देशाला धोका देणाऱ्या काँग्रेसवर विश्वास ठेवू नका
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आवाहन
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
फोडा आणि राज्य करा या इंग्रजांच्या नितीचा काँग्रेस वापर करत आहे, जातीजातीत भांडणे लावत आहे, देव, देश आणि धर्म याबाबत आस्था नसणाऱ्या आणि निती, निर्णयक्षमता नसणाऱ्या देशाला धोका देणाऱ्या या पक्षावर विश्वास ठेवू नका असे आवाहन करताना राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीला बळ द्या असे आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले.
कोल्हापुरात महायुती उमेदवारांच्या प्रचारासाठी योगींची तपोवन मैदानावर जंगी सभा झाली. या सभेत त्यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. यावेळी खासदार धंनजय महाडिक, धैर्यशील माने यांच्यासह राजेश क्षीरसागर, अमल महाडिक, राजेश क्षीरसागर, अशोकराव माने या उमेदवारांसह अनेक नेते उपस्थित होते.
मुख्यमंत्री योगी म्हणाले, सध्या महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये नुरा कुस्ती सुरू आहे. ते एकमेकांना धोका देत आहेत. यांनी प्रथम हिंदुना धोका दिला. आता देशाला धोका देत आहेत. देशाला धोका देण्याचा काँग्रेसचा इतिहासच आहे. त्यांच्या या वृत्तीमुळेच पाकिस्तानची निर्मिती झाली. हे सत्य ते मानायला तयार नाहीत. इंग्रजांचेच अंश असलेल्या काँग्रेसने त्यांच्याच फोडा राज्य करा या नितीचा वापर सुरू ठेवला आहे. जात, भाषा, प्रांत यावर आपआपसात भांडणे लावण्याचे काम त्यांच्याकडून सुरू आहे. त्यांच्यामुळेच देशाला प्रत्येक वेळी अपमान सहन करावा लागत आहे.
मुळ विचारापासून उद्धव ठाकरे दूर गेल्याचा आरोप करताना योगी म्ह्णाले, हिंदुत्वाच्या मुद्यावर शिवाजी महाराजांना डोळ्यासमोर ठेवून महायुती सरकारला पुन्हा बहुमताने निवडून द्या. म्हणजे गणेशोत्सव, रामनवमी अशावेळी दगडफेक करणारे घरातून बाहेर पडू शकणार नाहीत. आणि बाहेर पडलेच तर राम नाम सत्य है असा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी भाजपचे महेश जाधव, विजय जाधव, शौमिका महाडिक, जनसुराज्य शक्ती पक्षाचे समित कदम, मच्छिंद्र सकटे, पृथ्वीराज महाडिक, उत्तम कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.