एका राजाची डायरी…
नुकतीच डॉ रणधीर शिंदे आणि शिवाजी जाधव यांची पुस्तकं वाचून काढली आणि त्यानंतर लगोलग प्रा प्रकाश पवार यांचं ‘सकलजनवादी छत्रपती शिवराय’ हे पुस्तक वाचायला घेतलं. छत्रपतींच्या इतर पुस्तकांहून हे खूप वेगळं पुस्तक आहे. त्याची प्रस्तावना कुमार केतकर यांची. ती मी वाचून काढली होती आणि पुस्तक हातात घेतलेलं वाचायला. पुस्तक असं आहे की, एखाद्या कादंबरीसारखं ते सलगपणानं वाचता येत नाही. संदर्भांची वाक्यावाक्यागणिक इतकी पखरण आहे की एक एक प्रकरण काळजीपूर्वक वाचून त्यावर चिंतन, मनन करतच पुढं जावं लागतं. अशी दोन-तीन प्रकरण वाचून होतात, तोवरच गेल्या आठवड्यात कोल्हापूरचे उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते बाळ पाटणकर यांच्याकडून एक पार्सल प्राप्त झालं. बाळ पाटणकरांना मी सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये पहात आलो असलो तरी त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलणे अगर भेट कधी झालेली नव्हती; त्यामुळे मी थोडासा आश्चर्यचकित झालो. पार्सल घेऊन संध्याकाळी घरी आलो पाहतो तर त्यात दोन पुस्तकं आणि एक निमंत्रण पत्रिका. ‘छत्रपती राजाराम महाराज करवीर दुसरे यांच्या शतकोत्तर अमृत महोत्सवी जयंती (१८५० ते २०२५) आणि ग्रंथ प्रकाशन समारंभ’ असं हे आज, मंगळवार दि. १५ एप्रिल २०२५ रोजी आयोजित केलेल्या कार्यक्रमाची ही पत्रिका होती. यातलं पहिलं पुस्तक आहे ते म्हणजे कॅप्टन एडवर्ड डब्ल्यू. वेस्ट यांनी संपादित केलेलं ‘यात्रा युरोपची: छत्रपती राजाराम महाराज द्वितीय यांची रोजनिशी (१८७०)’. याचा अनुवाद माझे ज्येष्ठ बंधू प्रा. रघुनाथ कडाकणे यांनी केलेला आहे आणि दुसरं पुस्तक म्हणजे प्रा. इस्माईल पठाण यांनी लिहिलेला ‘छत्रपती राजाराम महाराज (करवीर दुसरे) १८६६ ते १८७०’ हा चरित्र ग्रंथ. ही पुस्तकं पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की, ती मला पाठवण्याची सूचना रघुदादानंच पाटणकरांना केलेली असली पाहिजे. आणि महावीर जयंतीचा माझा संपूर्ण दिवस ही रोजनिशी वाचण्यात रंगून गेला. कालपर्यंत मी ती दोन्ही पुस्तकं वाचून काढली.
कॅप्टन एडवर्ड डब्ल्यू. वेस्ट यांनी संपादित केलेली ‘छत्रपती राजाराम महाराजांची रोजनिशी’ हा या दोन्ही पुस्तकांचा आत्मा. या छत्रपती राजाराम महाराजांविषयी फारशी कोणाला माहिती नाही. अगदी ही डायरी सुद्धा! महाराजांसोबत असणाऱ्या कोल्हापूरचे असिस्टंट टू द पॉलिटिकल एजंट (कोल्हापूर अँड सदर्न मराठा कंट्री) अर्थात महाराजांचे सहाय्यक पॉलिटिकल एजंट कॅप्टन एडवर्ड डब्ल्यू. वेस्ट यांनी ती संपादित केलेली आहे. अवघे वीस वर्षांचे आयुर्मान लाभलेल्या या छत्रपती राजाराम महाराजांनी युरोपचा दौरा केला आणि त्या दौऱ्यावर असतानाच प्रकृती बिघडल्याने इटलीतील फ्लॉरेन्स इथं त्यांचं अकाली निधन झालं. या राजाराम महाराजांनी संस्थानचा कारभार हाती घेतल्यानंतर १८६७मध्ये बहुजनांच्या मुलामुलींना इंग्रजी शिक्षण मिळावे, या हेतूने कोल्हापूर हायस्कूलची स्थापना केली आणि युरोपच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी त्यासाठीच्या स्वतंत्र इमारतीची पायाभरणीही केली होती. पुढे १८८० साली याच हायस्कूलचे रुपांतर महाविद्यालयात करण्यात आले. पुढे या महाराजांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्याचे नामकरण राजाराम महाविद्यालय असे करण्यात आले. आपल्याला राजाराम कॉलेज माहिती असते, पण हे राजाराम महाराज माहिती नसतात. आज ते खऱ्या अर्थाने त्यांच्याच कोल्हापूर संस्थानात नव्याने प्रकाशझोतात येत आहेत.
