दौलत देसाईंनी लावली जोरदार फिल्डींग
गणेशोत्सवात संपर्क यंत्रणा कार्यरत, तिकीटासाठी प्रयत्न
कोल्हापूर
गेल्या पंधरा वर्षापासून कोल्हापूर उत्तर मधून लढण्यासाठी तयारी करत असलेल्या दौलत देसाई यांनी यंदा लढण्याचा निर्धार केला आहे. पक्षाची उमेदवारी मिळविण्यासाठी त्यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. गणेशोत्सवाच्या माध्यमातून मतदार आणि कार्यकर्ते यांच्याशी संपर्क यंत्रणा गतीमान केली आहे. कार्यकर्त्यांमधून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.
शिक्षण प्रसारक मंडळाचे कौन्सील पेट्रन सदस्य असलेले दौलत देसाई हे कोल्हापूर उत्तर मतदार संघातून विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छूक आहेत. यापूर्वी झालेल्या तीन विधानसभा निवडणुकीत उतरण्यासाठी त्यांनी जोरदार तयारी केली. पण, पक्षाची उमेदवारी मिळाली नाही. चांगली तयारी आणि ताकद असतानाही त्यांच्यावर काही पक्षांनी अन्याय केला. यामुळे त्यांना ऐनवेळी थांबावे लागले.
यंदाच्या निवडणुकीत काहीही झाले तरी उतरायचेच असा निर्धार देसाई यांनी केला आहे. त्यांच्या कार्यकर्त्यामधून लढण्याचा आग्रह सुरू आहे. यामुळे विधानसभेच्या मैदानात उतरण्यासाठी त्यांनी तयारी सुरू केली आहे. पंधरा वर्षे ते राजकारणात सक्रीय आहेत. शहरातील अनेक तरूण मंडळे, संघटना आणि संस्थांच्या माध्यमातून त्यांनी विधानसभेसाठी पेरणी केली आहे. सौदत्ती यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांना सुविधा, क्रीडा क्षेत्राला मदत, युवकांच्या कलागुणांना मदत करण्यात त्यांचा हातखंडा आहे. शिक्षण प्रसारक मंडळाच्या माजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून चांगली संपर्क यंत्रणा कार्यरत आहे. कला, क्रीडा, शिक्षण, राजकारण या सर्व क्षेत्रातील कामाच्या जोरावर ते मैदानात उतरणार आहेत.
देसाई यांनी महाविकास आघाडी बरोबरच महायुतीतील घटक पक्षाची उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील आहेत. एका प्रमुख पक्षाने त्यांच्या उमेदवारीबाबत सकारात्मकता दाखविली आहे. यामुळे उमेदवारी मिळण्याची चिन्हे आहेत. न मिळाल्यास अपक्ष म्ह्णूनही लढण्याचा त्यांनी निर्धार केला आहे. पंधरा वर्षे केलेल्या कामाला निश्चित यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. गणेशोत्सवाच्या धामधुमीत प्रत्येक भागातील कार्यकर्ते, जनतेशी ते संपर्क साधत आहेत. त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.