गोकुळ’ चा १३६ कोटी ०३ लाख रुपये उच्चांकी अंतिम दूध दर फरक! गतसालापेक्षा दूध उत्पादकांना मिळणार २२ कोटी ३७ लाख रुपये जादा – अरुण डोंगळे चेअरमन, गोकुळ दूध संघ

Spread the news

‘गोकुळ’ चा १३६ कोटी ०३ लाख रुपये उच्चांकी अंतिम दूध दर फरक!
गतसालापेक्षा दूध उत्पादकांना मिळणार २२ कोटी ३७ लाख रुपये जादा
– अरुण डोंगळे
चेअरमन, गोकुळ दूध संघ
कोल्हापूर, ता.१२: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) ही कोल्हापूरची शिखर संस्था असून गोकुळ कोल्हापूरच्या ग्रामीण भागाची खऱ्या अर्थाने अर्थवाहिनी आहे. दर दहा दिवसाला न चुकता मिळणारे दूध बिलामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था प्रवाहित राहते. दूध संघामार्फत दूध उत्पादकांना जास्तीत जास्त दूध परतावा देण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले जातात. विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी, गतिमान प्रशासन, काटकसरीचा कारभार, दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीत झालेली वाढ याचबरोबर वाशी दुग्ध शाळेचे विस्तारीकरण, नुकताच कार्यान्वित झालेला करमाळा येथील सौरऊर्जा प्रकल्प असे धोरणात्मक निर्णय यामुळे संघाच्या व्यापारी नफ्यात यावर्षी चांगलीच वाढ झालेली आहे. गोकुळचे नेते व संचालक मंडळ यांनी बैठक घेऊन हिरक महोत्सवी भेट म्हणून गोकुळच्या दूध उत्पादकांना यावर्षी दिवाळीला अंतिम दूध दर फरक, हिरक महोत्सवी दरफरक २० पैसे प्रती लिटर, दूध फरकावरील व्याज, डिबेंचर्सव्याज, डिव्हिडंड(वार्षिक सर्वसाधारण सभेच्या मंजुरीनुसार) असे एकूण रुपये १३६ कोटी ०३ लाख इतकी रक्कम दूध संस्थेंच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे. हि रक्कम गतवर्षी देण्यात आलेल्या दूध दर फरकाच्या रक्कमेपेक्षा २२ कोटी ३७ लाख इतकी जास्त आहे. तसेच १ फेब्रुवारी २०२५ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत दूध उत्पादकांना पशुखाद्यासोबत फर्टीमिन प्लस मिनरल मिक्स्चरच्या ४ लाख ७३ हजार ५४२ इतक्या बॅग्ज मोफत देण्यात आल्या असून त्याची किंमत ७ कोटी १० लाख ३१ हजार ३०० इतकी होते. याचबरोबर कर्मचाऱ्यांनाही दोन टक्के जादा बोनस देण्यात येणार आहे. अशी माहिती गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी दिली.
दूध उत्पादन वाढीसाठी विविध योजना आणि उपक्रम राबविण्यात येत आहेत. स्व.आनंदराव पाटील – चुयेकर म्हैस दूध वाढ व गुणवत्ता सुधार कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी यामुळे गेल्या दोन वर्षात म्हैस दूध संकलनात चांगली वाढ झाली असून गेल्या दीड वर्षापासून दूध संघाने बाहेरील दूध संघाकडून अथवा राज्यातून एक हि लिटर दूध खरेदी केलेले नाही. आर्थिक वर्ष २०२४-२०२५ मध्ये दि.०१/०४/२०२४ ते ३१/०३/२०२५ या कालावधीत गोकुळला पुरवठा केलेल्या म्हैस दूधास सरासरी प्रतिलिटर २ रुपये ४५ पैसे व गाय दूधास सरासरी प्रतिलिटर १ रुपये ४५ पैसे याप्रमाणे दूध उत्पादकांना अंतिम दूध दर फरक देण्यात येणार आहे. गतसालापेक्षा यावर्षी दूध उत्पादकांना प्रतिलिटर २० पैसे जादा दूध दरफरक मिळणार आहे. यामुळे सन २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये दूध पुरवठा करणाऱ्या म्हैस दूध उत्पादकास सरासरी प्रतिलिटर (दर फरकासह) ६० रुपये ४८ पैसे तर गाय दूध उत्पादकास सरासरी प्रतिलिटर (दर फरकासह) ३६ रुपये ८४ पैसे इतका उच्चांकी दूध दर अंतिम दरफरकासह मिळणार आहे.
गोकुळने दूध संकलनाचा १८ लाख ५८ हजार लिटरचा टप्पा ओलांडला असून दूध विक्रीचे मागील सर्व उच्चांक मोडीत काढून एका दिवसात रमजान ईद सणानिमित्या २३ लाख ६३ हजार लिटरची विक्रमी दूध विक्री केली आहे. संघाची प्रगती साधण्यासाठी प्रत्येक गावामध्ये म्हैस दूध उत्पादनांत वाढ होणे आवश्यक आहे. यासाठी म्हैस दूधवाढ कृती कार्यक्रमांतर्गत परराज्यातील जातिवंत म्हैस खरेदी अनुदान योजना सुरू असून या योजनेत जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी सहभागी होऊन जातिवंत म्हैशी खरेदी करून संघाचे म्हैस दूध संकलन वाढवण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन चेअरमन डोंगळे यांनी केले.
गोकुळच्या या घौडदौडीमध्ये दूध उत्पादक, विक्रेते, ग्राहक व कर्मचाऱ्यांचा प्रामुख्याने सहभाग असून राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री गोकुळचे नेते नाम.हसन मुश्रीफसो व माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटीलसो व आघाडीचे सर्व नेते मंडळी यांच्या मार्गदर्शनाखाली, सभासद दूध संस्था तसेच दूध उत्पादकांच्या सहकार्यामुळे गोकुळची यशस्वी वाटचाल सुरू आहे. यापुढेही गोकुळची वाटचाल तितक्याच दिमाखात व यशस्वीपणे पुढे चालू ठेवू. यासाठी भविष्यात दूध संस्था व उत्पादकांचे सहकार्य मोलाचे आहे. संचालक मंडळ व व्यवस्थापनाचे योग्य नियोजनामुळे दूध उत्पादकांना त्यांच्या उत्पादनाला जास्तीत जास्त दर व योग्य मोबदला देण्यासाठी संचालक मंडळ व संघ व्यवस्थापन कटिबद्ध असल्याचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी स्पष्ट केले.
· अंतिम दूध दर फरक, दूध फरकावरील व्याज, डिबेंचर्सव्याज, डिव्हिडंड(वार्षिक सर्वसाधारण सभेच्या मंजुरीनुसार)व्याज इ.रक्कम – रुपये १२४.३९ कोटी
· प्रतिलिटर २० पैसे प्रमाणे जादा रक्कम – रुपये ११.६४ कोटी
· एकूण रक्कम – रुपये १३६.०३ कोटी
· मोफत फर्टीमिन प्लस पशुखाद्यासोबत रक्कम – रुपये ७.१० कोटी
· कर्मचाऱ्यांना २% हिरक महोत्सवी जादा बोनस रक्कम – रुपये १.८३ कोटी
——————————————————————————————————


Spread the news

You may also like

error: Content is protected !!