नुसते नतमस्तक नको, विचारांचे पालन करा राहूल गांधींचा विरोधकांना टोला राहुल गांधींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण.

Spread the news

 

नुसते नतमस्तक नको, विचारांचे पालन करा

राहूल गांधींचा विरोधकांना टोला

राहुल गांधींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण.

 

कोल्हापूर

छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या थोर महापुरुषांचे फक्त पुतळे उभारून चालत नाही तर त्यांच्या आचार-विचारांचे पालन करावे लागते. त्यांच्यापुढे नतमस्तक व्हायचे आणि चोवीस तास त्यांच्या विचाराविरोधात काम करायचे हे बंद करा असे आवाहन करतानाच शिवाजी महाराज हे ज्या कार्यासाठी लढले, जगले त्यातील थोडे तरी आपण आत्मसात केले पाहिजे. महाराजांचे विचारच देशाच्या संविधानात आहेत असे प्रतिपादन लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केले आहे.

 

कोल्हापुरातील कसबा बावडा भागात राहुल गांधींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, देशात दोन विचारधारा आहेत, एक विचार धारा देश जोडणारी, सर्वांना सोबत घेऊन काम करणारी तर दुसरी विचारधारा संविधान संपवणारी आहे. ही विचारधारा लोकांना घाबरवते, ह्या विचारधारेचे लोक शिवाजी महाराजांना नमस्कार करतात पण त्यांच्या विचारांचे पालन करत नाहीत. याच विचारधारेने शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला नाही. त्यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा बनवला पण तो काही दिवसातच कोसळली. ही राजकीय लढाई नाही तर विचाराची लढाई आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की,  शिवाजी महाराज या महान दैवताचा राजकोट येथील पुतळा कोसळल्याने ज्या वेदना झाल्या तो महाराष्ट्र व शिवप्रेमी जनता कधीही विसरणार नाही.

खासदार शाहू महाराज म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचा समतेचा विचार आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे. शिवाजी महाराजांच्या सैन्यात सर्व जाती धर्माचे लोक होते, तेंव्हापासूनच धर्मनिरपेक्षतेची सुरुवात झाली आहे.

 

विधान परिषदेतील गटनेते व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे संकल्पक आ. सतेज पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी त्यांनी या पुतळ्याच्या संकल्पनेची व रचनेची माहिती दिली. या पुतळयाचे शिल्पकार सचिन घारगे, पाचगाव तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर आहेत. गांधी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे,  संजय डी.पाटील, ऋतुराज पाटील, मालोजीराजे, जयश्री जाधव, राजू आवळे, जयंत आसगावकर, राहुल पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!