राजाराम महाराजांच्या माहितीच्या अनुषंगाने मी अर्धा पाऊल पुढे होतो, ते अशासाठी की बरोबर दहा वर्षांपूर्वी विद्यापीठाच्या हिंदी अधिविभागाच्या प्रमुख प्रा. पद्मा पाटील या इटलीतील तुरिनो विद्यापीठात एका आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी गेल्या होत्या. तिथे हिंदीचा अधिविभाग आहे आणि अनेक विद्यार्थी हिंदी आवडीने शिकतात. तेथील प्रमुख प्रा. कॉन्सोलारो या शिवाजी विद्यापीठातही येऊन गेल्या आहेत. तर, तेथून परतल्यानंतर प्रा. पाटील यांनी परिषदेची माझ्याकडे प्रसिद्धीसाठी बातमी पाठविली. त्यामध्ये त्यांनी फ्लोरेन्समधील छत्रपती राजाराम महाराजांच्या स्मारकाचे दर्शन घेतल्याचा उल्लेख होता. त्यानं माझं कुतूहल चाळवून मी मॅडमशी बोललो आणि त्यांनी दिलेल्या माहितीनं भारावूनच गेलो. त्यांनी काढलेली छायाचित्रंही मागवून घेतली. आता माझ्या बातमीचा टोनच बदलून गेला. आणि मी १० एप्रिल २०१५ रोजी ‘फ्लोरेन्सवासियांनी जपलाय राजाराम महाराजांच्या स्मृतींचा गंध!’ अशी ती एक्स्क्लुजिव्ह बातमी केली. दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रांत ती छायाचित्रांसह छापून आली. १३ एप्रिल हा महाराजांचा जयंतीदिन हे त्यावेळी मला माहिती नव्हते.
आज या दोन पुस्तकांच्या माध्यमातून शिवाजी विद्यापीठ या राजाच्या इतिहासाची पाने त्यांनीच लिहीलेल्या डायरीच्या पानांच्या आधारे प्रकाशात आणत आहे. ही डायरी वाचताना सुरवातीला संपादक वेस्ट यांच्याविषयी माझे मन कृतज्ञतेने भरून आले. एखाद्या दस्तावेजाचे महत्त्व ओळखून आपल्या प्रशासकीय जबाबदाऱ्यांच्या व्यतिरिक्त अशा दस्तावेजांचे जतन हे कोणी या ब्रिटीशांकडून शिकावे. केवळ ब्रिटीशांनी त्यांच्या नजरेतून इतिहास लिहीला आणि आमच्या इतिहासावर अन्याय केला अशी ओरड करणाऱ्यांनी त्यांनी किमान तो लिहीला म्हणून तरी आज तो आपल्याला उपलब्ध आहे, याचे भान बाळगणे गरजेचे आहे. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र आणि छायाचित्र सुद्धा आपल्याला ब्रिटीश, डच, पोर्तुगीज कागदपत्रांच्या आधारे साकारावे लागले आहे, हे त्याचेच उदाहरण. आता शिवरायांचा उल्लेख आलाच म्हणून सांगतो, सदरच्या डायरीच्या संपादकीयामध्ये वेस्ट यांनी शिवरायांच्या समग्र कारकीर्दीचं अगदी एकाच वाक्यात इतकं प्रभावी रसग्रहण केलं आहे की, मी मोठ्या अभिमानानं आणि प्रेमादरानं ती ओळ कितीदा तरी वाचून मनात साठविली. त्यात त्यानं म्हटलं आहे की, “सतराव्या शतकाच्या मध्यवर्ती आणि अखेरच्या सुमारास इंग्लंडप्रमाणेच, पश्चिम भारतातही दूरगामी आणि महत्त्वपूर्ण घटनांनी इतिहास घडवला. त्या दरम्यान, एक नवे साम्राज्य स्थापन झाले आणि स्वतःची सामूहिक ओळख हरवलेल्या जनतेला एका महान पुरूषाच्या प्रतिभेने शक्तीशाली राष्ट्रात परिवर्तित केले- ते