*जिल्हा बँकेच्या यशाचा आणि कागलचा व्ही. बी. पाटील यांना नेहमीच द्वेष आणि मत्सर*
*संचालक प्रताप उर्फ भैया माने यांचे प्रसिध्दीपत्रक*
*कागलच्या द्वेषापोटीच त्यांनी तालुक्यातील खासदारकीही घालविली*
*कोल्हापूर, दि. ७:*
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही कोल्हापूर जिल्ह्यातील सबंध शेतकऱ्यांची मातृसंस्था आणि वरदायिनी आहे. आमचे नेते पालकमंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली बँक यशस्वी वाटचाल करीत आहे. जिल्हा बँकेच्या या यशाचा आणि कागल तालुक्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी नेहमीच द्वेष आणि मत्सर केला आहे. त्यामुळेच ते कागलच्या सभेत नको ते बरळले. त्यांच्या त्या वक्तव्याचा आम्ही तीव्र जाहीर निषेध करीत आहोत, असे निवेदन केडीसीसी बँक संचालक प्रताप उर्फ भैय्या माने यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुखांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात केले आहे. वास्तविक; ज्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षपद श्री. व्ही. बी. पाटील यांनी भूषविले आहे, त्या बँकेवर राजकीय स्वार्थापोटी खोटे आणि गलिच्छ आरोप करताना त्यांना लाज वाटली पाहिजे होती. राजकीय द्वेषातून त्यांनी बँकेवर केलेले आरोप सिद्ध करावेत. अन्यथा; त्यांच्यावर मोर्चाही काढू, असेही या पत्रकात म्हंटले आहे.
या पत्रकावर श्री. माने यांच्यासह कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष सौ. शितल फराकटे, राष्ट्रवादीचे कागल तालुकाध्यक्ष विकास पाटील- कुरूकलीकर, माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर आदींच्या सह्या आहेत.
कागलमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात श्री. पाटील यांनी मंत्री श्री. मुश्रीफ यांचे नाव घेत जिल्हा बँकेवर टीका केली होती.
या प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले आहे, श्री. व्ही. बी. पाटील यांनी नेहमीच आमचे नेते पालकमंत्री हसनसाहेब मुश्रीफ आणि कागल तालुक्याचा सातत्याने द्वेष आणि मत्सरच केलेला आहे. या द्वेष आणि मत्सरातूनच त्यांनी माजी खासदार प्रा. संजयदादा मंडलिक यांच्या पराभवाच्या रूपाने कागल तालुक्याची खासदारकीही घालवली. त्यांनीच श्री. पवारसाहेबांना सांगून प्रा. मंडलिक यांच्या विरोधात उमेदवारीचे षडयंत्र रचून आणले. त्यांनी लोकसभा निवडणुकीत ही सगळे षड्यंत्र रचले नसते तर कागलची खासदारकी कागलमध्येच राहिली असती, असेही या पत्रकात पुढे म्हटले आहे.
*लायकी सिद्ध करा………!*
या पत्रकात श्री. व्ही. बी. पाटील यांना उद्देशून म्हटले आहे, नुसत्याच लावा-लाव्या करत बसण्यापेक्षा हिम्मत असेल तर विधानसभा निवडणुकीत उमेदवारी करा. तुमची पात्रता बघून पक्षाने उमेदवारी दिली नाही तर येत्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर शहरातून अपक्ष लढा आणि तुमची लायकी सिद्ध करा.
===========