*सतेज पाटील यांच्या नाकर्तेपणामुळे कोल्हापूर जिल्हा अविकसित – खासदार धनंजय महाडिक*
कोल्हापूर – काँग्रेसने देशातील नागरिकांना गरिबी हटवणार अशी खोटी स्वप्ने दाखवून ६५ वर्षे सत्ता उपभोगली. यांनी केवळ आपली घरे भरण्याची कामे केली. कोल्हापूर मध्ये सतेज पाटील देखील नागरिकांना अशीच खोटी आश्वासने देऊन सत्ता उपभोगत आले आहेत. पण विकासाच्या नावे लोकांना गाजर मिळाले आहे. त्यांच्या नाकर्तेपणामुळे कोल्हापूर जिल्हा अविकसित राहिला असल्याचा आरोप खासदार धनंजय महाडिक यांनी केला.
उचगाव येथे कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. “गेली अनेक वर्षे थेट पाईपलाइनद्वारे कोल्हापूरचा पाणी प्रश्न सोडवणार असे पाटील सांगत आहेत. पाईपलाईन आली पण पाणी काही आले नाही. दरवेळेस एक नवीन कारण देऊन त्यांनी लोकांच्या संयमाचा अंत पाहिला आहे. कोल्हापुरात मोठे उद्योग येण्यापासून त्यांनी रोखले आहेत. इतकी वर्षे लोकांना कोल्हापूर विमानतळावर विमाने सुरु करणार अशी पोकळ आश्वासने दिली. पण विमानतळाचा विकास त्यांना करता आला नाही. छत्रपती शाहू महाराज यांनी बांधलेल्या रेल्वे स्थानकाला इतक्या वर्षात कोणताच निधी त्यांनी आणला नाही.” असे ते म्हणाले.
पुढे ते म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात अनेक विकासकामे झाली. आपल्या कोल्हापूरच्या विमानतळासाठी व रेल्वे स्थानकासाठी त्यांनी मला निधी दिला. त्यामुळे आज ही दोन्ही ठिकाणे विकसित झाले आहेत. महायुती सरकारच्या माध्यमातून जनतेला राज्य व केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ घेता यावा यासाठी आम्ही सातत्याने काम केले आहे.”
कोल्हापुरची जनता आता शहाणी झाली आहे. विकासाच्या नावावर झालेली कोल्हापूरची दयनीय अवस्था कुणापासून लपून राहिलेली नाही. अमल महाडिक यांची कामाप्रती असणारी निष्ठा सर्वानी पाहिली आहे. आपल्या कामाचा माणूस कोण आहे हे त्यांना जाणवले आहे. प्रत्येकाच्या एका हाकेवर धावून जाणाऱ्या अमल यांना मत देऊन कोल्हापूरच्या विकासाला मत द्या. एक नंबरच्या माणसाला एक नंबरचे बटण दाबून विजयी करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
सभेला भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चौगले, राजू संकपाळ, अनिल शिंदे, अभिजित पाटील, इरफान मणेर, तला मणेर, सतेज माळगे, उमेश देशमुख, दत्ता तोरसकर, महालिंग जंगम, अनुराधा वाईंगडे, संदीप कुंभार यांच्यासह महायुतीचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व तमाम नागरिक उपस्थित होते.