महापुरूष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.” महाराजांविषयीचे सारे चरित्रग्रंथ, साऱ्या कादंबऱ्या यावर ओवाळून टाकावं, असं हे विधान. ब्रिटीशांचं आकलन किती समर्पक स्वरुपाचं होतं, हे पटवून देणारं. अशा एका चांगल्या प्रतिभेची देण असलेल्या ब्रिटीश सहायकानं राजाराम महाराजांची डायरी संपादित केली, हे महत्त्वाचं आहे. आणि आपण आपल्या सवयीनं तिचं विस्मरण घडवलं, हेही आपल्या स्वभावधर्माला साजेसंच. पण, आता महाराजांच्या शतकोत्तर अमृतमहोत्सवी जयंतीच्या निमित्ताने ही डायरी आणि महाराजांचे चरित्र आपल्यासमोर येते आहे, हेही नसे थोडके! त्यासाठी महाराजांच्या जनक घराण्यातील वंशज बाळ पाटणकर यांच्यासह (राजाराम महाराज हे मूळचे नागोजीराव पाटणकर) त्यासाठी पाठपुरावा करणारे ज्येष्ठ विचारवंत डॉ. यशवंतराव थोरात, आदरणीय डॉ. जयसिंगराव पवार यांच्यासह अनुवादक डॉ. रघुनाथ कडाकणे आणि चरित्रलेखक डॉ. इस्माईल पठाण हेही अभिनंदनास पात्र आहेत. विशेषतः रघुदादाने अवघ्या तीन आठवड्यांत तिचा अनुवाद केला, हे वाचून मी चाटच पडलो. हे काम सोपे नव्हते. भारावून जावून केल्याखेरीज इतक्या अल्पावधीत हे जबाबदारीचे काम करणे अशक्यप्रायच होते. त्यासाठी त्याचे हृदयपूर्वक अभिनंदन करावेच लागेल. इस्माईल पठाण सरांचा मी त्यांनी लिहीलेले शिवचरित्र वाचल्यापासून चाहता झालेलो आहे. अत्यंत निरलस आणि अनबायस्डपणे इतिहासाकडे पाहण्याची दृष्टी त्यांच्याकडे आहे. आजच्या कालखंडात हे खूपच मोलाचे आहे- इतिहासाच्या बाबतीत तर फारच. त्यामुळे त्यांनी लिहीलेल्या चरित्रग्रंथाला एक संतुलितपणाचे भान लाभलेले आहे. यासाठी सरांचेही अभिनंदन!
खरे तर, राजाराम महाराजांची डायरी आणि त्यांचे चरित्र या मुळातूनच वाचण्याच्या बाबी आहेत. मात्र मला जाणवलेली तिची वैशिष्ट्ये या ठिकाणी सांगितलीच पाहिजेत. डॉ. अवनीश पाटील यांनी त्यांच्या मनोगतात म्हटल्याप्रमाणं समुद्रप्रवास करणारा पहिला हिंदू राजा म्हणजे छ. राजाराम महाराज होत. त्या काळात सागर पार करणं, हे निषिद्ध मानलं जाई. मात्र, महाराजांनी ते केलं, यावरुनच त्यांच्या पुरोगामी आणि आधुनिक विचारसरणीची प्रचिती येते. त्यातही इंग्रजांशी संवाद आणि डायरी लिहीण्याइतकं इंग्रजीवर प्रभुत्व, ही गोष्टही त्यांची तीक्ष्ण बुद्धिमत्ता आणि आकलन यांची साक्ष देणारी आहे. डायरी वाचताना एक गोष्ट प्रकर्षानं लक्षात येते, ती म्हणजे महाराजांचा हा दौरा म्हणजे काही केवळ सहल वा पर्यटन नव्हतं, तर एक महत्त्वपूर्ण अभ्यासदौरा होता. त्यांच्या आकलनाच्या कक्षा विस्तारणारा, त्यांच्या चिकित्सक विचारसरणीला वाव देणारा आणि प्रगल्भसमृद्ध करणारा होता. इंग्लंडमध्ये व्हिक्टोरिया राणीपासून ते विविध प्रांतांचे प्रिन्स, प्रिन्सेस, ऑक्सफर्डसारख्या विद्यापीठांचे कुलगुरू, सरदार-दरकदार, गव्हर्नर जनरल, अभ्यासक, संशोधक, इतिहासकार