रत्नदीप हायस्कूल व कुमार विद्यामंदिर गंगानगर चे माजी विद्यार्थी जमले गुरुपौर्णिमेला एकत्र
इचलकरंजी, प्रतिनिधी
रत्नदीप हायस्कूल व कुमार विद्यामंदिर गंगानगर येथे माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन दिनांक २१ जुलै २०२४ रोजी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे नियोजन रत्नदीप हायस्कूलच्या प्रांगणातच करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला देशभक्त रत्नपान्ना कुंभार, माजी मुख्याध्यापक दुधगावकर सर व भुपाल अण्णा पाटील यांच्या यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुवंदन करण्यासाठी सांगले सर , जिरगे सर, हावले सर, बेंडे सर, नांदणे सर, मेस्त्री सर, शहा सर , मगदूम सर, वाली सर, शिंगे सर, दीक्षित सर व भोजे सर या गुरुजनांना निमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला या सर्व माजी शिक्षकांचे गुरुवंदन व पाद्य पूजन करून औक्षण करण्यात आले. सर्व माजी गुरुजनांच्यावर पुष्पवृष्टीचा वर्षाव करण्यात आला. सर्व माजी विद्यार्थ्यांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. माजी गुरुवर्यांच्या चेहऱ्यावर गुरुवंदनाच्या कार्यक्रमांमध्ये समाधान जाणवत होते. त्यानंतर सर्व माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये सर्व माजी गुरुवर्य तसेच रत्नदीप हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री दीक्षित सर कुमार विद्या मंदिर चे मुख्याध्यापक श्री भोजे सर यांचाही यथोचित सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमांमध्ये माजी विद्यार्थ्यांनी त्यांची शाळेबद्दलचे असलेले प्रेम व त्यांच्या जीवनातील प्रगतीमध्ये शाळेतील जीवनातील संस्कार व गुरुजनांचे आशीर्वादाचा प्रामुख्याने उल्लेख केला. माजी विद्यार्थ्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करता असताना बऱ्याच वेळा कंठ दाटून येत होता. माजी शिक्षकांनी असा सोहळा आमच्या जीवनामध्ये कधी पाहिला नाही व यापुढेही कधी होईल असे वाटत नाही अशा मोजक्या शब्दांमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू दिसत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री दीक्षित सर मुख्याध्यापक रत्नदीप हायस्कूल यांनी भूषवले होते. त्यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणामध्ये रत्नदीप हायस्कूलचे मध्ये शिकलेले माजी विद्यार्थ्यांनी सर केलेली यशाची शिखरे पाहून आपण भारावून गेल्याचे त्यांच्या भाषणामध्ये उल्लेख केला.
कार्यक्रमाला जवळजवळ अडीचशे माजी विद्यार्थी विद्यार्थिनी हजर होते. प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या चेहऱ्यावरचा भाव टिपण्यासारखा होता. प्रत्येकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
प्रत्येकांना आपल्या जीवनाच्या या वळणावर परत एकदा शाळेत जाऊन, बेंचवर बसून आपल्या आवडत्या शिक्षकांना याची देही याची डोळा पाहण्याचे समाधान स्पष्ट जाणवत होते.
सर्व माजी गुरुजन, मुख्याध्यापक रत्नदीप हायस्कूल व कुमार विद्यामंदिर तसेच उपस्थित असणाऱ्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी संयोजन समितीतील सदस्य श्रीकांत अनंतपुरे, आनंदा सोरप, मेहबूब मुल्ला, मोहन डिंगणे, निरंजन घवे, विनायक खोंद्रे, सुरेश माने, सदाशिव कबनुरे, श्रीशैल्य वसमणी व अहमद बाडीवाले यांनी स्तुत्य उपक्रम कामाचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ सलमा अपराध मुजावर यांनी अत्यंत मार्मिकपणे व खुमासदार भाषेमध्ये केल्याने सर्व उपस्थित शिक्षक, माजी विद्यार्थी विद्यार्थिनींही त्यांचेही कौतुक केले.