Spread the news

j*शासन निर्णययातील त्रुटीमुळे अडकलेले प्रोत्साहनपर अनुदान ११ हजार शेतकऱ्यांना मिळणार*

*केडीसीसी बँक व पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार प्रकाश आबिटकर यांचा यशस्वी पाठपुरावा*

*अनुदानाची रक्कम ४६ कोटींच्या घरात*

*कोल्हापूर, दि. ४:*
शासन निर्णयातील त्रुटींमुळे अडकलेले नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रोत्साहनपर अनुदान ११ हजार शेतकऱ्यांना मिळणार आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून बँकेचे अध्यक्ष व पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार प्रकाश आबिटकर यांनी केलेल्या पाठपुराव्याला हे यश मिळालेले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी वर्गात समाधान आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, महात्मा फुले शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र राज्य सरकारने ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय जाहीर केला होता. परंतु; त्याला विलंबच होत होता.

याबाबत अधिक माहिती अशी, पीक कर्जाची नियमितपणे मुदतीत परतफेड करणा-या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यासाठी राज्य सरकारने एक निर्णय शुक्रवार दि. २९ जुलै २०२२ रोजी जारी केलेला होता. त्यानुसार सन २०१७-१८, २०१८-१९, २०१९-२० या तीनपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात कर्जउचल करून नियमितपणे मुदतीत परतफेड केलेले शेतकरी लाभार्थी म्हणून पात्र ठरणार होते. मात्र, ज्या शेतकऱ्यांनी या तीनपैकी एकाच वर्षात दोन हंगामांची पीक कर्ज कर्जउचल करून परतफेड केलेली आहे, ते या लाभापासून वंचित राहत होते. त्यांची संख्या १४,४०० इतकी होती. कोल्हापूर जिल्ह्यातील ऊसपिक कर्जाचे प्रमाण ९७% आहे. राज्य सरकारने पिक कर्जाचे वितरण आर्थिक वर्षानुसार ग्राह्य धरल्यामुळे या तीन आर्थिक वर्षांमध्ये दोन हंगामाचे ऊस पिककर्जाचे वितरण होते. त्यामुळे कर्ज परतफेडीच्या तारखा लगतचा जून महिना व त्यापुढील जून महिना याप्रमाणे निश्चित होतात. पण शासनाच्या निकषानुसार लगतचाच जून महिना कर्ज परतफेडसाठी ग्राह्य धरल्यामुळे वसूल देणारे शेतकरी या योजनेपासून वंचित राहत होते. शासन निर्णयातील या जाचक निकषांमध्ये शिथिलता आणल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

दरम्यान; शासन निर्णयातील त्रुटींमुळे जिल्ह्यातील अकरा हजार शेतकरी या लाभापासून वंचित राहिले होते. गेल्या वर्षीच्या केडीसीसी बँकेच्या ८५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत तसा ठरावही करून सरकारला पाठविण्यात आला होता. दोन महिन्यापूर्वी हे अनुदान मंजूर होऊनही ते शेतकऱ्यांच्या खात्यावर सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे या रकमा चढल्या नसल्याचा आरोप मंत्री श्री. मुश्रीफ यांनी केला होता. ही रक्कम तातडीने संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा न झाल्यास सहकार मंत्री आणि अतिरिक्त मुख्य सचिवांकडे तक्रार करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला होता. पालकमंत्री मुश्रीफ यांच्यासह आमदार प्रकाश आबिटकर यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून याबाबत वेळोवेळी पाठपुरावा केला कोल्हापूरला या प्रस्तावाची गरज पटवून दिले त्यामुळे अखेर मुख्यमंत्र्यांनी त्याच मंजुरी दिली

केडीसीसी बँकेने सहकार खात्याकडे पाठविलेली अनुदानास पात्र शेतकऱ्यांची तालुका निहाय संख्या व रक्कम अशी……,
आजरा (३६४): एक कोटी, ३३ लाख. भुदरगड (५६४): एक कोटी, ९२ लाख. चंदगड भुदरगड (३९९ ): तीन कोटी, ९९ लाख. गडहिंग्लज (५०८ ): दोन कोटी, तीन लाख. गगनबावडा (२८७ ): एक कोटी, २१ लाख. हातकणंगले (१,३१३ ): पाच कोटी, २५ लाख. करवीर पूर्व (१,१०९ ): तीन कोटी, ९२ लाख. करवीर पश्चिम (२,२९२ ): सात कोटी, ९८ लाख. कागल (१, ०८६ ): चार कोटी, १९ लाख. पन्हाळा (१,३९३ ): पाच कोटी, १६ लाख. राधानगरी (९१०): दोन कोटी, ८३ लाख. शाहूवाडी (३२०): एक कोटी, २९ लाख. शिरोळ (१,७४३ ): सात कोटी, ५७ लाख.
=============


Spread the news

You may also like

error: Content is protected !!