मला वाढत्या पाठींब्यांमुळे विरोधकांना पोटशूळ : माजी आमदार चंद्रदीप नरके करवीर मतदारसंघातील संपर्क दौऱ्याला उत्स्फुर्त प्रतिसाद

Spread the news

मला वाढत्या पाठींब्यांमुळे विरोधकांना पोटशूळ : माजी आमदार चंद्रदीप नरके
करवीर मतदारसंघातील संपर्क दौऱ्याला उत्स्फुर्त प्रतिसाद

कोल्हापूर

 

निवडणूकीपुरता भेटायला येणारा मी नेता नाही तर मागील निवडणूकीतील पराभवानंतर सुध्दा सातत्याने जनतेच्या संपर्कात राहिलो आणि त्यांच्या सुख दु:खात सामील होण्याबरोबरच त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक केली. मागील अडीच वर्षाच्या काळात मी आमदार नसतानाही केलेल्या विकासकामांमुळे आणि सातत्याने संपर्कात असल्यामुळे प्रभावित होऊन अनेकजणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे आणि अनेकजण पाठींबाही देत आहेत. यामुळेच विरोधकांना पोटशूळ झाले आहे आणि विरोधक रोज काहीतरी खोटया बातम्या पसरवून लोकांची दिशाभूल करीत आहेत असा आरोप माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी केला.
करवीर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रचारार्थ आयोजित पडवळवाडी, केर्ले, केर्ली, रजपूतवाडी, नवीन चिखली, सोनतळी, सादळे, मादळे, जठारवाडी, भुये, भुयेवाडी, निगवे दुमाला, शिये या गांवाच्या संपर्क दौऱ्यावेळी ते बोलत होते. यावेळी गावा गावामध्ये लोकांनी त्यांचे उत्स्फुर्तपणे स्वागत केले. प्रत्येक गांवातील महिलांनी पंचाआरती ओवाळून स्वागत केले. यावेळी नरके यांनी गावा गावातील गल्लीतून कार्यकर्त्यांसह जनतेशी संवाद साधून त्यांची मने जिंकली.
नरके म्हणाले, याभागातील दरवर्षी येणाऱ्या महापूराचे नियंत्रण करण्यासाठी महायुती शासनाने जागतिक बँकेच्या 3200 कोटी रुपयांचे अर्थसहाय्यातून योजना राबविण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असणाऱ्या या सरकारने शेती पंपांचे साडेसात एच पी पर्यंतचे विज बिल माफ केले असून 10 एच पी पर्यंतचे बिल आणि सहकारी पाणी पुरवठा संस्थांचे विज बिलही माफ करावे यासाठी मी मागणी करणार असून पुढील सरकार महायुतीचेच येणार असून हा प्रश्नदेखील मार्गी लवण्यात येईल. गेल्या अडीच वर्षातील महायुती सरकारच्या काळात महाराष्ट्रात वेगाने पायाभूत सुविधांबरोबरच लोककल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. त्याचबरोबर या मतदारसंघासाठी 100 कोटी रुपयांची विकासकामे खेचून आणली. यापुढेही मतदारसंघाचा विकास अखंडीत ठेवण्यासाठी मला भरघोस मतांनी विजयी करा असे आवाहन नरके यांनी केले.
यावेळी अनेक गावातील कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना चंद्रदीप नरके यांनी आमदार असताना या परिसराला भरपूर निधी देऊन विकासकामे केलीच पण आमदार नसतानाही त्यांची मोठया प्रमाणावर विकास निधी दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. तसेच या परिसरात आलेल्या महापुरावेळी पुराच्या पाण्यातून येऊन संकटकाळात मदत करणारा आमदार पहील्यांदाच बघीतला. त्यामुळे प्रत्येकाला चंद्रदीप नरके म्हणजे आपल्या कुटूंबातील सदस्य असल्यासारखेच वाटते. जनतेशी सातत्याने थेट संपर्कात असणारा, सुख दु:खात सामील होणारा, आणि विकासकामे वेगाने करणारा, लोकप्रतिनिधी म्हणून चंद्रदीप नरके यांच्यासारखाच आमदार या मतदारसंघाला पुन्हा लाभावा अशी भावना व्यक्त केली.
यावेळी गोकुळ संचालक एस.आर.पाटील,भाजपचे हंबीरराव पाटील, राष्ट्रवादीचे मधुकर जांभळे, शिवाजी देसाई,यांचेसह महायुतीतील घटक पक्षांचे पदाधिकारी, गावा गांवामधील तरुण मंडळाचे कार्यकर्ते, सहकारी संस्थांचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि महिला व अबालवृध्द मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्वांनी संकटकाळात मदत करणारा, कायम संपर्कात असणारा आणि मित्रत्वाने वागणारा आमदार पुन्हा या मतदारसंघाला लाभावा यासाठी नरके यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याची ग्वाही दिली.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!