‘मोगलमर्दिनी महाराणी ताराबाई’ चरित्र ग्रंथाचे शुक्रवारी प्रकाशन
डॉ. जयसिंगराव पवार यांची पत्रकार बैठकीत माहिती
कोल्हापूर : ‘मोगलमर्दिनी महाराणी ताराबाई’ या संशोधनात्मक चरित्र ग्रंथाचे प्रकाशन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. २४) न्यू पॅलेसच्या प्रांगणात होणार आहे. हा चरित्रग्रंथ शहाजी छत्रपती म्युझियम ट्रस्टतर्फे पुरस्कृत व महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनीकडून प्रकाशित केला जात आहे,’ अशी माहिती ज्येष्ठ इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. पवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज व राजाराम महाराज यांच्या बरोबरीने महाराणी ताराराणी यांनी हिंदवी स्वराज्याचे रक्षण केले आहे. सलग सात वर्षे बलाढ्य औरंगजेबा च्या सत्तेशी लढा देणाऱ्या त्यांच्या पराक्रमाला जगाच्या इतिहासात तोड नाही. पण इतिहासकारांनी त्यांच्या पराक्रमाकडे डोळसपणे पाहिले नाही. त्यामुळेच त्यांचे चरित्र आपण लिहिले आहे.
‘मराठी भाषेतील ८०० पानांचा हा पहिला संशोधनात्मक चरित्र ग्रंथ आहे. देशासह महाराष्ट्रात महाराणी ताराबाई यांच्याविषयी गेली दीडशे वर्षे संशोधन सुरू आहे. त्यात मी स्वतः १९६५ पासून छत्रपती ताराबाई यांच्याविषयी संशोधन व विचार करीत होतो. त्याला
लिखित स्वरूपात आणण्यासाठी गेल्या दहा वर्षांपासून सुरुवात केली. राजर्षी शाहू महाराजांविषयी अनेक इतिहासकारांनी लिहिले आहे. मात्र, महाराणी ताराबाई यांच्याविषयी अद्यापही जगात कोठेही असे संशोधनात्मक लिखाण झालेले नाही. त्यांचा खरा इतिहास जगासमोर या चरित्र ग्रंथाच्या रूपाने येणार आहे.
खासदार शाहू महाराज म्हणाले, ‘ज्येष्ठ इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांनी छत्रपती महाराणी ताराबाई यांच्या अप्रकाशित दुर्मीळ ग्रंथांवर संशोधन करून हा चरित्र ग्रंथ लिहला आहे. तो देशाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.’ प्रकाशन समारंभास पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील व सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत यावेळी संभाजीराजे छत्रपती, मालोजीराजे छत्रपती, डॉ. मंजुश्री पवार उपस्थित होत्या.