*चिल्लर पार्टीच्या ‘क्लिफोर्ड’ सिनेमाला प्रचंड गर्दी ; शिष्यवृत्तीची रक्कम शाळेला देणाऱ्या स्वाती यंकाजीचा सत्कार*
कोल्हापूर : धान्याचे छोटेसे बीज पेरले तर ते शिवारभर पिकते. त्याप्रमाणेच छोट्याशा स्वातीची उत्स्फूर्तपणे शिष्यवृत्तीची रक्कम शाळेलाच देणगी देण्याची कृती छोटी असली तरी ती डोंगराइतकी आहे. तिच्यासारख्या मुलींचे आदर्श सर्वांसमोर ठेवून चिल्लर पार्टीने चांगुलपणाची पायवाट दाखवली आहे, असे प्रतिपादन शाहूवाडीचे गटशिक्षणाधिकारी विश्वास सुतार यांनी केले.
चिल्लर पार्टीतर्फे रविवारी येथील शाहू स्मारक भवनात लहान मुलांसाठी क्लिफोर्ड : द बिग रेड डॉग हा चित्रपट दाखवला. या कार्यक्रमात शिष्यवृत्तीची रक्कम प्राथमिक शिक्षण घेतलेल्या हुतात्मा बाबू गेनू विद्यामंदिराला देणाऱ्या इचलकरंजी येथील घरी अठरा विश्व दारिद्र्य असणाऱ्या स्वाती सुरेश यंकाजी या विद्यार्थिनीचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. तिच्या या चांगुलपणाला प्रोत्साहन देण्यासाठी चिल्लर पार्टीतर्फे ॲड. शिवप्रसाद वंदुरे-पाटील यांच्या हस्ते सिनेमा पोरांचा पुस्तक भेट देउन तिचा सत्कार केला. कार्यक्रमातच पाटील यांनी तिच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी घेतल्याचे जाहीर केले. सामाजिक कार्यकर्त्या शुभदा हिरेमठ यांनी तिच्यासाठी दिवाळीसाठी कपड्यांची भेट दिली. खेळघरमध्ये शिकणाऱ्या लहान मुलांनी दिलेल्या पैशांतून वह्या भेट देण्यात आल्या. भारावलेल्या स्वातीने आपल्या भाषणात चिल्लर पार्टीचे आभार मानले. यावेळी पन्हाळा तालुक्यातील उत्रे विद्यामंदिराचे शिक्षक प्रकाश ठाणेकर, हेल्पर्स ऑफ दि हॅन्डीकॅप्ड संस्थेचे शिक्षक, खेळघरच्या उत्तरा फाल्गुनी, अर्पणा कुलकर्णी, संजिवनी शुक्ल, वाशी येथील कन्या विद्यामंदिराच्या मुख्याध्यापक सुनीता गुजर, महादेव शिंदे, वैशाली सुतार यांचाही सत्कार करण्यात आला. मिलिंद यादव यांनी प्रास्तविक केले. शिवप्रभा लाड,अभय बकरे, मिलिंद नाईक, बबन बामणे, अनिल काजवे, पद्मश्री दवे,ओंकार कांबळे, गुलाबराव देशमुख उपस्थित होते.