माजी आमदार अमल महाडिक यांच्या प्रयत्नातून कोल्हापूर जिल्हा परिषदेला दीड कोटींचा निधी
कोल्हापूर, प्रतिनिधी
माजी आमदार अमल महाडिक यांच्या विशेष प्रयत्नातून कोल्हापूर जिल्हा परिषदेला विविध रस्त्यांच्या कामासाठी दीड कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.
त्या निधीतून कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येणाऱ्या कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील शिवाजी विद्यापीठ ते सरनोबतवाडी ते राष्ट्रीय महामार्ग 4 या रस्त्यासाठी 30 लाख रुपये, सरनोबतवाडी कृषी कॉलनी ते विमानतळ मार्ग ते रामा क्र 194 ला मिळणाऱ्या रस्त्यासाठी वीस लाख रुपये, उचगाव ते राजपल्लू मंगल कार्यालय रस्ता आणि प्रजीमा क्र.37 पासून नंदगाव पैकी हंचनाळवाडी पर्यंत रस्ता तसेच वसगडे सोनार मळा ते नंदीवाले आनंद रस्त्यासाठी प्रत्येकी 15 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. प्रजिमा 20 ते जुने चिंचवाड ते नदी पाणवठा रस्त्यासाठी 25 लाख तर शिरोली जिल्हा परिषद मतदार संघातील प्ररामा क्र 6 पासून मौजे वडगाव नागाव ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 या रस्त्यासाठी तीस लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाकडे माजी आमदार अमल महाडिक यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे हा निधी प्राप्त झाला असून लवकरच या निधीतून प्रस्तावित विकास कामे सुरू होतील. केवळ आपल्या मतदारसंघाचा विचार न करता संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यासाठी निधी खेचून आणणाऱ्या माजी आमदार अमल महाडिक यांच्या कामाचे कौतुक होत आहे.
भविष्यातही जिल्हा परिषदेला आणखी निधी मिळवून देऊ अशी ग्वाही माजी आमदार अमल महाडिक यांनी दिली. कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चारही महाडिक यांनी केला.