हॉटेल मालकास मद्यविक्रीचा परवाना मिळवून देण्याचे आमिष दाखवून १ कोटी ५ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) पथकाने अटक
कोल्हापूर : महाबळेश्वर येथील हॉटेल मालकास मद्यविक्रीचा परवाना मिळवून देण्याचे आमिष दाखवून १ कोटी ५ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी हणुमंत विष्णूदास मुंढे (रा. ताथवणे, ता. मुळशी, जि. पुणे) याला गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) पथकाने अटक केली. वाई न्यायालयात हजर केले असता, त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. कोल्हापूर येथील सीआयडीच्या अधीक्षक मनीषा दुबुले यांच्याकडून गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे.
संशयित आरोपी मुंढे याच्यासह आठ जणांनी महाबळेश्वर येथील एका हॉटेल व्यावसायिकास मद्यविक्रीचा परवाना मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी अडीच कोटी रुपये खर्च येईल, असे सांगून गेल्या वर्षभरात वेळोवेळी त्यांच्याकड़ून १ कोटी ५ लाख रुपये उकळले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच हॉटेल मालकाने वाई पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या गुन्ह्याचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आल्यानंतर अधीक्षक दुबुले यांच्या पथकाने संशयित आरोपी मुंढे याला पुण्यातून अटक केली.
………………