- शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी पुन्हा लोकसभेच्या मैदानात माजी खासदार राजू शेट्टी
पारगांव ( प्रतिनिधी )
शेतक-यांच्या कामगारांच्या प्रश्नांचा आवाज संसदेत बेधडकपणे मांडण्यासाठी सर्वसामान्य जनतेचा आवाज लोकसभेत असणे गरजेचे असल्याने तिस-यांदा लोकसभेची निवडणूक लोकवर्गणीतून लढवून जिंकणार असल्याचे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी पारगांव येथे संपर्क दौ-यानिम्मीत्त बोलताना केले.
देशामध्ये शेतकरी , शेतमजूर , कामगार , कष्टकरी लोकांचा आवाज संसदेत पुन्हा त्याच ताकदीने मांडण्यासाठी मी लोकसभा निवडणूक लोकवर्गणीतून लढवित असून सर्वसामान्य जनतेच्या चेह-यावरती परिवर्तनाची लाट दिसू लागली आहे. महागाई , बेरोजगारी , शिक्षणाचे झालेले बाजारीकरण , सामाजिक अस्वस्थता यामुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीस आलेली आहे. या प्रश्नावर बोलण्याची हिम्मत सध्याच्या लोकप्रतिनिधींच्यामध्ये नाही. केंद्र व राज्य सरकार शहरी व ग्रामीण असा दुजाभाव करत वेगवेगळी धोरणे राबवित असून यामुळे सर्वसामान्य जनतेला याचा फटका बसू लागला आहे.
आज दिवसभरात राजू शेट्टी यांनी हातकंणगले तालुक्यातील निलेवाडी , नवे पारगांव , जुने पारगांव , तळसंदे , चावरे , वाठार , किणी व घुणकी या गावांचा संपर्क दौरा केला. यावेळी वरील गावातील जनतेची संवाद साधत निवडणुकीत सक्रिय होवून प्रचार करण्याची विनंती केली.