*डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचा माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न*
कोल्हापूर : उत्साहाने भारलेले वातावरण, कॉलेजच्या आठवणींनी चिंब भिजलेले क्षण, एकमेकांप्रती आपुलकीने हितगुज साधणारी मने, सेल्फीज , ग्रुप फोटोज मध्ये रमलेले मित्र, व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनामध्ये एकमेकांप्रती सहकार्याचा विश्वास व्यक्त करणारी तरुणाई, संगीताचा ठेका, आकर्षक रोषणाई अशा रंगबिरंगी छटांनी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचा ‘अल्युमनाय मिट २०२४ ‘ – माजी विद्यार्थी मेळावा कोल्हापुरातील हॉटेल अयोध्या येथे संपन्न झाला. तंत्रनिकेतनच्या स्थापनेपासून (सन २००९) येथे शिक्षण घेऊन समाजातील, व्यावसायिक ,शासकीय क्षेत्रात विविध जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या माजी विद्यार्थ्यांची या सोहळ्यामध्ये मोठ्या संख्येने उपस्थिती होती. अनेक वर्षांनी एकमेकांना भेटणाऱ्या या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद खुलून आला होता.
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूटचे प्राचार्य विरेन भिर्डी यांनी प्रास्ताविकामध्ये इन्स्टिट्यूटचा गौरवशाली प्रवास विस्तृतपणे सादर केला.प्राचार्य साळुंखे यांनी मनोगत व्यक्त करताना “माजी विद्यार्थी हा संस्थेचा एक महत्त्वपूर्ण घटक असून नवीन पिढ्यांना मार्गदर्शनासाठी नेहमी उपलब्ध असणारा एक स्रोत असतो. संस्था आणि माजी विद्यार्थी यांच्या समन्वयातून विविध प्रकारची प्रगती साधता येते. त्यामुळे हा अनुबंध नेहमी वृद्धिंगतच राहिला पाहिजे. व्यावसायिक जीवनामध्ये माणूसपण विसरू न देता संवेदनशील अंत:करणाने जीवनाची उन्नत अवस्था प्राप्त करा” असे प्रतिपादन केले. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.कौस्तुभ गावडे यांनी याप्रसंगी बोलताना ” माजी विद्यार्थ्यांची संस्थेप्रति असणारी बांधीलकी संस्था आणि विद्यार्थी या दोघांसाठीही संधींची नवीन दालने उघडीत असते. संस्था आणि आजी-माजी विद्यार्थी यांच्या एकत्रित प्रयत्नातून समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये नेतृत्व तयार होते. जॉब सिकर होण्यापेक्षा जॉब गिव्हर होणे अत्यंत आवश्यक आहे. स्पर्धेच्या युगात आयुष्य मनसोक्त जगा” असा संदेश दिला. अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपले कॉलेजमधील अनुभव, आठवणी, वैयक्तिक जीवनातील यशामध्ये संस्थेचे योगदान, भविष्यातील योजना यांविषयी भरभरून मते व्यक्त केली. कॉलेजच्या आणि संस्थेच्या मदतीसाठी आम्ही निरंतर प्रयत्नशील राहू असा विश्वास माजी विद्यार्थ्यांनी यावेळी उपस्थितांना दिला. याप्रसंगी इन्स्टिट्यूटमधील विशेष क्षणांच्या व्हिडिओचे सादरीकरण करण्यात आले. त्यावेळी विद्यार्थी जीवन पुन्हा अनुभवल्याचा आनंद माजी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसून आला. स्मृतीचिन्ह देऊन या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला, तसेच सर्वांनी एकत्रितपणे स्नेहभोजनाचा आनंद घेतला. जुन्या आठवणींना पुनश्च एकदा उजाळा मिळाला.
या कार्यक्रमासाठी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या सचिवा प्राचार्या शुभांगीताई गावडे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कौस्तुभ गावडे यांचे मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी विभागप्रमुख, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पालक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या समन्वयक प्रा. एस पी मेंगाणे यांनी आभार मानले.