अशा इंग्लंडमधील वरिष्ठ श्रेणीच्या मान्यवरांच्या गाठीभेटी त्यांनी या दौऱ्यात घेतल्या. त्याखेरीज मादाम तुसाँसह विविध वस्तुसंग्रहालये, विद्यापीठे, गिरण्या, कारखाने, लंडन टॉवर, हाईड पार्क, हाऊस ऑफ कॉमन्स, रॉयल अॅकेडमी, इंडिया हाऊस, बँका, करन्सी प्रेस व टांकसाळी, बंदरे, जगातील सर्वात मोठी आगबोट, मोठमोठी उद्याने अशा अनेक बाबी पाहात समजून घेत त्यांनी आपल्या अनुभवाची व ज्ञानाची कक्षा विस्तारण्यास प्राधान्य दिले. या सर्वांच्या नोंदी या डायरीत आहेत.
महाराजांच्या या डायरी लेखनाला एक प्रकारची शिस्त असल्याचे जाणवते. नोंदी अवघ्या काही ओळींच्या असल्या तरी त्यामध्ये तीन टप्पे दिसतात. पहिल्या टप्प्यात महाराज फॅक्ट्स नोंदवितात. म्हणजे जिथे भेट दिली, त्या व्यक्ती, त्यांची नावे वा भेट दिलेले ठिकाण, त्यांचे महत्त्व इत्यादी. पुढे त्या संबंधित व्यक्ती, ठिकाणाची निरीक्षणे नोंदवितात आणि पुढे अवघ्या एक किंवा दोन ओळींत त्यावर ते स्वतःची कॉमेंट, टिप्पणी करतात. भल्याभल्यांना जमणार नाही ती लेखनशिस्त या राजाने अवघ्या विशीच्या उंबरठ्यावर अवगत केली होती. त्यामुळेच खरे तर पठाण सरांना त्यांचे चरित्र लिहीणे थोडे सुकर गेले असावे.
राजाराम महाराजांचा मला आणखी एक गुणविशेष जाणवला, ते म्हणजे त्यांचा चोखंदळपणा. ते कलारसिक होते. तिथे त्यांनी अनेक थिएटरना भेट देऊन अनेक नाट्याविष्कार, गायनाविष्कार अनुभवले. त्याविषयीच्या नोंदीही डायरीत आहेत. संबंधित कलाकृतीविषयी आम्हाला ती फारशी भावली नाही, अमूक कलाकाराने चांगले काम केले, आम्हाला ही कलाकृती खूप आवडली, अशा टिप्पण्या केल्या आहेत. अगदी एखादे व्याख्यान अगर चर्चा ऐकल्यानंतर ती आवडली किंवा कसे, याच्याही नोंदी आहेत. याखेरीज, ते तेथील ग्रामीण जीवनाचीही पाहणी करतात, तेथील सरदारपुत्रांसमवेत क्रिकेटही खेळतात, या गोष्टीही त्यांच्या चौफेर वावराची आणि दृष्टीकोनाची साक्ष देणाऱ्या.
अनेक नोंदींमधून काही गोष्टी वाचकालाही समजून येतात, जशा की अनेक कोच फॅक्टऱ्यांना महाराज भेट देतात. तेथे विविध प्रकारच्या बग्गींची पाहणी करतात आणि त्याविषयी पसंती-नापसंतीची टिप्पणी करतात. यावरुन आपल्यासाठी एखादी नवी बग्गी खरेदी करावी, अशा हेतूने ते या फॅक्टरींना भेट देतात, हे लक्षात येते. एका ठिकाणी ते इंग्लंडच्या मंत्रीमंडळाचा फोटो खरेदी करून सोबत घेऊन येतात. आता ही नोंद वाचताना तो त्यांनी कशाला घेतला, असे वाटून जाते. मात्र, दुसऱ्या दिवशी त्यांची मंत्रीमंडळासमवेत भेट ठरलेली असते, ते पुढील नोंदीवरुन लक्षात येते. तेव्हा मंत्रीमंडळाचे सदस्य कोण कोण आहेत, त्यांना भेटत असताना आंधळेपणाने जाण्यापेक्षा त्यांच्याविषयी जाणून घेऊन मगच भेटले पाहिजे, ही जाणीव त्यांच्या या कृतीतून दिसते. त्यातूनही त्यांच्या चाणाक्षपणाची प्रचिती येते.
