Spread the news

 

  1. U­

 


 

  •  

गणेशोत्सवात लेझर लाईट्सवर बंदी

कोल्हापूर जिल्हा प्रशासन, पोलिसांचा निर्णय, आगमनावेळी अनेकांच्या डोळ्याला इजा

कोल्हापूर

गणेशोत्सव काळात व मिरवणुकीत लेझर लाइट्सवर बंदी घालण्याचा कौतुकास्पद निर्णय जिल्हा प्रशासन व कोल्हापूर पोलिसांनी घेतला आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यावर फौजदारी दाखल करण्यात येणार आहे. गणेश आगमन मिरवणुकीत झालेल्या लेझरच्या झगमगाटामुळे अनेकांच्या डोळ्याला इजा झाल्याने हा निर्णय घेतला आहे.

गतवर्षी कोल्हापुरात गणेश आगमन व विसर्जन मिरवणुकीत लेझर लाइट्सच्या किरणांचा मोठ्या प्रमाणात वापर झाला. यामुळे पाचशेपेक्षा अधिक लोकांच्या डोळ्याला इजा झाली. यामुळे या लेझर किरणांवर बंदी घालावी अशी मागणी करण्यात येत होती. पण, पोलिसांनी लेझर लाइट्स वापरू नका असे केवळ आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद न देता यंदाही  आगमन मिरवणुकीत लेझर लाइट्स किरणांचा झगमगाट पहायाला मिळाला. पण, तीव्र क्षमतेच्या या किरणामुळे पत्रकार, पोलिस, कार्यकर्ते आणि भाविकांच्या डोळ्याला इजा झाली. डोळे चुरचुरणे,लाल होणे, पाणी येणे अशा तक्रारी आल्या. नेत्ररोग डॉक्टरांकडे उपचारासाठी गर्दी झाली. या किरणामुळे दृष्टी अंधूक होण्याचाही धोका आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन व  पोलिसांनी आता कडक निर्णय घेतला आहे. पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी हा आदेश दिला आहे.  पुढील सहा दिवस म्हणजे १७ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात लेझर लाइट्स शो ला बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या मंडळ, कार्यकर्ते याशिवाय संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. विसर्जन मिरवणुकीत लेझर लाइट्स लावता येणार नसल्याने मंडळामध्ये खळबळ उडाली असली तरी भाविकांमधून मात्र या निर्णयाचे स्वागत होत आहे.

फौजदारी झाल्यास बसतो दणका

एखाद्या तरुणावर फौजदारी गुन्हा दाखल झाला तर त्याला नोकरी मिळताना मोठ्या अडचणी येतात याशिवाय पासपोर्ट मिळत नाही न्यायालयात हेलपाटे मारावे लागतात तेथे शिक्षा झाली तर संपूर्ण करिअर उद्ध्वस्त होऊ शकते यामुळे फौजदारी गुन्हा दाखल होऊ नये याची काळजी तरुणांनी घ्यायलाच हवी

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!