*कोल्हापूरच्या औद्योगिक विकासासाठी सर्वंकष धोरणासह सरकारचे संपूर्ण सहकार्य – उद्योगमंत्री उदय सामंत*
*महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे आयोजित विशेष बैठकीत ग्वाही*
कोल्हापूर ः कोल्हापूरच्या औद्योगिक विकासासाठी महाराष्ट्र शासन कटीबध्द असून नवीन औद्योगिक वसाहती स्थापन्यासह कोल्हापूरमध्ये आय.टी.पार्क उभारणीसह सर्वंकष धोरण बनवुन सहकार्य केले जाईल अशी ग्वाही उद्योगमंत्री नाम. उदय सामंत यांनी दिली.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीज तर्फे मंगळवारी जिल्ह्यातील प्रमुख उद्योजकांनी उद्योग मंत्र्यांसमवेत संवाद बैठक आयोजित केली होती त्याप्रसंगी ते बोलत होते.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष ललित गांधी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीत कोल्हापूरातील अग्रणी उद्योजक विजय मेनन, प्रकाश राठोड, सुरेंद्र जैन, सचिन मेनन, प्रसाद मंत्री, भरत जाधव, आनंद देशपांडे, अजय सप्रे, सचिन शिरगांवकर, मंगेश पाटील, शंकर दुल्हाणी, रवि डोली, जयेश ओसवाल, अश्विनी दानीगोंड, प्रकाश मेहता, राजु पाटील, राहूल सातपुते, शितल संघवी, रणजित जाधव हे उपस्थित होते.
ललित गांधी यांनी प्रास्ताविक करताना जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींचे प्रदीर्घ काळ प्रलंबित प्रश्न सोडवल्याबद्दल उद्योग मंत्र्यांना धन्यवाद दिले. तसेच उद्योजकांचे प्रलंबित अनुदान वितरीत केल्याबद्दलही आभार मानले, कोल्हापूरच्या औद्योगिक विकासासाठी एमआयडीसी चा विस्तार, वीज दरवाढ तोडगा, पूर्वीच्या जागा हस्तांतरणावरील जीएसटी मागणी रद्द करणे, इलेक्ट्रॉनिक पार्क ला मंजूरी मिळविणे आदी मागण्या मांडल्या.
उद्योजकांनी जिल्ह्याच्या विकासासाठी विविध मागण्या व प्रस्तावावर आपली मते व्यक्त केली. यामध्ये विस्तारीकरणासाठी जागेची उपलब्धता, वीज उपलब्धता, नवीन उद्योग आणणे, आय.टी.पार्क उभारणी या मागण्यांसह कोल्हापूर-सांगली विभागाला फाऊंड्री हब घोषित करण्याची मागणी केली.
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सर्व प्रश्न समजावून घेतले असल्याचे सांगुन सरकारने बरेच निर्णय घेतले असून नवीन एमआयडीसी च्या माध्यमातुन 650 हेक्टर जमीन उपलब्ध करून दिली जाईल असे सांगुन आचारसंहितेनंतर विविध निर्णय जाहीर केले जातील असे सांगितले.