महाराजांच्या या नोंदींमध्ये काही बिटविन दि लाइन्सही आहेत. म्हणजे अनेक ठिकाणी ते काही मोठ्या व्यक्तींना भेटण्यासाठी जातात; मात्र ‘त्यांची भेट न झाल्याने परत आलो’, असे त्यांना नोंदवावे लागले आहे. ब्रिटीशांचे कितीही कौतुक केले, तरी आम्ही सत्ताधीश आहोत आणि आपण अंकित आहात, हे जाणवून देण्याचाच हा प्रयत्न दिसतो. अन्यथा, महाराजांच्या भेटीसाठी आधीच अपॉईंटमेंट घेऊन ठेवणे त्यांना सहजशक्य होते, मात्र तसे दिसत नाही. त्यामुळेच पुस्तकाच्या अखेरीस एका परिशिष्टात महाराजांनी त्यांच्या एका मित्राला लिहीलेल्या पत्रात ‘आपण आणि आपले संस्थान किती छोटे आहोत, याची जाणीव झाली,’ असे जे म्हटले आहे, याला या सापत्न वागणुकीचाही संदर्भ असावा, असे एक वाचक म्हणून मला वाटले. त्यामुळे आता महाराजांची काही पत्रे असतील, तर त्यांचेही संकलन होणे आवश्यक आहे, असे त्यावेळी वाटून गेले.
मात्र, पाश्चात्यांविषयी कृतज्ञ राहावे, असा प्रसंग म्हणजे महाराजांचा मृत्यू. इटलीमध्ये कोणत्याही प्रकारच्या दहनविधीला मान्यता नसताना आणि हा शिक्षापात्र गुन्हा असताना सुद्धा महाराजांच्या अंतिम संस्कारासाठी त्याला अपवाद करण्यात आले, ही त्या काळात तर मोठी बाब होतीच; आजच्या काळाच्या नजरेतून पाहता ती महानच वाटते. त्यापुढे जाऊन त्यांची छत्री आणि स्मारक उभारणे, परिसराचे सुशोभीकरण करणे, शेजारून जाणाऱ्या नदीवरील पुलाला त्यांच्या सन्मानार्थ त्यांचे नाव देणे आणि त्यांच्या भेटीच्या स्मृती चिरंतन जपणे, याचे मोल आहेच, पण ते प्रचंड वाटण्याच्या काळात आपण आज आहोत.
हा राजा आणखी काही वर्षे जगता तर छत्रपती शाहू महाराजांच्या आधीच एका आधुनिक क्रांतीची रुजवात त्यांच्या हातून निश्चितपणे होऊ शकली असती, असे निश्चितपणाने वाटते. पण, या जर-तरला काही अर्थ नसतो. कारण छत्रपती शाहू महाराजांच्या बाबतीतही मला नेहमी तसंच वाटत राहतं. अवघी पाच वर्षांची छोटी कारकीर्द पण त्यातही मेन राजाराम हायस्कूलसारखी पायाभरणी, यातूनच सारे काही दृगोच्चर होते. याच स्मारकामध्ये आज पुन्हा छत्रपती राजाराम महाराजांच्या स्मृती करवीरकर जनतेबरोबरच जगासमोर येण्यास सिद्ध आहेत.
शिवाजी विद्यापीठाच्या वतीने मेन राजाराम हायस्कूलच्या सभागृहात आज, मंगळवार, दि. १५ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजता या दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन करण्यात येत आहे. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते प्रकाशन होणार असून कार्यक्रमाला ज्येष्ठ इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार, नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉ. यशवंत थोरात आणि माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. करवीरकर जनताही या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी उत्सुक आहे. आपणा सर्वांचे स्वागत करण्यास आम्हीही उत्सुक आहोत!
आलोक जत्राटकर