गोकुळचे दुग्धजन्य पदार्थ आता दुबईला पाठवणार चेअरमन अरूण डोंगळे यांची घोषणा घोषणाबाजी, फलकबाजीमुळे  गाजली गोकुळची सभा

Spread the news

 

 

 

 

गोकुळचे दुग्धजन्य पदार्थ आता दुबईला पाठवणार

चेअरमन अरूण डोंगळे यांची घोषणा

घोषणाबाजी, फलकबाजीमुळे  गाजली गोकुळची सभा

  • ­­

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

म्हैशीच्या दुधात वाढ होण्यासाठी गोकुळतर्फे दूध उत्पादकांना जातिवंत म्हैसी स्थानिक पातळीवर किफायतशीर किंमतीत उपलब्ध करुन देण्याची घोषणा संघाचे चेअरमन अरूण डोंगळे यांनी केली . संघाचे दूध पावडर, तूप आणि बटरची ब्राझील, अझरबैजान आणि दुबई या देशात निर्यातीचे धोरण आखले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची ६२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी (३० ऑगस्ट २०२४) झाली. कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतमधील गोकुळच्या पशुखाद्य कारखाना परिसरात ही सभा झाली. या सभेला दूध उत्पादक सभासदांनी मोठी गर्दी केली होती. दीड तास चाललेल्या या सभेत विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात वादावादी झाल्याने गोंधळ झाला. दोन्हीकडून दीड तास घोषणाबाजी सुरू होती. या गोंधळातच अध्यक्ष पाटील यांनी अनेक घोषणा केल्या. विरोधी आघाडीच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी सभेत सभासदांना प्रश्न विचारू न दिल्याचा आरोप केला. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सभेचे नोटीस वाचन व अहवालातील विषय वाचन कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी केले. तर प्राथमिक दूध संस्था मार्फत लेखी आलेल्या सर्व प्रश्नाचे समर्पक उत्तरे चेअरमन अरुण डोंगळे यांनी दिली. सभेला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ व आमदार सतेज पाटील उपस्थित होते.

 

सरकारने चाळीस एकर जागा उपलब्ध करुन दिली तर गोकुळतर्फे पशुवैद्यकीय कॉलेज सुरू करण्याबाबत निर्णय घेऊ अशी घोषणा अध्यक्ष डोंगळे यांनी केली.  अ वर्ग सभासद दर्जासाठी ५० लिटर दुध घालण्याची अट रद् करण्यासह विषयपत्रिकेवरील सर्व बारा विषयांना मंजुरी देण्यात आली. पशुवैद्यकीय कॉलेजला मंजुरी मिळाल्यास संबंधित कॉलेज इतर संस्था व अन्य विद्यापीठांना चालवायला दिले जाणार नाही. गोकुळ संघामार्फतच चालविले जाईल असे डोंगळे यांनी स्पष्ट केले.

यावेळी उभारण्यात आलेल्या विविध स्टॉलचे उद्घाटन राज्याचे वैद्यकीय शिक्षण  मंत्री हसन मुश्रीफ, माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते झाले संघास दिल्ली येथील इंडियन डेअरी असोसिएशन (पश्चिम विभाग) या दुग्ध व्यवसायातील शिखर संस्थेमार्फत महाराष्ट्रातील ‘अतिउत्कृष्ट दुग्ध प्रकल्प’ (बेस्ट डेअरी प्लांट) हा मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांचा सत्कार जिल्ह्यातील दूध संस्थाच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच गोकुळशी संलग्न असलेल्या मनाली सहकारी दूध संस्था, पेद्रेवाडी (आजरा) या संस्थेच्या महिला दूध उत्पादक सौ.लता उत्तम रेडेकर यांना ‘बेस्ट वुमेन फार्मर’ हा पुरस्कार मिळालेबद्दल गोकुळच्या वतीने सत्कार करण्यात आला.सभेमध्ये सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा अहवाल, ताळेबंद, नफा-तोटा, व्यापारी पत्रक,आर्थिक वर्षाच्या नफा विभागणीस, अंदाजपत्रकापेक्षा जादा झालेल्या खर्चास व अंदाज पत्रकास, लेखा परीक्षण अहवाल दोष दुरूस्ती करून खात्यास पाठविनेस तसेच सन २०२४-२५ साठी वैधानिक लेखापरीक्षकांची नियुक्ती करणेस, बोरवडे शितकरण केंद्र व सॅटेलाईट डेअरी उदगांव लगतची जागा खरेदी करणेस, संघाच्या पोटनियमामध्ये आवश्यक ते बदल करणेस, पशुवैद्यकीय व डेअरी टेक्नॉलॉजी महाविद्यालय स्थापन करणे या सर्व विषयास सभासदांनी बहुमतांनी मंजूरी दिली.

यावेळी महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री मान. नामदार हसन मुश्रीफसो, माजी गृहराज्यमंत्री महाराष्ट्र राज्य आमदार सतेज पाटीलसो, गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, ज्येष्‍ठ संचालक विश्वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके, नविद मुश्रीफ, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, अंबरिषसिंह घाटगे, बाळासो खाडे, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, के.डी.डी.सी बँक संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, संचालिका स्मिता गवळी,  शिरोळचे माजी आमदार उल्लास पाटील, चंदगडचे गोपाळ पाटील, रामराजे कुपेकर, सत्यजित जाधव तसेच विविध क्षेत्रातील पदाधिकारी, दूध संस्थांचे प्रातिनिधी व महिला प्रतिनिधी, संघाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. आभार शशीकांत पाटील यांनी मानले.

 

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!