डॉ.लकडावालांच्या शिबीरातून गरीबांना मोफत उपचार तर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मुलांना प्रेरणा आणि मार्गदर्शन मिळेल – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

Spread the news

डॉ.लकडावालांच्या शिबीरातून गरीबांना मोफत उपचार तर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मुलांना प्रेरणा आणि मार्गदर्शन मिळेल – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

 


वैद्यकीय महाविद्यालय आणि सीपीआर यांच्या संयुक्तविद्यमाने मोफत लॅप्रोस्कॉपी शस्त्रक्रिया शिबाराचे आयोजन

  •  

 

कोल्हापूर, दि.  (जिमाका):  राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर यांच्यावतीने आयोजित डॉ.मुफज्जल लकडावाला यांच्या मोफत लॅप्रोस्कॉपी शस्त्रक्रिया शिबीरातून गरीब गरजू रूग्णांना मोफत उपचार मिळतील तसेच या ठिकाणी सेवा देत असलेल्या डॉक्टरांना अनुभव, वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मुलांना प्रेरणा आणि मार्गदर्शन मिळेल असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या पुढाकारातून छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रूग्णालयात प्रसिद्ध लॅप्रोस्कॉपी तज्ज्ञ डॉ.मुफज्जल लकडावाला यांच्या सहाय्याने दोन दिवशीय मोफत शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन केले आहे त्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.  ते म्हणाले, पित्ताशय तसेच गर्भाशय पिशवी काढणे, हार्निया अशा वेगवेगळ्या शस्त्रक्रिया होणार आहेत. याचबरोबर गुडघ्या वरील शस्त्रक्रियाही होणार आहेत. सर्व शस्त्रक्रिया यंत्राद्वारे बिनटाक्याच्या सहाय्याने होणार असून मिरेल कंपनीने यासाठी आवश्यक साहित्य पुरविले आहे. पाच ते सहा लाखांपर्यंत खर्च येणाऱ्या शस्त्रक्रिया समाजसेवेच्या भावनेतून डॉ.लकडावाला याठिकाणी मोफत करीत आहेत. यातून त्यांना गरीबांचा नक्कीच आशिर्वाद लाभेल. तसेच विद्यार्थ्यांनाही ते याठिकाणी चांगल्याप्रकारे तयार करतील. त्यांनी यावेळी सोबत असणाऱ्या २२ तज्ज्ञ डॉक्टरांचेही आभार मानले.

या उद्घाटन प्रसंगी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचेसह महापालिका आयुक्त के.मंजुलक्ष्मी, लॅप्रोस्कोपी सर्जन डॉ.मुफज्जल लकडावाला, संचालक डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता डॉ.सत्यवान मोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुप्रिया देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूद्ध पिंपळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.शिशीर मिरगुंडे, डॉ.वसंत देशमुख, डॉ.उज्ज्वला खैरमोडे, डॉ.भास्कर मुर्ती, डॉ.इब्राहिम अन्सारी यांचेसह वैद्यकीय अध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंत्री हसन मुश्रीफ यांनी डॉ.लकडावाला यांच्या समाजसेवाला खरं तर पद्मविभूषण, पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करायला हवे असे सांगितले. त्यांचा अनुभव लक्षात घेवून त्यांना आपला दवाखाना दाखवा, शेंडा पार्क येथील सुविधा दाखवा व आवश्यक सुधारणांबाबत मार्गदर्शन त्यांचे मार्गदर्शन घ्या अशा सूचना अधिष्ठाता डॉ.सत्यवान मोरे यांना दिल्या. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गरीबांची मुलं शिक्षण घेत असतात, त्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून तज्ञ, अनुभवी डॉक्टर तसेच शिक्षकांचे मार्गदर्शन मिळावे यासाठी समिती नेमल्याचे सांगून त्यांनी भविष्यात सर्व शासकीय महाविद्यालयांमध्ये तज्ज्ञ डॉक्टर येण्यासाठी आवश्यक खर्चही करण्यात येईल व सर्व प्रकारच्या मोठमोठ्या शस्त्रक्रिया करण्यासाठी नियोजन करणार असल्याची ग्वाही यावेळी दिली. महात्मा फुले जनआरोग्य योजना, आयुष्यमान भारत योजना खाजगी दवाखान्यांनी लागू करून घ्यावी. पब्लिक ट्रस्ट असणाऱ्या दवाखान्यांनी तर ही योजना सुरू करणे आवश्यक असून यातून गरजूंना विनाअडथळा सेवा देता येईल असे सांगितले.

डॉ.लकडावाला यांनी याठिकाणी गरीबांना सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मंत्री श्री.मुश्रीफ यांचे धन्यवाद मानले. यावेळी बोलताना वीस वर्षापुर्वी मीही असाच विद्यार्थी म्हणून बसलो होतो असे सांगत वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या डॉक्टरांना त्यांनी आवाहन कले. मानवजातीची सर्वोत्तम सेवा म्हणजे तुम्ही मानवजातीला जे परत काही देता. मानवजातीला जे परत देताय ही एक सर्वोत्तम संधी आहे. येथील वैद्यकीय महाविद्यालयासह राज्यात सर्व ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांसोबत एक विशेष शस्त्रक्रिया विभाग सुरु करून भविष्यात तेथील शस्त्रक्रियांबाबत जी काही आवश्यक मदत हवी असेल ती आम्ही पुर्ण करु अशी ग्वाही त्यांनी दिली.

आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांनी सुप्रसिद्ध डॉ.लकडावाला यांच्या शिबीराबाबत मंत्री हसन मुश्रीफ यांचे आभार मानले. शेंडा पार्क येथील इमारतींच्या मंजुरीबाबत नुकताच प्रस्ताव पुणे येथे पाठविला आहे. त्यालाही मंजुरी मिळेल. एक चांगले हॉस्पीटल कोल्हापूर मध्ये सुरू होत आहे. जिल्ह्यातील सर्व शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा आणि मार्गदर्शनाची सोय येत्या काळात होत आहे. महिलांसाठी अशा सुविधांची गरज असून त्यांच्या आरोग्यावर होणारे दुर्लक्ष दूर करण्यासाठी त्यांनी अशा शिबीरांचा लाभ घ्यावा असे आवाहनही केले. संचालक डॉ. अजय चंदनवाले यांनी यावेळी प्रास्ताविकामध्ये डॉ.मुफज्जल लकडावाला यांच्याबाबत माहिती दिली. येथील शिबीरामध्ये होणाऱ्या ५० हून अधिक लोकांच्या शस्त्रक्रिया या बिनटाक्याच्या दुर्बिणीतून होणार आहेत. तसेच मेरील कंपनीकडून कृत्रीम गुडघ्याच्या पाच शस्त्रक्रियांसाठी आवश्यक साहित्य देणार आहेत. या सर्व शस्त्रक्रिया गुंतागुंतीच्या आणि आवघड असून सर्व मोफत स्वरूपात केल्या जाणार आहेत. ही सुविधा कोल्हापूर जिल्ह्यात उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांचे त्यांनी आभार मानले. तसेच आत्तापर्यंत मंत्री मुश्रीफ यांनी वैद्यकिय क्षेत्रात केलेल्या विविध कामांची माहिती उपस्थितांना दिली. कार्यक्रमाच्या शेवटी आभार डॉ.सत्यवान मोरे यांनी मानले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन चंद्रहार पाटील यांने केले.

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!