डॉ. सुनीलकुमार लवटे यांना शिवाजी विद्यापीठाने डी. लिट.पदवीने सन्मानित करावे : नागरी सत्कार समितीची मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे मागणी

Spread the news

  1. डॉ. सुनीलकुमार लवटे यांना शिवाजी विद्यापीठाने डी. लिट.पदवीने सन्मानित करावे : नागरी सत्कार समितीची मंत्री चंद्रकांत पाटील
    यांच्याकडे मागणी
    कोल्हापूर : लेखक, संशोधक, अनुवादक, विचारवंत अशी ख्याती लाभलेल्या व राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डॉ. सुनीलकुमार लवटे
    यांना शिवाजी विद्यापीठाने डी. लिट. (डॉक्टर ऑफ लिटरेचर) पदवी देऊन सन्मानित करावे अशी मागणी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत
    पाटील यांच्याकडे करण्यात आली. डॉ. सुनीलकुमार लवटे नागरी सत्कार समितीच्या शिष्टमंडळाने, सोमवारी (१९ ऑगस्ट) मंत्री पाटील यांची
    भेट घेऊन निवेदन दिले.
    ‘ शैक्षणिक, सामाजिक व साहित्यिक अशा विविध क्षेत्रात डॉ. लवटे यांनी केलेले कार्य सर्वश्रृत आहे. कर्तृत्वसंपन्न अशा या व्यक्तिमत्वाच्या
    कार्याची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली आहे. सामाजिक बांधिलकी, सेवाभावी वृत्ती आणि समर्पणवृत्ती ही त्रिसूत्री अंगिकारुन
    वयाच्या ७५ व्या वर्षीही ते तळमळीने समाजकार्य करत आहेत.’असे निवेदनात म्हटले आहे. नागरी सत्कार समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.
    जी. पी. माळी, उपाध्यक्ष डॉ. बी. एम. हिर्डेकर, प्राचार्य डॉ. प्रविण चौगले, सचिव विश्वास सुतार, खजिनदार प्राचार्य प्रभाकर हेरवाडे,
    प्रकाशक अमेय जोशी यांच्या शिष्टमंडळाने मंत्री पाटील यांची भेट घेतली. याप्रसंगी लवटे यांच्या कार्याविषयी मंत्री पाटील यांना विस्तृत माहिती
    दिली.
    ‘लवटे यांचे जीवनकार्य हे प्रेरणादायी आहे. त्यांनी समाजातील विविध घटकांसाठी काम केले. विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून ते परिचित होते.
    साहित्य आणि संशोधन क्षेत्रातील त्यांच्या कार्याचा गौरव नामांकित संस्थेने केला आहे. ‘नेम नॉट नोन’ ते ‘वेलनोन’पर्यंतचा प्रवास हा
    अनेकांना स्फूर्तीदायी आहे. अध्ययन, अध्यापन, लेखन,संपादन, अनुवाद, समाजकार्य, सांस्कृतिक उपक्रम यामधील कामगिरी साऱ्यांनाच
    प्रोत्साहित करणारी आहे. कोल्हापुरातील रिमांड होमचे बालकल्याण संकुलात रुपांतर होण्यामागील त्यांचे योगदान संपूर्ण महाराष्ट्राला आदर्शदायी
    ठरले आहे.
    शिवाजी विद्यापीठात साहित्यिक वि. स. खांडेकर स्मृति संग्रहालय उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. गेली तीन-चार वर्षे ते, महाराष्ट्र
    राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळतर्फे प्रकाशित होणाऱ्या तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या समग्र वाङमयाचे संशोधन आणि संपादन करत
    आहेत. त्यांच्या अथक परिश्रमातून अठरा खंडांचे काम पूर्ण झाले आहे. डॉ. लवटे यांची जडणघडण, विविध क्षेत्रातील कार्य, प्राप्त पुरस्कार
    या साऱ्याचा शिवाजी विद्यापीठाकडून उचित गौरव व्हावा, त्यांना डी.लिट. पदवी प्रदान करावे.’ असे निवेदनात म्हटले आहे. मंत्री पाटील
    यांनी शिष्टमंडळाला, ‘लवटे यांचे कार्य समाजासाठी आदर्शवत आहे. त्यांना डी. लिट. पदवीने सन्मानित करण्याची मागणी उचित आहे.
    यासंबंधी निश्चितच विद्यापीठ प्रशासनाशी चर्चा करू. ’असे सांगितले.

Spread the news

You may also like

error: Content is protected !!