- *दबावामुळे कुणबी दाखले मिळत नसतील तर कागलमध्ये मला लक्ष घालावे लागेल*
*मनोज जरांगे पाटील यांचा इशारा*
*शाहूंच्या जनक घराण्याचे वंशज समरजितराजेंनी अंतरवाली सराटीत घेतली भेट*
कोल्हापूर,प्रतिनिधी.
मराठा समाजातील नागरिकांनी पुराव्यांशी कुणबी दाखल्यासाठीचे प्रस्ताव सादर केले असतील तर ते प्रशासनाला द्यावेच लागतील. त्यासाठी कागलमध्ये कुणाचा दबाव येत असेल तर मला स्वतः लक्ष घालावे लागेल.कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण,कुणबी दाखले व इतर लाभ मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.अशी ग्वाही मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यांसाठी लढा देणारे संघर्षयोद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी दिली.
अंतरवाली सराटी जालना येथे छत्रपती शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे वंशज व शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी उभयंतात विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली.यावेळी ते बोलत होते.
यावेळी घाटगे यांनी कागल,गडहिंग्लज-उत्तूर विधानसभा मतदारसंघासह जिल्ह्यातील मराठा समाजातील दीड लाखाहून अधिक नागरिकांनी कुणबी दाखले मिळावेत.यासाठी विहित नमुन्यात रीतसर अर्ज केले आहेत.त्यापैकी फक्त दहा हजार नागरिकांना हे दाखले मिळाले आहेत. हे प्रस्ताव दाखल करून घेताना टाळाटाळ केली जात आहे. याबाबत शासकीय अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही ते दखल घेत नाहीत. याकडे लक्ष वेधण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने पालकमंत्री यांचे होम ग्राउंड असलेल्या कागल तहसीलदार कार्यालयासमोर सकल मराठा समाजाच्या वतीने लाक्षणिक आंदोलनही करण्यात आले. त्यांनी दखल न घेतल्यास कागल मध्ये निषेध सभा घेण्याचा इशाराही सकल मराठा समाजाने दिला. मराठा समाजाच्या हिताच्या आड येणारी ही कृती कुणाच्या दबावामुळे केली जात आहे त्यामुळे यासाठी प्रतिसाद मिळत नाही. असा प्रश्न मराठा समाजाच्या वतीने उपस्थित केला जात आहे .त्यामुळे लाखो नागरिक नोकरी,शिक्षण यासह इतर शासकीय पातळीवरील लाभापासून कुणबी दाखल्याअभावी वंचित राहिले आहेत.अशी वस्तुस्थिती जरांगे पाटील यांच्यासमोर मांडली.मराठा समाजाला आरक्षण मिळावे, म्हणून आम्ही वेळोवेळी मराठा आंदोलनात भाग घेतला आहे. या महत्त्वपूर्ण मागणीत सकल मराठा समाजासह आम्हीही तुमच्या बरोबर आहोत
या भेटीनंतर माध्यमाशी बोलताना श्री घाटगे म्हणाले, मी आज जरांगे साहेब याना भेटलो, विनंती केली,मला तुमचं सहकार्य हवं
यावर ते म्हणाले,शाहू महाराजांचा जनक घराणे आहे. मान राखलाच पाहिजे. ही निवडणूक हसन मुश्रीफ विरुद्ध समरजीत घाटगे अशी नाही .कागलची स्वाभिमानी जनता विरुद्ध हसन मुश्रीफ अशी आहे. स्वाभिमानी जनता माझ्याबरोबर आहे.माझ्याबद्दल खालच्या पातळीची भाषा वापरली जात आहे. मी त्यावर काहीही बोलणार नाही मी माझ्या संस्काराप्रमानेच जाणार!
*चौकट*
*समरजीतसिंह घाटगे यांचे कौतुक*
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातील युवकांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी राजे विक्रमसिंह घाटगे बँकेने कागल,गडहिंग्लज-उत्तूर विभागातील तरुणांना राज्यातील प्रथम क्रमांकाचा कर्जपुरवठा केला आहे. दीडशे कोटीहून अधिक रक्कम पंधराशेहुन अधिक युवकांना कर्ज स्वरूपात दिली आहे.त्यापैकी बहात्तर टक्के युवकांनी नव्याने स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे.त्याचा व्याज परतावा नियमितपणे या युवकांना मिळत आहे.अशी माहिती घाटगे यांनी जरांगे पाटील यांना दिली. यावर पाटील यांनी घाटगे यांचे कौतुक केले.
छायाचित्र
अंतरवाली सराटी जालना येथे मराठा आरक्षणसाठी झटणारे मनोज जरांगे- पाटील यांच्याशी मराठा समाजाच्या विविध प्रश्नांबाबत चर्चा करताना छत्रपती शाहू महाराजांचे जनक घराण्याचे वंशज, शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे