‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ या नामांतरासाठी भव्य मोर्चा
कोल्हापूर – कोल्हापूर येथील ‘शिवाजी विद्यापीठ’, चे ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’, असा नामविस्तार करण्यात यावा या मागणीसाठी हिंदु जनजागृती समिती आणि हिंदु राष्ट्र समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला.
मोर्चाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. दसरा चौकातून चालू झालेला हा मोर्चा लक्ष्मीपुरी, व्हिनस कॉर्नर मार्गे ‘बी’ न्यूजच्या कार्यालयावरून जिल्हाधिकारी कार्यालय येथे समाप्त झाला. जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चा आल्यावर जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आले. याच समवेत क्रूर औरंगजेबाच्या कबरीचे उदात्तीकरण तात्काळ थांबवण्यासाठी कबरीला दिला जाणारा निधी बंद करावा, तसेच औरंगजेबाची कबर काढून टाकण्यात यावी, या मागणीचेही निवेदन देण्यात आले.
या मोर्चात विविध आध्यात्मिक संप्रदाय, हिंदुत्वनिष्ठ संघटना, पक्ष, तरुण मंडळे, विविध सामाजिक संघटना, व्यापारी संघटना यांचा प्रमुख सहभाग होता. या मोर्चात सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांच्यासह निपाणी येथील प.पू. प्राणलिंग स्वामिजी यांचा सहभाग होता.
मोर्चाच्या अंती तेलंगणा येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी.राजासिंह, सनातन संस्थेचे श्री. अभय वर्तक, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट, छत्रपती ग्रुपचे संस्थापक श्री. प्रमोददादा पाटील यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात सहभागी असलेल्या मावळांचे वंशज यांनी मनोगत व्यक्त केले. यात प्रामुख्याने वीर शिवा काशीद यांचे वंशज श्री. आनंदराव काशीद, सरदार मालुसरे यांचे 13 वे वंशज कुनाल मालुसरे आणि सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज यांनीही मनोगत व्यक्त केले.
समारोपप्रसंगी छत्रपती ग्रुपचे संस्थापक प्रमोददादा पाटील, भाजप महिला आघाडीच्या सौ.रूपाराणी निकम, किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष जयसिंगराव शिंदे-सरकार, शिवसेनेचे नेते सत्यजित कदम, नरवीर तानाजी मालुसरे यांचे १३ वे वंशज यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले.
सहभागी संघटना आणि संप्रदाय – ‘श्री’ संप्रदाय, वारकरी संप्रदाय, स्वामी समर्थ संप्रदाय, इस्कॉन, मंदिर सेवेकरी, गजानन महाराज भक्त मंडळ, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदू एकता आंदोलन, हिंदू महासभा, ‘छत्रपती ग्रुप’, महाराष्ट्र मंदिर महासंघ, ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’, ‘अखिल भारतीय रेशनिंग महासंघ’, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती, शिवसेना, भाजप, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, विविध तरुण मंडळे, तालीम
उपस्थित मान्यवर –
शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले आणि श्री. किशोर घाटगे, मंदिर महासंघाचे सहसंयोजक श्री. अभिजित पाटील, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे आणि करवीरतालुकाप्रमुख श्री. राजू यादव, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. आनंदराव पवळ, महाराजा प्रतिष्ठानचे श्री. निरंजन शिंदे, मराठा तितुका मेळवावाचे श्री. योगेश केरकर, वारकरी संप्रदायाचे ह.भ.प. विठ्ठलतात्या पाटील, ह.भ.प. महादेव महाराज यादव, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कोल्हापूर जिल्हा कार्यवाह श्री. सुरेश यादव, शहर कार्यवाह श्री. आशिष लोखंडे यांसह विविध मान्यवर उपस्थित होते.