*आपल्या सुरक्षिततेसाठी मुलीनी*
*स्वत:च दुर्गा बनावे- सौ. पूजा ऋतुराज पाटील*
‘मी दुर्गा’ उपक्रमाचा शुभारंभ
सध्या आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना लक्षात घेऊन मुलींनी स्वत: सक्षम व्हावे . इतरांकडून मदतीची अपेक्षा न ठेवता स्वरक्षणासाठी मुलीनी स्वतःच दुर्गा होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन डी.वाय.पाटील एज्युकेशन सोसायटीच्या अॅडव्हायझर सौ. पुजा ऋतुराज पाटील यांनी केले. आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार ऋतुराज पाटील यांच्या संकल्पनेतून शालेय विद्यार्थीनींना सुरक्षित करणाऱ्या ‘मी दुर्गा’ उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होत्या.
कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील शाळेत मी दुर्गा हा उपक्रम राबवला जाणार असून त्याचा शुभारंभ गोकुळ शिरगाव येथील सौ. आंबुबाई पाटील इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये झाला. यावेळी बोलताना सौ. पूजा पाटील म्हणाल्या, ज्या समाजात आणि संस्कृतीत महिलांना सन्मान मिळतो तोच समाज प्रगती करतो. मात्र आजकाल महिला- मुलींसोबत अनेक वाईट घटना घडत आहे. या सगळ्याला चाप बसणे गरजेचे आहे. वाईट वागणुकीविरोधात आवाज उठवा. न घाबरता धीराने लढायला शिका. आपल्या मदतीला इतरांनी यावे अशी अपेक्षा न बाळगता मुलींनी आता सक्षम होऊन स्वतःच दुर्गा झाले पाहिजे. तुम्हाला सक्षम बनवण्याच्या हेतूनेच मी दुर्गा हा उपक्रम सुरु केला असल्याचे त्यांनी सांगितले.
प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी प्रारंभी ‘मी दुर्गा’ उपक्रमाविषयी माहिती दिली. सध्या मुलींच्या संरक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून प्रत्येकाने दुर्गा बनणे गरजेचे आहे, यासाठीच आमदार ऋतुराज पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवत असल्याचे त्यानी सांगितले.
डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या डॉ. निवेदिता पाटील यांनी ‘सिक्युरिटी आणि सेफ्टी’ याविषयी माहिती दिली. डॉ. पाटील म्हणाल्या, कोणत्याही प्राण्यांना त्रास दिला तर तो सुरक्षेसाठी प्रतिकार करतो. अशाच पद्धतीने विद्यार्थीनीसुद्धा प्रतिकार करायला शिकले पाहिजे. आपल्याला घरी, बाहेर, कार्यक्रम स्थळी धोका निर्माण होऊ शकतो. अशा ठिकाणी आपण नेहमीच सतर्क, सजग असले पाहिजे. घरी कोणी नसताना अनोळखी व्यक्ती घरी घेऊ नये, एकटं कुठंही जाऊ नये, अनोळखी व्यक्तीने दिलेले काही खाऊ नये, सोशल मीडियाचा अनावश्यक वापर करू नये. यासह गुड टच -बॅट टच म्हणजे काय याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली
डॉ. सुरुची पवार म्हणाल्या, मुलीनी आत्मनिर्भर बनून दुर्गा बनावे. सध्या सेफ्टीच्या बाबतीत अनेक गोष्टी उपलब्ध आहेत. यामध्ये पेपर स्प्रे, सेफ्टी अँप उपलब्ध आहेत. कोणत्याही वेळी अचानक उद्भवलेल्या संकटाचा हिमतीने सामना करा. डॉ. पवार यांनी महिला हेल्पलाईन, निर्भया पथक, सायबर कायदा, पोस्को कायदा याबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
मुख्याध्यापिका एस. के.पाटील यांनी, विद्यार्थीनीसाठी ‘मी दुर्गा’ हा अतिशय चांगला उपक्रम असल्याचे सांगत याबाबत आमदार ऋतुराज पाटील यांचे आभार मानले.
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष के.डी.पाटील, प्रिन्सिपल तेजस पाटील, व्हॉईस प्रिन्सिपल निर्मला केसरकर, संस्थेचे श्रेयस पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे सुनील पाटील, गोकुळ शिरगाव ग्रा. प सदस्या निता एरंडोले, सदस्या रुपाली म्हाकवे, माजी उपसरपंच सातप्पा कांबळे, कणेरी ग्रा. प सदस्य उज्वला पाटील, युवती काँग्रेसच्या प्रणोती भाकरे, नीलम जाधव यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शालेय विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*सुरक्षिततेची मशाल विद्यार्थिनीच्या हाती*
सौ.पूजा पाटील यांनी महिला सुरक्षिततेची मशाल पेटवून ती मुलींच्या हाती प्रदान केली आणि मुलींनी ती पुढे नेली.आम्ही स्वतःच्या रक्षणासाठी स्वतः लढू, स्वतः सक्षम बनू, आमच्या सुरक्षिततेसाठी आम्ही दुर्गा बनू असा संकल्प यावेळी करण्यात आला.