपट’ कादंबरीसाठी त्यांना १९९९ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला होता. याशिवाय अनेक पुस्तकांना राज्य शासनाचे तसेच अन्य नामांकित पुरस्कार मिळाले आहेत. २०२२ मध्ये त्यांना यूएस स्थित महाराष्ट्र फाऊंडेशनतर्फे जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
मराठी भाषेला अलीकडेच केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा बहाल केला. हा दर्जा मिळावा म्हणून राज्य शासनाने जी तज्ञ समिती गठीत केली होती त्याचे अध्यक्ष रंगनाथ पठारे हेच होते. अशा महान साहित्यिकाच्या अध्यक्षतेखाली सीमा भागातील हे गुंफणचे साहित्य संमेलन संपन्न होत असल्याचा आम्हाला अभिमान असल्याचे चेणगे यांनी सांगितले.